हार्मोनियम वादक राया कोरगावकर यांना पुरस्कार जाहीर
पणजी : अठरावा पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव २८ आणि २९ सप्टेंबर दरम्यान कला अकादमी येथे सकाळी ९.३० ते रात्री ९.३० या वेळेत होणार आहे. कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी ही माहिती दिली. बुधवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शौनक अभिषेकी आणि संजय तांबे उपस्थित होते.
मंत्री गावडे यांनी सांगितले की, यंदाच्या महोत्सवात १६ कलाकार आपली कला सादर करणार आहेत. यंदा पं. जितेंद्र अभिषेकी पुरस्कार गोव्याचे ज्येष्ठ हार्मोनियम वादक राया कोरगावकर यांना भारतीय शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल प्रदान करण्यात येणार आहे. सर्व संगीतप्रेमींसाठी हा महोत्सव विनामूल्य आहे.
गोव्याचे सुपुत्र आणि शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक महान तपस्वी पं. जितेंद्र अभिषेकी यांना आदरांजली म्हणून दरवर्षी या संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. पं. अभिषेकी हे अभिजात भारतीय संगीताचे साधक होते. त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. १९६० च्या दशकात मराठी संगीत रंगभूमीच्या पुनरुज्जीवनाचे श्रेयही त्यांना जाते.
अभिषेकी यांनी गुरुकुल पद्धतीने अनेक वर्षे आपल्या शिष्यांना संगीताचे शिक्षण दिले. त्यांनी ‘तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान’ हा विश्वस्त न्यास स्थापण्यात पुढाकार घेतला. या न्यासाद्वारे अनेक गुणी, होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच वृद्ध कलावंतांना आर्थिक मदत देण्यात आली असून या न्यासाचे काम अभिषेकी बुवांचे पुत्र व शिष्य शौनक अभिषेकी चालवत असल्याचे गावडे यांनी सांगितले.
महोत्सवात साथसंगत करणारे कलाकार
पं. सुधीर नायक, उदय कुलकर्णी, अमर मोपकर, दत्तराज सुर्लकर, तुळशीदास नावेलकर, मयंक बेडेकर, डॉ. सुधांशू कुलकर्णी, रोहिदास परब, राया कोरगावकर, दत्तराज म्हाळशी, दयेश कोसंबे, चिन्मय कोल्हटकर, प्रेमानंद आमोणकर, सुभाष फातर्पेकर, गोपाळ प्रभू, प्रसाद गवस, सनद कोरगावकर आणि गीत इनामदार.
महोत्सवात सहभागी होणारे कलाकार
डॉ. अश्विनी भिडे देशपांडे (गायन), पं. साजन आणि स्वरांश मिश्रा (गायन), पं. राजा काळे (गायन), पं. रघुनंदन पणशीकर (गायन), पं. पूरबायन चटर्जी (सितार), विदुषी शमा भाटे (कथक नृत्य), राजस उपाध्ये (व्हायोलिन), मकरंद हिंगणे (गायन), एस. आकाश (बासरी), सुधाकर चव्हाण (गायन), धनंजय जोशी (गायन), जुई धायगुडे (गायन), राज शहा (गायन), सिद्धी सुर्लकर (गायन) आणि विना मोपकर (गायन)