सासष्टी : फातोर्डा येथे शॉर्टसर्किटमुळे फ्लॅटला आग

मडगाव अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण : सुमारे अडीच लाखांचे नुकसान

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16th September, 02:53 pm
सासष्टी : फातोर्डा येथे शॉर्टसर्किटमुळे फ्लॅटला आग

मडगाव : फातोर्डा मुरीडा येथील लिटल स्कूलनजिकच्या इमारतीत असलेल्या बंद फ्लॅटला आज सकाळी आग लागली. यात सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले. दरम्यान शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले. मडगाव अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.


मडगाव अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, सदर घटनेची माहिती मिळताच मडगाव अग्निशामक दलाने घटनास्थळाला भेट दिली. येथे फ्लॅटला आग लागल्याचे दिसून आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी वीजपुरवठा बंद असल्याची खात्री केल्यानंतर फ्लॅटमधील किचनमध्ये पाण्याचा मारा केला. फ्लॅटमध्ये ठेवण्यात आलेली दुचाकी व भरलेले गॅस सिलिंडर बाहेर काढले. हा फ्लॅट डेरिक ग्रॅसिअस यांच्या मालकीचा असून ते परदेशात कामाला असतात. 


 मडगाव अग्निशामक दलाचे अधिकारी गिल सुझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बंद फ्लॅटमधील विजेचा मीटर सुरू होता. शॉर्टसर्किटमुळे घरातील फ्रीजला सर्वप्रथम आग अळंगली. घर बंद ठेवून जात असल्यास लोकांनी घरातील विजेचा पुरवठा बंद करुनच बाहेर जावे, असाही त्यांनी सल्ला दिला. डेरिक यांचा फ्लॅट बंद होता. फ्रीजला शॉर्टसर्किटमुळे आग लागली व ती आग घरात सर्वत्र पसरली. सध्या आगीवर नियंत्रण  मिळवण्यात आले असून सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गॅस सिलिंडर बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला असेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा