मित्र वणव्यामधे गारव्यासारखा!

पत्रकारितेतील यशस्वी कारकिर्दीसोबतच विष्णू वाघ यांनी व्यंगचित्रकार, लेखक, कवी, नाटककार, दिग्दर्शक आणि धडाडीचा राजकारणी अशी लखलखती प्रतिमा स्वकष्टाने निर्माण केली. विष्णू वाघ यांचे व्यक्तिमत्व एखाद्या लोलकापेक्षाही अनेक पैलू असलेले असे डोळे दिपवणारे, आकर्षक होते.

Story: प्रासंगिक |
25th July, 12:00 am
मित्र वणव्यामधे गारव्यासारखा!

‘मित्र वणव्यामधे गारव्यासारखा...’ या एकाच ओळीत आमचे मित्र विष्णू सूर्या वाघ यांची  प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. आमचा मित्र विष्णू काय नव्हता? समाजमनाचा विचार करणारा सुज्ञ राजकारणी होता. आपल्या वक्तृत्वाने सभा जिंकणारा फर्डा वक्ता होता. आपल्या पहाडी आवाजात कविता सादर करणारा डोंगरी गावातला सुपुत्र होता. विष्णू वाघ यांची चिरेबंदी मैत्री आम्ही अनुभवली आहे. म्हणून कवितेच्या वरील ओळी आठवल्या. त्यांच्या प्रेमात केवळ गोवाच नाही तर अख्खा महाराष्ट्र होता. साहित्यातील असंख्य सारस्वतांच्या हृदयात त्यांचे स्थान होते. अजूनही त्यांची आठवण काढून गलबलणारी असंख्य मराठी मने महाराष्ट्रात वावरत आहेत. मित्र, कलावंत म्हणून त्यांचा वावर सर्वदूर होता. 

२४ जुलै १९६४ रोजी गोमंतकात जन्म घेतलेल्या आमच्या मित्राची असंख्य रुपे त्यांच्या चाहत्यांना भुरळ घालतात. त्यांची कारकीर्द लक्षणीय आहे. कोवळ्या तारुण्यात त्यांनी 'तरुण भारत'मधून पत्रकारितेला सुरुवात केली आणि त्यानंतर 'गोमन्तक' या मराठी दैनिकाचे संपादक म्हणून नावलौकिक मिळविला. पत्रकारितेतील या यशस्वी कारकिर्दीसोबतच विष्णू वाघ यांनी व्यंगचित्रकार, लेखक, कवी, नाटककार, दिग्दर्शक आणि धडाडीचा राजकारणी अशी लखलखती प्रतिमा स्वकष्टाने निर्माण केली. विष्णू यांचे व्यक्तिमत्व एखाद्या लोलकापेक्षाही अनेक पैलू असलेले असे डोळे दिपवणारे, आकर्षक होते.

मराठी आणि कोकणी या दोन्ही भाषांवर कमालीचे प्रभुत्व असलेल्या या अवलियाने, मराठी भाषेत एकूण बावीस नाटके, तीन संगीत नाटके, दीड डझन इतकी कोकणी नाटके, असंख्य एकांकिका असे विपुल लेखन केलेले आहे. सुमारे बावन्न नाटकांचे दिग्दर्शन करण्याचे भाग्य लाभलेला हा बावनकशी कलावंत तितकाच कलंदर आणि बहुआयामी होता. आपल्या अंगभूत गुणांमुळे दै. गोमन्तकचे संपादक, कला अकादमीचे अध्यक्ष, जागतिक मराठी अकादमीचे कार्यकारी सदस्य, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली. साहित्य, कला क्षेत्रातील मानाचे पुरस्कार त्यांनी पटकावले. महाराष्ट्र आणि गोव्यात यशवंतराव चव्हाण पुरस्कार, बा. भ. बोरकर पुरस्कार, दमाणी पुरस्कार, गोवा रत्न पुरस्कार, प्रा. अत्रे साहित्य पुरस्कार, धनंजय कीर पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारांचे धनी होण्याचे भाग्य या कलंदराला लाभले.

"या चांदण्या रातीला, 

सये जीव भारावला

रात फणा उगारून 

दंश करी चांदण्याला"

अशी सळसळती कविता लिहिणारा आमचा लाडका कवी "मरणापूर्वीच्या काही सूचना" लिहून गेला. कवितेतला अतिशय मानाचा "महाकवी कालिदास" हा किताब हातात मिरवत  मिरवत, "कटर् घंच कटर् घन्"च्या तालावर आमच्यातून निघून गेला! या घटनेला अर्ध्या दशकाहून अधिक काळ झाला तरीही पुढील जन्मभर आम्ही त्यांच्या आठवणी विसरू शकत नाही. त्यांची एक कविता कायम स्मरत राहणारी...

कळ्याही खुडल्या, फुले तोडली 

उजाड केला बगीचा

तरी कुणाच्या पायी 

काटा होऊन रुतलो नाही!


नरेंद्र गावकर

मुंबई