भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफीवर एफसी गोवाचा कब्जा

ओडीशा एफसीचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ६-४ ने पराभव

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
06th September 2024, 10:53 pm
भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफीवर एफसी गोवाचा कब्जा

पणजी : फातोर्डा येथील पीजेएन स्टेडियमवर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रोमहर्षक सामन्यात एफसी गोवाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ओडिशा एफसीवर ६-४ असा विजय मिळवत दुसऱ्यांदा भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी पटकावली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्या उपस्थितीत आयोजित या स्पर्धेत दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच मिडफिल्डवर वर्चस्व राखण्यासाठी स्पर्धा केली. पूर्वार्धात ओडिशाच्या बोमासने १७ व्या मिनिटाला जाहोहच्या लो ड्राईव्हवरून गोल नोंदवून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. एफसी गोवातर्फे अरमांडो सादिकूने ३३व्या मिनिटाला बरोबरी साधली.
ओडिशा एफसीने दुसऱ्या हाफमध्ये पुनरागमन केले. रोलिन बोर्जेसने रॉय कृष्णाच्या पासवर अहमद जाहौहने गोल केला व आघाडी २-१ अशी केली. शेवटच्या क्षणांमध्ये, ओडिशाच्या अमेय रानवडेने शानदार गोल करून आघाडी ३-१ अशी केली. पण एफसी गोवाने हार मानली नाही. ८८ व्या मिनिटाला बॉक्समधील हँडबॉलसाठी डिफेंडरला दंड ठोठावण्यात आल्याने ओडिशावर आपत्ती ओढवली. अरमांडो सादिकूने चमकदार कामगिरी करत जागेवरूनच गोल करत गुणसंख्या ३-३ अशी बरोबरीत आणली.
कट्टीमणीमुळे एफसी गोवाचा विजय
नियमानुसार सामना ३-३ असा बरोबरीत सुटल्यानंतर टायब्रेकरने निकाल लावण्यात आला. एफसी गोवाने दबावाखाली संयम दाखवला, अरमांडो सादिकू, देजान ड्रॅगिक आणि बोर्जा हेररा या सर्वांनी त्यांच्या किकचे गोलमध्ये रुपांतर केले. एफसी गोवाच्या विजयात गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनीने सिंहाचा वाटा उचलला. त्याने अहमद जाहौह आणि डेलगाडो यांचे गोल वाचवले.