एसजीपीडीएकडून सोपो संकलन निविदा रद्द

दोन महिन्यांत नवी निविदा : बोलीतील काही अटी बदलण्यासाठी निर्णय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th September, 12:41 am
एसजीपीडीएकडून सोपो संकलन निविदा रद्द

मडगाव : एसजीपीडीएच्या घाऊक मासळी मार्केटच्या देखभालीसह सोपो कर गोळा करण्यासाठी निविदा २४ ऑगस्ट २०२३ रोजी काढण्यात आली होती. ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत निविदेसाठी बोली करण्याची मुदत दिली होती. पण, आता ही निविदाच रद्द करण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत नवी निविदा जारी केली जाणार आहे.
एसजीपीडीएच्या घाऊक मासळी मार्केटमधील देखभालीसाठी व सोपो कर गोळा करण्याचे काम एसजीपीडीएकडून केवळ पत्राद्वारे ठेकेदार नेमून केले जात आहे. यातूनच काही दिवसांपूर्वी मार्केटमध्ये गाड्या घेऊन येणार्‍या चालकाला गाडी मार्केटमध्ये नेण्यास मज्जाव झाला होता. तसेच मासळी विक्रेत्यांकडून सदर व्यक्ती जादा प्रवेश कर आकारत असल्याचा आरोप करत एसजीपीडीए सदस्य सचिवांची भेट घेतलेली होती. जून महिन्यात एसजीपीडीएच्या सभेत एसजीपीडीए अध्यक्ष दाजी साळकर यांनी जून महिन्याअखेरपर्यंत सोपो कराची निविदा जारी करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार १ जुलै रोजी एसजीपीडीएच्या घाऊक मासळी मार्केटमधील देखभालीसह महसूल गोळा करण्यासाठी निविदा बदल करून जारी केली होती. यापूर्वीची ठेकेदार हा मासळी व्यवसायातीलच असावा व त्याला तीन वर्षांचा पुर्वानुभव असावा या अटी काढून टाकण्यात आल्या होत्या. जास्तीत जास्त महसूल मिळावा यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे दाजी साळकर यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यानुसार नव्याने सोपो कर गोळा करण्यासाठी ठेकेदार नेमणुकीसाठी निविदा जारी करून त्यालाही प्रतिसाद मिळत नसल्याने एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केट याची देखभाल व महसूल गोळा करण्यासाठीची २४ ऑगस्ट २०२३ रोजी काढलेली व त्यात वेळोवेळी बदल केलेली ई निविदा पूर्णपणे रद्द करण्यात आली. ८ ऑगस्ट रोजी एसजीपीडीएच्या १०६व्या बैठकीत सर्व सदस्यांच्या अनुमतीने ही ई निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुनर्निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू : सदस्य सचिव
सोपो गोळा करण्यासाठी ठेकेदार नेमणुकीसाठीची गेल्यावर्षी काढलेली ई निविदा पूर्णपणे रद्द केलेली आहे. यासाठी पुनर्निविदा पुढील दोन महिन्याच्या काळात काढण्यात येईल. त्यानंतर सुमारे एक महिन्याचा कालावधी बोलीदारांना देण्यात येईल. त्यामुळे पुढील तीन महिन्यांच्या काळात ही निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे एसजीपीडीएचे सदस्य सचिव शेख अली अहमद यांनी सांगितले.

हेही वाचा