ब्रागांझा खूनी हल्ल्यातील संशयितांची निर्दोष सुटका

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
25th July, 09:11 am
ब्रागांझा खूनी हल्ल्यातील संशयितांची निर्दोष सुटका

म्हापसा ः सोंडीवाडा, थिवी येथे तलावाजवळ जॉन्सन ब्रागांझा (गावसावाडा, म्हापसा) यांच्यावर झालेल्या खूनी हल्ल्यातील सागर शिरोडकर समवेत सहाही संशयित आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष सुटका झाली. हा खटला सुरू असताना जखमी फिर्यादींचे निधन झाले होते.

भा.दं.सं.च्या 143, 147, 148, 504, 341, 307, 379, 506(2) व 149 कलमाखालील गुन्ह्यातून सागर सुरेश शिरोडकर, सुरेश सिताराम शिरोडकर, महेश उर्फ नागीन मनोहर केरकर, सिताराम उर्फ आजो सुरेश शिरोडकर, सुष्मिता सुरेश शिरोडकर, व उल्हास उर्फ बाबी सिताराम शिरोडकर (सर्व रा. थिवी) यांची दोषमुक्त सुटका करण्यात आली. याबाबतचा निवाडा म्हापसा अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी दिला.

न्यायालयात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील जे. सांतामारिया यांनी तर संशयितांच्या वतीने अ‍ॅड. विनायक पोरोब यांनी युक्तीवाद केला. फिर्यादींचे खटल्याच्या दरम्यान निधन झाले. त्यामुळे त्यांची न्यायालयात उलट तपासणी होऊ शकली नाही.  

 दरम्यान, हे प्रकरण 26 नोव्हेंबर 2010 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास घडले होते. फिर्यादी मयत जॉन्सन ब्रागांझा हे पॉल फोन्सेका (थिवी) यांच्या सोबत सोंडीवाडा थिवी येथील मानसी जवळील तलावात मोसे पकडण्यासाठी गेले होते. फोन्सेका हे मासे पकडण्यासाठी तलावात उतरले होते. तर फिर्यादी जॉन्सन हे काठावर थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर वरील संशयितांनी इतरांच्या सहाय्याने दंडूक्यांनी हल्ल चढविला होता.

 या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले होते. घटनेच्या काही दिवसांनी गोमेकॉतून उपचारार्थनंतर फिर्यादींना घरी पाठवण्यात आले होते. तर म्हापसा पोलीस स्थानकाचे तत्कालिन पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक रामा परब व उपनिरीक्षक उदय गावडे यांनी गुन्हा नोंदवून वरील सहाही संशयितांना अटक केली होती व त्यांच्या विरूध्द न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

हेही वाचा