दक्षिण गोव्यात सनबर्न आयोजनास आमचा विरोधच : रेजिनाल्ड

मॉविन, आंतोन वाझ यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचेही केले स्पष्ट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th September, 12:01 am
दक्षिण गोव्यात सनबर्न आयोजनास आमचा विरोधच : रेजिनाल्ड

आमदार आलेक्स रेजिनाल्ड

‍पणजी : दक्षिण गोव्यात सनबर्न महोत्सवाचे आयोजन नकोच, अशी मागणी आपण, मंत्री मॉविन गुदिन्हो आणि आमदार आंतोन वाझ यांनी नुकतीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन केली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आमच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यात दरवर्षी उत्तर गोव्यात आयोजित होणारा सनबर्न महोत्सव यंदा दक्षिण गोव्यात आयोजित करण्याच्या हालचाली​ आयोजकांनी सुरू केल्यानंतर यावरून राज्यभरात गदारोळ माजला. आयोजकांनी वेबसाईटद्वारे महोत्सवाच्या तिकीट विक्रीस प्रारंभ केल्यानंतर विरोधी काँग्रेसने सरकारने हल्लाबोल सुरू केला. दुसरीकडे सासष्टी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी दक्षिण गोव्यात सनबर्न महोत्सव नकोच, असे ठरावही संमत करून घेतले. त्यातच आमदार तथा उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड हा महोत्सव वेर्णा औद्यो​गिक वसाहत परिसरात आयोजित करण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा करीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी त्यांच्यावर शरसंधान साधले. दक्षिण गोव्यातून महोत्सवाला विरोध होऊ लागल्यानंतर आमदार रेजिनाल्ड, दाजी साळकर, आंतोन वाझ यांच्यासह काही सत्ताधारी आमदारांनी विधानसभा सभागृहातही सनबर्नबाबत आपण स्थानिकांसोबत असल्याची घोषणा केली. त्यावेळी सनबर्न आयोजकांना दक्षिण गोव्यात महोत्सवाचे आयोजन करण्यास अद्याप परवानगी न दिल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला होता.

स्थानिकांचा विरोध योग्यच : रेजिनाल्ड
सनबर्न महोत्सव दक्षिण गोव्यात आयोजित करावा, यासाठी आपण कधीही प्रयत्न केले नाहीत. यावरून विरोधकांनी आपल्याला विनाकारण लक्ष्य केले, असे आमदार रेजिनाल्ड म्हणाले. दक्षिण गोव्यातील जनतेने सनबर्नवरून घेतलेली भूमिका योग्यच आहे. याबाबतची​ माहिती​ आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिलेली आहे, असेही त्यांनी नमूद केले.            

हेही वाचा