‘आयटी हब’साठी शिक्षण व्यवस्थेत बदल हवा!

जागतिक कीर्तीचे आयटी तज्ञ आशांक देसाई यांचे मत; ‘एनईपी’ फायदेशीर ठरण्याचाही विश्वास

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th September, 04:52 pm
‘आयटी हब’साठी शिक्षण व्यवस्थेत बदल हवा!

पणजी : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (आयटी) गोव्याचा विकास साधण्यासाठी राज्यातील तरुणांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. मानसिकता बदलण्याची सुरुवात शाळांमधून होत असते. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेत बदल होणे आवश्यक असून, नव्या शैक्षणिक धोरणामुळे (एनईपी) ते शक्य होईल, असे मत जागतिक कीर्तीचे आयटी तज्ञ आशांक देसाई यांनी सोमवारी व्यक्त केले.

श्रमिक पत्रकार संघ (गुज) आणि गोवा मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने गुजच्या पाटो-पणजी येथील कार्यालयात आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य सरकार गोव्याला आयटी हब बनवण्याच्या तयारीत आहे. परंतु, गोव्यातील तरुणाई सरकारी नोकरीची संधी शोधत असते. आयटी क्षेत्रातील अनेक तरुण-तरुणीही सरकारी नोकरी मिळवण्यात धन्यता मानतात. तरुणाईची ही​ मानसिकता बदलण्यासाठी नेमके काय करावे लागेल, असा प्रश्न पत्रकारांनी देसाई यांना केला होता.

त्यावर बोलताना, गोवा आयटी हब बनण्यासाठी सर्वप्रथम तरुणांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. माणसाची मानसिकता शाळांमधून बदलत असते. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेत बदल होणे आणि पालकांनीही आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. गुजरातसारख्या राज्यांतत उद्योजक बनण्याची संस्कृती आहे. तर, गोव्यात नोकरी करण्याची संस्कृती आहे. त्यामुळेच तरुणाई नोकरी करण्यास प्राधान्य देत आहे. अशा स्थितीत आयटी क्षेत्रात नाव मिळवण्यासाठी नवे नवे प्रयोग करण्याची तसेच जोखीम पत्करण्याचीही गरज आहे. सोबतच राज्य सरकारकडून आयटी क्षेत्राला प्राधान्य मिळण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतीय अर्थव्यवस्थेत आयटी क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. या क्षेत्रातील गुंतवणूक गेल्या काही वर्षांत पाच हजार पटींनी वाढलेली आहे. इतर देशांमधील आयटी क्षेत्रे लोकांना सेवा पुरवण्यावर भर देतात. भारतात मात्र या क्षेत्रातून उत्पादनाला चालना दिली जात असून, त्याचा मोठा फायदा देशाला मिळत आहे. आयटी क्षेत्रात गोव्याला, भारताला अव्वल बनवणारे ‘टॅलेंट’ निश्चित आहे. पुढील युग आयटीचे असल्याने तरुणाईतील या ‘टॅलेंट’ला योग्य व्यासपीठ मिळण्याची नितांत गरज असल्याचेही आशांक देसाई यांनी नमूद केले.

‘एआय’मुळे भविष्यात रोजगारसंधी वाढणार!

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) वाढत्या वापरानंतर काहींच्या नोकऱ्या जातील, पण उत्पादन वाढीमुळे उद्योग वाढून नोकरीच्या अनेक संधीही निर्माण होतील, असा विश्वास आशांक देसाई यांनी व्यक्त केला. इतर राज्यांतून गोव्यात येणाऱ्या आयटी क्षेत्रातील उद्योगांचे गोमंतकीयांनी स्वागत करावे. कारण त्यातून जनतेसाठी​ अधिकाधिक रोजगार निर्माण होण्यास मदत मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा