चंद्रकांत तलवार, सायरन रॉड्रिग्जला जन्मठेप

अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणी शिक्षा : चंद्रकांतच्या पत्नीची पुराव्याअभावी सुटका

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th July, 11:47 pm
चंद्रकांत तलवार, सायरन रॉड्रिग्जला जन्मठेप

पणजी : तिसवाडी तालुक्यातील १६ वर्षीय मुलीचा खून केल्याप्रकरणी बाल न्यायालयाने सीरियल किलर चंद्रकांत तलवार (पणजी) व सायरन रॉड्रिग्ज (मेरशी) या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर, ग्रिश्मी उर्फ सोनी चंद्रकांत तलवार हिची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. यापूर्वी संशयितांना दोन खून प्रकरणांत जन्मठेप झाली आहे. हा खून १२ ऑक्टोबर २००९ रोजी करण्यात आला होता. याबाबतचा निवाडा बाल न्यायालयाच्या अध्यक्ष सायोनारा लाड यांनी दिला.

वेर्णा पोलिसांनी या प्रकरणी प्रथम गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, १२ ऑक्टोबर २००९ रोजी वेर्णा पठारावर जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळला होता. याच दरम्यान पोलिसांना अशाच प्रकारचे मृतदेह सुकूर, मेरशी, खोर्जुवे व इतर ठिकाणी सापडले होते. ही सर्व प्रकरणे गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आली होती.

मृतदेह तिसवाडी तालुक्यातील १६ वर्षीय युवतीचा असल्याचे समोर आल्यानंतर पथकाने तिचा मोबाईल व इतर माहिती मिळवली. या प्रकरणात पथकाने १७ ऑक्टोबर २००९ रोजी मुंबईतून चंद्रकांत तलवार आणि सायरन रॉड्रिग्स यांच्यासह दोघा महिलांना ताब्यात घेतले. तलवार, त्याची पत्नी ग्रिश्मी आणि राॅड्रिग्स यांना अटक करण्यात आली होती. चौकशीत त्यांनी १० ते १२ ऑक्टोबर २००९ या काळात दोन महिला व दोन युवतींचे अपहरण करून त्यांचा खून केल्याचे, तसेच त्यांचे दागिने चोरुन १३ ऑक्टोबर २००९ रोजी मुंबईत पळ काढल्याची माहिती दिली होती. या प्रकरणी तपास पूर्ण करून गुन्हा शाखेने बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

सरकारी वकील कृष्णा संझगिरी, मिलेना पिंटो तर नंतर थेमा नार्वेकर यांनी आरोपींविरोधात सबळ पुरावे सादर केले. या प्रकरणी बाल न्यायालयाने चंद्रकांत तलवार आणि ‌सायरन रॉड्रिग्ज या दोघांना अल्पवयीन मुलीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेप आणि प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तर ग्रिश्मी हिची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.

तत्कालीन पोलीस अधीक्षक मंगलदास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उपअधीक्षक सुनीता सावंत यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन निरीक्षक रुपेंद्र शेटगावकर, राजन निगळे, प्रवीण कुमार वस्त, निनाद देऊलकर व इतरांचे पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला.

दोन प्रकरणांत जन्मठेप

चंद्रकांत तलवार आणि ‌सायरन रॉड्रिग्ज यांना डिचोली येथील शर्मिला यशवंत मांद्रेकर (२५) हिचे अपहरण व खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. वेर्णा येथून १२ ऑक्टोबर २००९ रोजी उत्तर प्रदेशातील मालती यादव हिचे चिकन विक्री दुकान दाखविण्याच्या इराद्याने अपहरण करून नंतर तिचा खून केला होता. या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

वेर्णा येथील खून प्रकरणी पुराव्याअभावी निर्दोष

दि. ११ ऑक्टोबर २००९ रोजी आरोपींनी वेर्णा येथील कॉसेसांव डिसोझा (६५) या मासळी विक्रेतीला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमधून नेऊन तिचा खून केला. या प्रकरणी पुराव्याअभावी न्यायालयाने आरोपींची निर्दोष सुटका केली.

मुंबईतील न्यायालयातही सुनावणी सुरू

आरोपींविरोधात मुंबई-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रीती नामक एका युवतीचा अशाच प्रकारे खून केल्याबद्दल ठाणे (महाराष्ट्र) पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होता. या प्रकरणी मुंबईतील न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 

हेही वाचा