कळंगुटमध्ये सांडपाणी सोडणाऱ्या तीन हॉटेलवर दंडात्मक कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th July, 12:02 am
कळंगुटमध्ये सांडपाणी सोडणाऱ्या तीन हॉटेलवर दंडात्मक कारवाई

म्हापसा : कळंगुटमध्ये उघड्यावर सांडपाणी सोडून परिसर गलिच्छ करणाऱ्या तीन हॉटेलवर पंचायतीने दंडात्मक कारवाई केली. तसेच दोन हॉटेलविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे.

पंचायतीने ही कारवाई गौरावाडा व तिवायवाडा येथील हॉटेलवर केली. या हॉटेलमधील सांडपाणी थेट गटारात आणि रस्त्यावर सोडले जात होते. त्यामुळे दुर्गंधी पसरुन परिसर गलिच्छ होत होता. सांडपाण्याच्या तक्रारी येत असल्यामुळे पंचायतीने या तिन्ही हॉटेलच्या व्यवस्थापनाला ताकीद दिली होती. तरीही संबंधितांकडून उघड्यावर सांडपाणी सोडण्याचे सत्र सुरूच ठेवल्याचे पंचायतीच्या निदर्शनास आले. त्यानुसार तिन्ही हॉटेलना प्रत्येकी १ लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे.

सरपंच जोजफ सिक्वेरा यांनी सांगितले, उघड्यावर सांडपाणी सोडणाऱ्या तीन हॉटेलवर दंडात्मक कारवाई केली आहे. ही दंडाची रक्कम संबंधित व्यवस्थापनाकडून जमा न केल्यास त्यांचा पंचायतीकडून व्यावसायिक परवाना निलंबित केला जाईल. तसेच इतर सरकारी प्राधिकरणांकडे या हॉटेलचा परवाना रद्द करण्यासाठी पत्रव्यवहार केला जाईल. वेळोवेळी ताकिद देऊनही दोन हॉटेलनी सांडपाणी सोडण्याचा प्रकार सुरूच ठेवला. त्यामुळे या हॉटेलवर पोलिसांत तक्रार नोंदवून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पंचायत राज कायद्यांतर्गत पंचायतीने ही तक्रार केली होती. कळंगुट हा गाव पर्यटनस्थळ आहे. गाव गलिच्छ होऊ नये तसेच रहिवाशांना त्रास होऊ नये यासाठी जनजागृती म्हणून पंचायतीने ही कारवाई केली आहे, अशी माहिती पंचायत सचिव अर्जुन वेळीप यांनी दिली. 

हेही वाचा