मोरजी किनारी दोन होड्यांना आग

११ लाखांचे नुकसान : जमीन माफियांनी आग लावल्याचा आरोप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th July, 12:12 am
मोरजी किनारी दोन होड्यांना आग

पेडणे : विठ्ठलदासवाडा-मोरजी किनारी भागात पारंपरिक झोपड्यांमध्ये सुरक्षित ठेवलेल्या आलेक्स फर्नांडिस यांच्या मालकीच्या दोन होड्यांना आग लागून अकरा लाखांचे नुकसान झाले. ही आग जमीन माफियांनी लावली असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमार व्यावसायिकांनी केला आहे. सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी स्थानिक पंच सदस्य विलास मोरजे, संजय कोले यांनी केली आहे.

नऊ वर्षांपूर्वी विठ्ठलदास वाडा किनारी भागात भूमाफियांकडून पारंपरिक होड्यांना आगी लावण्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. परंतु आजपर्यंत नुकसान झालेल्यांना कसल्याच प्रकारचा मोबदला मिळाला नाही. पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. दोन होड्यांना आगी लागण्याबरोबरच मच्छीमारीसाठी वापले जाणाऱ्या जाळी व इतर साहित्याला आग लागून आलेक्स फर्नांडिस यांचे ११ लाखांचे नुकसान झाले आहे.

मोरजी किनारी भागातील जमिनींना सोन्यापेक्षाही भाव मिळत असल्यामुळे जमिनीवर बिगर गोमंतकीयांचा डोळा आहे. त्यामध्ये किनारी भागातील जमिनी ९९ टक्के बिगर गोमंतकीयांनी विकत घेतल्या आहेत. मच्छिमार बांधवांच्या होड्या, झोपड्या असलेल्या ठिकाणांकडे जाणाऱ्या पायवाटाही बंद करण्याचा प्रकार जमीन माफियांकडून होत असून सरकारचे दुर्लक्ष झाले असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे.

ही आग भूमाफियांनी लावली आहे. या ठिकाणी कसल्याच प्रकारची विजेची सोय नाही. त्यामुळे शॉर्टसर्किट होण्याचाही प्रकार उद्भवत नसून आग मुद्दाम लावली आहे. सरकारने याचा शोध घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी. तसेच फर्नांडिस यांना नुकसान भरपाई द्यावी, असे पंच विलास मोर्जे यांनी सांगितले. 


हेही वाचा