त्या शिक्षिकांच्या निलंबनानंतर असे प्रकार इतर भागांतील खासगी शाळांमध्ये घडणार नाहीत, याची हमी कुणीही देऊ शकत नाही. त्यामुळे खासगी शाळांमध्ये शिक्षकांना रुजू करून घेत असताना त्यांच्या पात्रतेसह चारित्र्य, मानसिकता तपासणेही अत्यंत गरजेचे आहे.
माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा गुरू आई-वडिलांनंतर शिक्षक असतो. शिक्षकाने दिलेले ज्ञान, केलेले संस्कार आणि दाखवलेल्या वाटेनुसार प्रामाणिकपणे पुढे गेल्यास यश निश्चित मिळते, हे प्रामाणिक आणि खोडकर विद्यार्थ्यांबाबतही घडल्याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. पण, कधीकधी शिक्षक ही भूमिका विसरून विद्यार्थ्यांना वठणीवर आणण्यासाठी वेगळ्या मार्गांचा अवलंब करण्यास सुरुवात करतात, तेव्हा परिस्थिती बदलते. परिणामी, समाजासमोर अनेक प्रश्न निर्माण होतात. अशीच स्थिती सध्या कामुर्लीत घडलेल्या घटनेवरून झाली आहे.
कामुर्ली येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीत सुरू असलेल्या सरस्वती विद्यामंदिर या खासगी शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने पाठ्यपुस्तकाची पाने फाडली, या कारणावरून तेथील दोन शिक्षिकांनी संबंधित विद्यार्थ्याला ज्या पद्धतीने बेदम मारहाण केली, ती पाहता क्षुल्लक कारणावरून स्वत:च्या विद्यार्थ्याशी अशा प्रकारे वागणाऱ्या शिक्षिका खरोखरच सरस्वतीच्या उपासक आहेत का? असा मोठा प्रश्न उभा राहतो. या घटनेनंतर संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलीस स्थानकात धाव घेऊन मारहाण करणाऱ्या दोन शिक्षिकांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर मारहाणीत त्या विद्यार्थ्याच्या अंगावर उठलेल्या वळांचे दर्शन सोशल मीडियावरील छायाचित्रांच्या माध्यमातून संपूर्ण गोव्याने पाहिले. त्यामुळे राज्यभरातील पालकांच्या ‘तळपायाची आग’ मस्तकात गेली. या प्रकरणाची राज्य सरकारने अर्थात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दखल घेतली आणि त्यानंतर काहीच तासांत सरस्वती विद्यामंदिरच्या प्रशासनाने या प्रकरणी दोन शिक्षिकांचे निलंबनही केले. अन्य कुणाचा राग या शिक्षिकांनी विद्यार्थ्यावर काढत त्याला बेदम मारहाण केल्याचा कयास व्यक्त करीत, कायद्यानुसार पोलीस संबंधित शिक्षिकांवर योग्य ती कारवाई करतील अशी हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पण, या प्रकरणामुळे मानवी आयुष्य घडवणारे शिक्षकच कधीकधी इतकी टोकाची भूमिका का घेतात? अशी कृत्ये करून त्यांना नेमके काय साध्य करायचे असते? विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करून त्यांना समाजाला काय दाखवून द्यायचे असते? आणि अशी कृत्ये करताना त्यांच्यातील ‘शिक्षक’ मृत पावतो का? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत.
राज्यातील अनेक खासगी शाळांमधील शिक्षक दर्जेदार कामगिरी करीत आहेत. त्यांच्यामुळे विद्यार्थी स्वत:च्या शाळेसह राज्याचे नावही चमकावत आहेत. अशा शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश येताच विद्यार्थ्यांसह पालकही आंदोलने करीत आहेत. अशा स्थितीत शिक्षक दिनाला चार दिवस शिल्लक असताना कामुर्लीतील दोन शिक्षिकांनी केलेला प्रताप चव्हाट्यावर आल्याने आणि त्यासंदर्भातील छायाचित्रे सोशल मीडियावर झळकल्याने गोमंतकीयांची मने किती दुखावली आहेत, हे सोशल मीडियासह पालकांकडून प्रत्यक्षात येणाऱ्या प्रतिक्रियांमधून स्पष्टपणे दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांना विविध कारणांवरून शिक्षकांकडून बेदम मारहाण झाल्याच्या तीन घटना राज्यात समोर आलेल्या आहेत. प्रत्येक घटनेत कारणे वेगवेगळी असून, सर्रासपणे राज्यातील खासगी शाळांमध्येच अशा घटना घडत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण का होते, याच्या कारणांचा शोध घेणे आणि असे प्रकार रोखण्यासाठी शिक्षकांचे समुपदेशन होण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पण, समुपदेशनासह या शिक्षकांना सेवेत रुजू करून घेत असताना त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. राज्यातील काही शिक्षक आपल्या भूमिकेला प्रामाणिकपणे न्याय देत आहेत. त्याची दखलही सरकार दरबारी घेण्यात येत आहे. पण, खासगी शाळांमध्ये शिकवणारे काही शिक्षक मात्र ‘हम करेसो कायदा’ यानुसार पुढे जात आहेत. अशा शिक्षकांवर वेळीच नियंत्रण ठेवणे आणि त्यांना वठणीवर आणणे ही शिक्षण खात्याची जबाबदारी आहे. उज्ज्वल भवितव्यासाठी शाळांमध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याची मनस्थिती, परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार त्याला घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची असते. या जबाबदारीतून पळवाटा न काढता, जबाबदारीला न्याय देत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासह आपलेसे करून घेण्याची क्लुप्ती शोधण्याचे कामही शिक्षकांनाच करावे लागेल. सोबतच विद्यार्थ्यांसोबत कसे वागावे याचे धडे देण्यासाठी सरकारलाही शिक्षकांसाठी काही वर्षांच्या अंतराने कार्यशाळा आयोजित कराव्या लागतील.
एकंदरीत, कामुर्लीत घडलेले प्रकरण निश्चितच खंतजनक आहे. या प्रकरणात सरस्वती विद्यामंदिरने दोन शिक्षिकांचे निलंबनही केले आहे. पण, त्या शिक्षिकांच्या निलंबनानंतर असे प्रकार इतर भागांतील खासगी शाळांमध्ये घडणार नाहीत, याची हमी कुणीही देऊ शकत नाही. त्यामुळे खासगी शाळांमध्ये शिक्षकांना रुजू करून घेत असताना त्यांच्या पात्रतेसह चारित्र्य, मानसिकता तपासणेही अत्यंत गरजेचे आहे.