पीडित अल्पवयीन मुलीने जबाब फिरविल्याने संशयित निर्दोष मुक्त

डिचोली तालुक्यातील मुलीचे अपहरण प्रकरण

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th July, 12:19 am
पीडित अल्पवयीन मुलीने जबाब फिरविल्याने संशयित निर्दोष मुक्त

पणजी : डिचोली तालुक्यातील १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणी वैद्यकीय पुरावे नसल्यामुळे तसेच पीडित मुलीने जबाब फिरविल्यामुळे न्यायालयाने संशयिताची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याबाबतचा निवाडा पणजी येथील जलदगती व पोक्सो न्यायालयाच्या न्या. दुर्गा मडकईकर यांनी दिला.

या प्रकरणी १७ वर्षीय पीडित मुलीच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार डिचोली पोलिसात दाखल केली होती. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी प्रथम मुलीचे अपहरण संदर्भात १० मार्च २०२३ रोजी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. त्यानंतर ५ एप्रिल २०२३ रोजी पीडित मुलीला संशयित युवकाने घरी आणून सोडले. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा जबाब नोंद केला असता, ती घर सोडून संशयिताच्या बरोबर गेल्याचे समोर आले. त्यानंतर तिची अधिक चौकशी केली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित युवकाविरोधात भादंसंच्या कलम ३६३, ३७६ आणि बाल लैंगिक शोषणविरोधी कायदा २०१२ (पॉक्सो) कायद्याच्या ४ व ८ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर ६ एप्रिल २०२३ रोजी पोलिसांनी संशयिताला अटक केली. त्यानंतर न्यायालयाने १२ एप्रिल २०२३ रोजी संशयिताला सशर्त जामीन मंजूर केला. याच दरम्यान पीडित मुलीने वैद्यकीय चाचणी करण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी ४ मे २०२३ रोजी संशयित युवकाविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन १८ डिसेंबर २०२३ रोजी संशयित युवकाच्या विरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू केला. दरम्यान, पीडित मुलीची न्यायालयात उलटतपासणी केली असता, मुलीने आपला जबाब फिरविला. तसेच या प्रकरणी वैद्यकीय पुरावे नसल्यामुळे न्यायालयाने संशयित युवकाची निर्दोष सुटका केली. 

हेही वाचा