गोव्यात स्तनांच्या कर्करोगामुळे महिन्याला सरासरी ८ मृत्यू

२०१४ ते २०२३ या दहा वर्षांत गर्भाशयाच्या कर्करोगामुळे ४४१ दगावले

Story: पिनाक कल्लोळी |
27th July, 12:00 am
गोव्यात स्तनांच्या कर्करोगामुळे महिन्याला सरासरी ८ मृत्यू

गोवन वार्ता
पणजी : राज्यात २०१४ ते २०२३ या दहा वर्षांच्या कालावधीत महिन्याला सरासरी ८ महिलांचा स्तनांच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला आहे. महिन्याला सरासरी ३ महिलांचा गर्भाशयाच्या कर्करोगामुळे मृत्यू होत आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिलेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले आहे. याबाबत शफी परांबील यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
उत्तरातून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद राष्ट्रीय कर्करोग नोंदणी प्रकल्प राबवत आहे. यानुसार २०१४ ते २०२३ मधील देशभरातील कर्करोगामुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी काढण्यात आली आहे. या दहा वर्षांत गोव्यात १,००२ महिलांचा स्तनांच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. यामध्ये २०२३ मध्ये सर्वाधिक ११० मृत्यू झाले आहेत. २०२२ मध्ये १०९, २०२१ मध्ये १०६, तर २०२० मध्ये १०३ महिलांचा स्तनांच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला. या दहा वर्षांत संपूर्ण देशात ७ लाख ३६ हजार ५७९ महिलांचा स्तनांच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला.
याशिवाय २०१४ ते २०२३ दरम्यान गोव्यात ४४१ महिलांचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला. २०२३ मध्ये सर्वाधिक ४८ महिलांचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला. २०२१ आणि २०२२ मध्ये प्रत्येकी ४७, २०२० मध्ये ४६, २०१९ मध्ये ४४, २०१८ आणि २०१७ मध्ये प्रत्येकी ४३, २०१६ मध्ये ४२, २०१५ मध्ये ४१, तर २०१४ मध्ये ४० महिलांचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला. या दहा वर्षांत संपूर्ण देशात ३ लाख ५१ हजार ४३२ महिलांचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला होता.
उत्तरात म्हटले आहे की, केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत सर्व राज्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदत करण्यात येते. याबाबत राज्यांनी केंद्राला प्रस्ताव पाठवणे आवश्यक असते. या मिशन अंतर्गत आरोग्य क्षेत्रातील पायभूत सुविधांचा विकास करणे, कर्करोग होऊ नये याबाबत जनजागृती करणे, पूर्वनिदान करणे, ब्रेस्ट स्क्रिनिंग करणे असे विविध उपाय केले जात आहेत. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना लस देण्याबाबतही केंद्र सरकारचा विचार सुरू आहे.