पुढील सुनावणीआधी सभापती घटनात्मक जबाबदारी पूर्ण करतील अशी आशा : सर्वोच्च न्यायालय

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
05th September 2024, 03:47 pm
पुढील सुनावणीआधी सभापती घटनात्मक जबाबदारी पूर्ण करतील अशी आशा : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या गोव्यातील आठ आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित सुनावणी आज पार पडली. यावेळी प्रकरणाच्या पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत सभापती घटनात्मक जबाबदारी पूर्ण करतील अशी आशा आणि विश्वास असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने गिरीश चोडणकर यांच्या याचिकेवरील सुनावणी ८ आठवड्यांसाठी तहकूब केली असून आता या प्रकरणी पुढील सुनावणी नोव्हेंबरच्या ४ तारीखला होईल. 

अपात्रता याचिकेवर सभापतींनी तीन महिन्यात निर्णय घेणे आवश्यक आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायमुर्ती संजीव खन्ना आणि न्यायमुर्ती  संजय कुमार यांनी हा आदेश दिला आहे. दरम्यान, सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसमधील ८ आमदारांनी वेगळा गट स्थापन करून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण होणार आहे. आठ आमदारांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश हाबेकायदेशीर असून सर्वांना अपात्र ठरवावे, अशी मागणी करणारी याचिका गिरीश चोडणकर यांनी सभापतींसमोर सादर केली होती. या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेत  निवाडा देण्याचा आदेश सभापतींना द्यावा, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. 

दस्तरखुद्द सभापती रमेश तवडकर व भाजपमध्ये प्रवेश केलेले आठ आमदार याचिकेत प्रतिवादी आहेत. या याचिकेवरील सुनावणीवेळी सभापतींच्या वकीलाने बाजू मांडण्यास वेळ मागून घेतला. यामुळे सुनावणी ८ आठवड्यांसाठी तहकूब करतांना सभापती घटनात्मक जबाबदारी पार पाडतील, असा आशावाद न्यायमूर्तींनी व्यक्त केला. यामुळे याचिकेवरील पुढील सुनावणी आता ४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.


हेही वाचा