म्हापसा :म्हापसा : कामुर्ली येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीत सुरु असलेल्या श्री सरस्वती विद्यामंदिर या खासगी शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्याला अमानुष पद्धतीने मारहाण करणाऱ्या शिक्षिकांचे निलंबन करण्यात आले असून त्यांना रीतसर अटकही करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकाची पाने फाडल्याच्या कारणावरून चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दोघा शिक्षिकांनी बेदम मारहाण केली. या विषयीची तक्रार मुलाच्या वडिलांनी कोलवाळ पोलीस स्थानकात दाखल केली होती.
माहितीनुसार, सुजल गावडे (रा. वेरे) व कनिषा गडेकर (रा. पिर्णा) या दोन्ही शिक्षिकांना सेवेतून निलंबित करण्यात आले. तसेच संबंधित शाळा व्यवस्थापनाने निलंबनाचा आदेश जारी करून याबाबतची माहिती शिक्षण खात्याला दिली. कोलवाळ पोलिसांनी संशयित शिक्षिकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), १२६(२), ३५१(२) व ३(५) आणि गोवा बाल कायदा कलम ८ अन्वये गुन्हा नोंद केला होता.
तसेच संशयितांना पोलीस स्थानकात चौकशीसाठी हजर राहण्यासंबंधी नोटीस पाठवली होती. पोलिसांनी बजावलेल्या नोटीसीचे पालन करीत संशयित शिक्षिकांनी बुधवारी सकाळी १०.३० वा. कोलवाळ पोलीस स्थानकात हजेरी लावली. त्यांनी चौकशीत अधिकार्यांसमोर आपले स्पष्टीकरण दिले. दरम्यान आज शिक्षकदिनीच सुजल गावडे व कनिषा गडेकर यांना रीतसर अटक करण्यात आली.
या प्रकरणी हलगर्जीपणा दाखवत तक्रारीत चुकीच्या कलमांची नोंद केल्याप्रकरणी कोलवाळच्या पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक तरेच तपास अधिकाऱ्याचेही निलंबन व्हावे अशी मागणी मंत्री व स्थानिक आमदार निळकंठ हळर्णकर यांनी सरकारकडे केली.
याचवेळी शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी या एकूणच प्रकरणाकडे लक्ष वेधत, विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा प्रकार हा अत्यंत खेदजनक असून, यापुढे खाजगी किंवा अनुदानित शाळेतील कोणत्याही प्रकारची अनियमितता खपवून घेतली जाणार नाही. याबाबत कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे असे सांगितले. आजच्या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता व्यावहारिक ज्ञान देणेही महत्त्वाचे आहे. विद्यार्थी भावनिक दृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी शिक्षकांनी प्रयत्नरत असावे असेही ते यावेळी म्हणाले.