फोंडा तालुक्यात पडझडीचे सत्र सुरुच, नागेशी येथे वीजखांब तर दूधसागरमध्ये दरड कोसळली

दोन्ही ठिकाणचा अडथळा संबंधित कर्मचाऱ्यांनी तत्परतेने दूर केला

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th July, 04:44 pm
फोंडा तालुक्यात पडझडीचे सत्र सुरुच, नागेशी येथे वीजखांब तर दूधसागरमध्ये दरड कोसळली

फोंडा: फोंडा तालुक्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या वाढळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. नागेशी-  बांदोडा येथे पहाटे वीज खांब रस्त्यावर कोसळला असून  दूधसागर धबधब्याजवळ रेल्वे रुळावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत दरड बाजूला करून रेल्वे वाहतूक पूर्ण करण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आले.

प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळावर दरड कोसळली. घटनेची माहिती मिळाल्यावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत सकाळी ५. ३० वाजेपर्यंत दरड बाजूला करून रेल्वे वाहतूक सुरु केली. दरड कोसळल्याने लोंढा, अळणावर, कुळे, वास्को आणि बेळगाव या पाच ठिकाणी रेल्वे थांबाविण्यात आल्या होत्या त्या दरड बाजूला केल्यानंतर कालांतराने मार्गी लावण्यात आल्या. 

नागेशी येथे सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वीज खांब रस्त्यावर कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने यावेळी रस्त्यावर वर्दळ नसल्याने दुर्घटना टळली. याच भागातील अन्य एक वीज खांब कोसळण्याची शक्यता होती. मात्र वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत तो खांबही बाजूला केला. 


फोटो - दूधसागर धबधब्या जवळील रेल्वे मार्गावर कोसळलेली दरड बाजूला करताना कर्मचारी.