मुख्य सचिवांना घेराव घालण्यासाठी काँग्रेसचा मोर्चा

हळदोणा येथील जमीन खरेदीवरुन काँग्रेस आक्रमक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th September, 12:21 am
मुख्य सचिवांना घेराव घालण्यासाठी काँग्रेसचा मोर्चा

पणजी : गोव्याचे मुख्य सचिव पुनितकुमार गोयल यांनी हळदोणा येथील २ कोटी रुपयांची जमीन खरेदी केल्याप्रकरणी काँग्रेसने विधानसभा संकुलाबाहेर आंदोलन केले. गोयल यांनी पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली. गोयल आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानंतर मुख्य सचिवांच्या अनुपस्थितीमुळे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने माघार घेतली.

बुधवारी दुपारी ४ वाजता काँग्रेस गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, उपाध्यक्ष सुनील कवठणकर, हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा आणि काँग्रेस नेते जमीन खरेदी प्रकरणावरुन गोयल यांना सचिवालयात घेराव घालण्यासाठी पोहोचले. तेथे पोलिसांनी त्यांना रस्त्यावर अडवले. मात्र, पोलिसांचा बंदोबस्त तोडून पुढे गेल्यावर त्यांना विधानसभा संकुलाच्या गेटवर अडवण्यात आले.

जोपर्यंत मुख्य सचिव गोयल पुढे येत नाहीत तोपर्यंत येथून हलणार नाही, असा पवित्रा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतला. पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि पाच सदस्यीय शिष्टमंडळाला प्रवेश देऊ, असे सांगितले. मात्र, शिष्टमंडळाने नकार दिला.

काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, सिरील मेंडोसा आणि पुनितकुमार गोयल यांच्यात विक्री करार झाला असून गोयल यांनी त्यांच्या मुलाला पॉवर ऑफ ॲटर्नी दिली आहे. फेरफार ५ जुलै रोजी झाले परंतु गोयल यांचे नाव अद्याप १/१४ वर नाही. सरकार गोयल यांना लपवण्याचा प्रयत्न करत आहे का, असा प्रश्न त्यांनी केला.

प्रशासकीय प्रमुख जर असे करत असतील तर त्यांच्या अधिपत्याखालील जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार हे काय करत असतील? सरकारने गोवा विक्रीसाठी काढला असून ही एक सुरुवात आहे. मुख्य सचिव स्पष्टीकरण देऊ शकत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी पाटकर यांनी केली.

गोयल यांनी १८७५ चौ. मी. जमिनीचे रुपांतर करून हळदोणा येथे २.६ कोटी रुपयांना जमीन विकत घेतली आहे. त्यांचा महिन्याचा पगार २.७० लाख असून ते २.६० कोटी रुपयांची जमीन कशी खरेदी करू शकतात, असा प्रश्न पाटकर यांनी केला.

माझ्या कार्यकाळात घोटाळा नाही : फेरेरा

मुख्य सचिवांनी जागा घेतली त्या हळदोणा मतदारसंघाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी आपल्या कार्यकाळात हा घोटाळा झाला नसल्याचे स्पष्ट केले. जमिनीचे व्यवहार आणि कागदपत्रे झाली तेव्हा मी आमदार नव्हतो. १८ मे रोजी सेल डीड झाली तेव्हा मी आमदार होतो. माझ्या कार्यकाळात हा व्यवहार झाला असता तर मी तो कधीच होऊ दिला नसता, असे फेरेरा म्हणाले.

हेही वाचा