पणजी : आपल्या पदाचा गैरवापर करून लाखोंची अफरातफर केल्याप्रकरणी आयपीएचबी (मानसोपचार आणि मानवी वर्तणूक संस्था) चे वरिष्ठ सरकारी लिपिक प्रतीक गावस यांस चार दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी ६ सप्टेंबर रोजी दुपारी २:२० वाजता आयपीएचबीचे संचालक डॉ. शिवानंद बांदेकर यांनी आगशी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला होता. चौकशीत प्रतीक गावस यांनी या गुन्ह्यात आपला हात असल्याचे मान्य केले. दरम्यान काल शनिवार, ७ सप्टेंबर रोजी दुपारी १:०० वाजता त्यांस भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (५) अन्वये रीतसर अटक करण्यात आली. .
अप्पर डिव्हिजन क्लर्क यापदावर कार्यरत असलेल्या प्रतीक गावस (३६,सांताक्रुज) या आरोपीला ४ सप्टेंबर रोजी अंतर्गत चौकशी नंतर दोन निलंबित करण्यात आले. क श्रेणीतील एका कर्मचाऱ्याने त्यांच्या पगारातून कर्ज आणि विमा प्रीमियम कपातीमधील तफावतींबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर फसवणूक उघडकीस आली होती. यामुळे अंतर्गत तपास सुरू झाला, व हा निधी लिपिकाच्या वैयक्तिक खात्यात वळवला जात असल्याचे उघड झाले.
विभागाच्या म्हणण्यानुसार, लिपिकाकडे कर्मचाऱ्यांच्या संबंधित कर्ज किंवा विमा खात्यांमध्ये निधी वितरित करण्याची जबाबदारी होती. याचाच फायदा घेऊन, संशयिताने स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच कॅनरा बँकेच्या त्याच्या वैयक्तिक खात्यांत कर्मचारी कर्ज सेवा आणि विमा प्रीमियमसाठी असलेला एकूण २३,९१,४०२ रुपयांचा निधी वळवत सिस्टममध्ये फेरफार केला. दरम्यान गेली पाच वर्षे हा प्रकार सुरू होता. कुणाच्याही मनात संशय निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या रकमेची कपात केली जात होती. जेव्हा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्जाच्या पेमेंटमधील विसंगतीबद्दल प्रश्न केला तेव्हा सदर लिपिकाने त्यांना हा मुद्दा न वाढवण्याचा सल्ला दिला.
याप्रकरणी आरोपी लिपिकाचे पगार आणि वैयक्तिक बँक खातीही गोठवण्यात आली आहेत. त्याने एकट्यानेच हे कृत्य केल्याचे दिसून येत असले तरी अधिकाऱ्यांना यात इतर व्यक्तींचा सहभाग असल्याचा दाट संशय आहे. इतर अनेक गोष्टी पुढील पोलीस तपासातून स्पष्ट होत जातील. याप्रकारांमुळे माध्यम व कमी वेतन श्रेणी असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे. याप्रकरणी आगशी पोलीस स्थानकाचे निरीक्षक अनंत गावस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश रायकर पुढील तपास करत आहेत.