पाच वर्षांनंतर गोव्यात होणार अमेझिंग गोवा परिषद

परिषदेमुळे गुंतवणूक, उद्योजकतेला प्रोत्साहन : मुख्यमंत्री

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th September, 12:18 am
पाच वर्षांनंतर गोव्यात होणार अमेझिंग गोवा परिषद

पणजी : पाच वर्षांनंतर यावर्षी राज्यात ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसंबंधी अमेझिंग गोवा ही जागतिक दर्जाची परिषद आयोजित केली आहे. पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये ‘व्हायब्रंट गोवा’ ही जागतिक परिषद झाली होती. अशा परिषदांमुळे गुंतवणुकीसह नवउद्योजक तयार होण्यासाठी ऊर्जा मिळते, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

गोवा सरकार आणि व्हायब्रंट गोवा फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यानंतर बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माहिती दिली. यावेळी उद्योगमंत्री मॉविन गुदिन्हो, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, व्हायब्रंट गोवा फाऊंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष राजकुमार कामत आणि इतर अधिकारी उपस्थित होते. ताळगाव येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान ही परिषद होणार आहे आतापर्यंत ४६ देशांतील २६० प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. या परिषदेसाठी सरकार कोणताही खर्च करणार नाही. प्रायोजक असलेल्या कंपन्या कार्यक्रमाचा खर्च करतात. देश-विदेशातील उद्योजक, गुंतवणूकदार आणि सरकार यांच्यातील संबंध निर्माण करण्यासाठी ही परिषद उपयुक्त आहे. यापूर्वी २०१९ मध्ये झालेल्या व्हायब्रंट गोवा परिषदेचा गोव्यातील उद्योजकांना फायदा झाला होता, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

गोवा चेंबर, जीएसआयए आणि असोचेम या संघटना परिषदेत सहभागी होणार आहेत. औद्योगिक प्रदर्शने, चर्चासत्र आणि विविध विषयांवरील व्याख्याने परिषदेत होणार आहेत.

गोव्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी उद्योग सुरू केले पाहिजेत. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, विकासाचे फायदे लोकांपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने नियोजन केले पाहिजे. 

नवीन उद्योजक घडवण्याची गरज

गोव्यात आयटी, हॉस्पिटॅलिटी आणि हरित उद्योगांचे स्वागत आहे. परिषदेत ‘स्टुडंट बडी’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात उद्योजकीय मार्गदर्शन केले जाते. नवीन उद्योजक घडवण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा