विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आतापासूनच नियोजन : ठाकरे

२ ऑक्टोबरपासून सभासद नोंदणी मोहीम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th September, 10:42 pm
विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आतापासूनच नियोजन : ठाकरे

पणजी : आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसकडून आतापासूनच नियोजन सुरू आहे. नियोजनाचा विचार करण्यासाठी आम्ही गोव्याला भेट देत आहोत, असे काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. इतर पक्षांशी युती करण्याबाबत स्थानिक नेते चर्चा करून निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे आणि प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर गोव्यात आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्रदेश काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे आमदार, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर आणि विधिमंडळ नेते युरी आलेमाव उपस्थित होते. बैठकीनंतर माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस, युरी आलेमाव आणि आमदार एल्टन डिकॉस्टा उपस्थित होते.

देशात तसेच गोव्यात काँग्रेसची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १०० जागा मिळाल्या. गोव्याचा विचार केला तर दक्षिण गोव्यात पक्षाला यश मिळाले. काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस मजबूत होत आहे. काँग्रेस आता गोव्यात नियोजन करून काम करेल. जिल्हा पंचायत निवडणुकांबरोबरच आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या उद्देशाने नियोजन सुरू झाले आहे, असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

युती आणि आघाडीचा निर्णय स्थानिक नेते घेतील

इतर समविचारी पक्षांशी युती करण्याविषयी स्थानिक नेते चर्चा करून निर्णय घेतील. राष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे ठाकरे म्हणाले.

पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वच मतदारसंघात पक्षाचे उपक्रम राबवले जाणार आहेत. सभासद नोंदणी मोहीम २ ऑक्टोबरपासून सर्व मतदारसंघात सुरू होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुका जिंकण्याचे उद्दिष्ट

गोव्यातील जिल्हा पंचायत तसेच विधानसभा निवडणुका जिंकण्याचे उद्दिष्ट आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होईपर्यंत प्रभारी पदाच्या जबाबदारीतून मुक्त होणार नाही, असे प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी सांगितले.

हेही वाचा