मालमत्तांच्या व्यवहारांतून तिजोरीत ४,४५० कोटींची भर

उत्तर गोव्यातून साडेतीन वर्षांतील ‘कमाई’


26th July, 11:49 pm
मालमत्तांच्या व्यवहारांतून तिजोरीत ४,४५० कोटींची भर

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : उत्तर गोव्यात १ जानेवारी २०२१ ते १ जून २०२४ या साडेतीन वर्षांत जमीन, फ्लॅट तसेच इतर मालमत्तेची विक्री आणि खरेदी केल्यामुळे २,६४० कोटी रुपयांच्या स्टॅम्प ड्युटी, तर १,८१० कोटी रुपयांचे नोंदणी शुल्क मिळून ४,४५० कोटी रुपयांचा महसूल मिळाला. यात सर्वाधिक बार्देश तालुक्यातून ३,१०७ कोटी रुपये प्राप्त झाले, अशी माहिती कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी विधानसभेत लेखी उत्तरातून दिली.
याविषयी क्रूझ सिल्वा यांनी अतारांकित प्रश्न विचारला होता. उत्तरामध्ये उत्तर गोव्यातील तालुक्यांची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, बार्देश तालुक्यात १,८५९ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी, तर १,२४७ कोटी रुपये नोंदणी शुल्क मिळून ३,१०७ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे. तिसवाडीत ५७७.४७ कोटी स्टॅम्प ड्युटीतून, तर ३९८.८३ कोटी नोंदणी शुल्कातून असे एकूण ९७६.३० कोटी रुपये मिळाले. डिचोलीत १०३.७४ कोटी स्टॅम्प ड्युटीतून, तर ८२.९९ कोटी नोंदणी शुल्कातून असे एकूण १८६.७३ कोटी रुपये प्राप्त झाले. पेडणे तालुक्यात ८२.६१ कोटी स्टॅम्प ड्युटीतून, तर ६५.४५ कोटी नोंदणी शुल्कातून, असे एकूण १४८.०६ कोटी रुपये प्राप्त झाले. सत्तरीत १६.९६ कोटी स्टॅम्प ड्युटीतून, तर १५.२२ कोटी नोंदणी शुल्कातून, असे एकूण ३२.१९ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.