कॉलरा साथीच्या पार्श्वभूमीवर मोबोर, कुटबण जेटीवर पाहणी

कामगारांच्या आरोग्य तपासणीवर भर : स्वच्छता राखण्यासाठी जागृती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th September, 10:45 pm
कॉलरा साथीच्या पार्श्वभूमीवर मोबोर, कुटबण जेटीवर पाहणी

मडगाव : कुटबण जेटीवर आतापर्यंत ९ डेंग्यूचे रुग्ण आढळले असून इतर कॉलराचे रुग्ण असल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले. उपजिल्हाधिकार्‍यांच्या संयुक्त पाहणीवेळी शुद्ध पाण्याचा पुरवठा व स्वच्छतागृहांचा प्रश्न समोर आला. आमदार सिल्वा यांनीही मोडलेल्या बोटी तत्काळ हटवण्याची मागणी केली आहे.

दक्षिण गोवा उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांच्यासह आमदार क्रुझ सिल्वा, साविओ डिसिल्वा, असोसिएशनचे जयंत तारी, आरोग्य खात्याचे अधिकारी, मत्स्य खात्याचे अधिकारी यांनी संयुक्त पाहणी केली. या पाहणीनंतर उपजिल्हाधिकारी बर्वे यांनी सांगितले की, जेटीवर शौचालयासारख्या मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव आहे. जैव शौचालये देखील कार्यान्वित नाहीत. नवीन जेटी पूर्णपणे वापरात नाही. मत्स्य विभागाकडून कारवाईचा अहवाल मागवला आहे. सांडपाणी व कचरा थेट नदीत सोडण्याचे प्रकार दिसून आले.

जेटीवर आवश्यक सुविधा नसल्याने डेंग्यू, मलेरिया आणि इतर आजारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कॉलरा, विशेषतः दूषित पाण्याच्या संपर्कामुळे आणि अस्वच्छ परिस्थितीमुळे पसरला आहे. जेटीवर काम करणाऱ्या लोकांना या आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हात धुणे, उकळलेले पाणी पिणे आणि योग्य स्वच्छता यासारख्या मूलभूत स्वच्छतेचे पालन करण्याचे आवाहन केले. आरोग्य अधिकारी येत्या काही दिवसांत पुन्हा तपासणी करणार आहेत, असेही स्पष्ट केले.

कुटबण जेटीवर ४ तर मोबोर जेटीवर सुमारे ७ कामगारांचा मृत्यू झाल्याचे मच्छीमार असोसिएशन सदस्य विनय तारी यांनी सांगितले. तर आरोग्य अधिकार्‍यांच्या मते कुटबण जेटीवर डेंग्यूचे आतापर्यंत नऊ रुग्ण आढळले असून एकाचाही मृत्यू झालेला नाही. तर, इतर कामगारांना कॉलरा झालेला असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. कामगारांची तपासणी व वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यासाठी बोटमालक व कामगारांना सांगण्यात आले आहे.

तुटलेल्या बोटी हटवण्याची गरज

जेटीवर मोडलेल्या बोटी अनेक वर्षे उभ्या असून कामगार राहण्यासाठी त्याचा वापर करतात. हजारो कामगार असताना स्वच्छतागृहांचा वापर दिवसाला केवळ १२० जणांनी केलेला दिसतो. या सर्व गोष्टींकडे मत्स्य विभागाने गांभीर्याने पाहून तुटलेल्या बोटी हटवण्याची गरज आहे, असेही आमदार क्रुझ सिल्वा यांनी सांगितले. 

हेही वाचा