दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळावरून खडाजंगी!

युरी, विजयकडून मंत्री विश्वजीत राणे धारेवर; सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची हमी​

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
25th July, 04:20 pm
दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळावरून खडाजंगी!

पणजी : दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळावरून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार विजय सरदेसाई यांनी गुरुवारी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना धारेवर धरले. दक्षिण गोव्यात खासगी इस्पितळ उभारण्याच्या निर्णयापर्यंत राज्य सरकार अजून आलेले नाही. आमदार आणि स्थानिकांना विश्वासात घेऊन यासंदर्भातील पुढील निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्री राणे यांनी दिली.

गुरुवारी सकाळी प्रश्नोत्तराच्या तासाला प्रथम आमदार क्रुज सिल्वा यांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील नर्सिंग महाविद्यालयाचा विषय उपस्थित केला. त्यावर नर्सिंग महाविद्यालयास सरकारकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले. त्यानंतर आमदार एल्टन डिकॉस्टा आणि व्हेंझी व्हिएगश यांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातून बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आ​जणि खासगी रुग्णालयात पाठवण्यात येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात रुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक त्या साधनसुविधा नसल्यामुळेच रुग्णांवर बिकट परिस्थिती उद्भवत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.

 गेल्या चार वर्षांत दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातून १७,४२५ रुग्णांना गोमेकॉत हलवण्यात आले. यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांत तेथून २,३८९ रुग्णांना गोमेकॉत, तर ७१ रुग्णांना खासगी इस्पितळांत हलवण्यात आल्याची आकडेवारी व्हेंझी व्हिएगश यांनी सादर केली. काही साधनसुविधा नसल्यामुळे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातून रुग्णांना गोमेकॉ आणि खासगी इस्पितळांत दाखल करण्यात येत आहे. परंतु, ७५ टक्के रुग्णांवर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार होत असल्याचा दावा मंत्री राणे यांनी केला.

विरोधक सभापतींसमोरील हौदात!

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाबाबत विचारलेल्या लेखी प्रश्नांना वेगवेगळी​ उत्तरे दिली आहेत. सभागृहात मात्र ते यावर स्पष्टपणे बोलत नाहीत, असा दावा करीत विरोधी आमदारांनी​ सभापतींसमोरील हौदात धाव घेतली. त्यामुळे सभागृहात काही काळ गदारोळ माजला.

मंत्र्यांकडून दिशाभूल करणारी उत्तरे : विजय

मार्च २०२४ मधील मंत्रिमंडळ बैठकीनंतर दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळास मान्यता दिल्याचे, त्यासाठी​ खासगी ट्रस्टला जीसुडाची दहा हजार चौरस मीटर जमीन दिली जाणार असल्याचे आणि जून २०२५ पासून खासगी महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले होते. तरीही आरोग्यमंत्री विश्वजीत राणे याबाबत अद्याप सरकारने निर्णयच घेतला नसल्याचे कसे काय सांगत आहेत, असा सवाल आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला. मंत्री राणे दिशाभूल करणारी उत्तरे देत असल्याचा आरोपही​ त्यांनी केला.

प्रकल्प रद्द करा : युरी आलेमाव

राज्य सरकार दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे खासगीकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे आम्ही दक्षिण गोव्यात खासगी महाविद्यालय येऊ देणार नाही. त्याआधी सरकारने हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.

हेही वाचा