बार्देश तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

९१ झाडांची पडझड, वीज खात्याचे मोठे नुकसान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th July, 11:53 pm
बार्देश तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

म्हापसा : मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा बार्देश तालुक्याला बसला. सात घरांवर झाडे कोसळून सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले. तसेच वीजवाहिन्या व खांब तुटून वीज खात्याचे मोठे नुकसान झाले. काहींच्या घरांचे पत्रे देखील उडून पडले. कोलवाळ सरपंच दशरथ बिचोलकर यांनी हातात कटर घेत स्वत: झाडे कापली.

गुरुवारी रात्री ११ व शुक्रवारी सकाळी मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा आला. यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. म्हापसा, पिळर्ण व पर्वरी अग्निशामक दलाकडे ९१ झाडे कोसळण्याची नोंद झाली. त्यातील ६९ कॉल्स म्हापसा कार्यालयाकडे आले.

वादळी वाऱ्याचा फटका कोलवाळ, रेवोडा व थिवी या गावांना बसला. म्हापसा शहरासह शिवोली, हणजूण, कामुर्ली, सिरसई, पर्रा, गिरी, पिर्णा, वेर्ला काणका, पर्वरी, साळगाव, पिळर्ण, वेरे, कळंगुट या भागात झाडे कोसळली.

कांदोळी येथे मिलाग्रीन फर्नांडिस यांच्या घरावर झाड कोसळून २ लाखांचे नुकसान झाले. कोलवाळ येथे बर्डे यांच्या घराचे १ लाखांचे नुकसान झाले. राण्याचे जुवे येथे राणे कुटुंबियांच्या घरावर माड कोसळला. माळीवाडा रेवोडा येथे प्रमोद गावकर, करक्याचो व्हाळ, रेवोडा येथे संतोष पेडणेकर, सांगोल्डा येथे जोस लोबो, तसेच पाेंबुर्फा येथे घरावर झाड कोसळून नुकसान झाले.

कोलवाळमध्ये ११ झाडे कोसळली. गृहनिर्माण वसाहतीमधील काहींच्या घरावरील शेडचे पत्रे उडाले. सरपंच दशरथ बिचोलकर यांनी स्वत: सहा झाडे कापून बाजूला केली. तर इतर झाडे पंच सदस्यांनी पदरमोड करून कुशल कामगारांच्या सहाय्याने कापली.

पावसामुळे अनेक ठिकाणी वीजवाहिन्या व वीज खांब तुटले. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्री खंडित झालेला वीज पुरवठा गुरुवारी दुपारी सुरळीत झाला. 

हेही वाचा