अनुदानित शाळांतील अनियमितता खपवून घेतली जाणार नाही : मुख्यमंत्री

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
05th September, 03:11 pm
अनुदानित शाळांतील अनियमितता खपवून घेतली जाणार नाही : मुख्यमंत्री

पणजी :  शिक्षण खात्याकडे अनुदानित शाळेतील शिक्षक किंवा व्यवस्थापनाबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. याबाबत कडक कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे. यापुढे अशा शाळेतील कोणत्याही प्रकारची अनियमितता खपवून घेतली जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिला. गुरुवारी शिक्षण खात्यातर्फे आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रसाद लोलयेकर , शैलेश झिंगडे, मेघना शेटगावकर , डॉ शंभू घाडी व अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी सात शिक्षकांना मुख्यमंत्री वसिष्ठ गुरू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा प्रकार खेदजनक आहे. खरे पाहता असे प्रकार घडताच कामा नये. जी व्यक्ती मनापासून शिक्षक आहे की असे करूच शकत नाही. काही शाळांना आपला आणि सरकारचा संबंध नाही असे वाटते. मात्र त्यांनी आपल्याला अनुदान सरकारकडूनच मिळते हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. काही वेळेस संस्थाचालक शिक्षकांची पगार उशीर करतात. तर काही शिक्षक संस्थाचालकांसोबत दादागिरी करतात. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांवर परिणाम होत असेल तर शाळांवर कारवाई करण्यात येईल. 

ते म्हणाले, सध्या शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. याचा अवलंब करण्यासाठी शिक्षण खात्याने राज्यातील शाळांना सर्वतोपरी मदत केली आहे. असे असले तरी स्मार्ट क्लासरूम पेक्षा स्मार्ट शिक्षक असणे आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न शिकवता व्यावहारिक ज्ञान द्यावे. विद्यार्थी भावनिक दृष्ट्या सक्षम नसेल तर मग भविष्यात आत्महत्या, व्यसन असले प्रकार सुरू होतात. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही भावनिक परिस्थितीत स्वतःला सांभाळणे शिकवले पाहिजे.  विद्यार्थ्यांचा कल पाहून त्याला योग्य करिअर मार्गदर्शन करावे.

बंद पडलेल्या शाळेने घडवली पिढी

प्रसाद लोलयेकर म्हणाले की, सरकारी प्राथमिक शाळा बंद पडण्याची विविध कारणे आहेत. माझ्या वाड्या जवळील एक प्राथमिक शाळा बंद पडली. त्या शाळेतील विद्यार्थी शिकून बाहेर पडले. तिथे आता कोण नसल्याने विद्यार्थी संख्या कमी होऊन शाळा बंद पडली. मात्र मी , माझी शाळा बंद पडली असे म्हणण्यापेक्षा माझ्या शाळेने घडवलेली एक पिढी आता जगभर काम करत आहे असे म्हणेन. 

शिक्षकांनी हातात पट्टी देखील घेऊ नये

शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी कार्यक्रमानंतर माध्यामांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोणत्याही शिक्षकाला विद्यार्थ्यांना मारण्याचा अधिकार नाही. आम्ही वेळोवेळी विद्यार्थ्यांना अशी शिक्षा देऊ नये असे आदेश काढत असतो. शिक्षकांनी हातात पट्टी देखील घेऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. कामुर्ली येथील प्रकार धक्कादायक आहे. त्या शिक्षकांच्या निलंबनावर १२ रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.

 

हेही वाचा