‘आरडीए’अंतर्गत प्रत्येक मतदारसंघातील दोन कामे पूर्ण करू!

मंत्री गोविंद गावडे यांची हमी; केंद्राकडून मिळणारा निधी बंद झाल्याचीही माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th July, 03:13 pm
‘आरडीए’अंतर्गत प्रत्येक मतदारसंघातील दोन कामे पूर्ण करू!

पणजी : ग्रामविकास खात्यामार्फत (आरडीए) प्रत्येक मतदारसंघातील दोन कामे पूर्ण करून देण्याची हमी मंत्री गोविंद गावडे यांनी बुधवारी विधानसभा सभागृहात बोलताना दिली. आमदार विरेश बोरकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला यासंदर्भातील प्रश्न विचारला होता.

ग्रामविकास खात्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. कार्यरत अधिकाऱ्यांकडे इतर अनेक पदांचा अतिरिक्त ताबा आहे. त्याचा परिणाम मतदारसंघांतील कामांवर होत असल्याचा दावा आमदार बोरकर यांनी केला. त्यावर खात्यातील रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. कर्मचारी भरती आयोगामार्फत लवकरच रिक्त पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मंत्री गावडे म्हणाले. आमदार नीलेश काब्राल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, केंद्र सरकारने आरडीएसाठीची योजना बंद केलेली आहे. त्यामुळे त्याअंतर्गत राज्य सरकारला निधी मिळत नाही. परंतु, राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या निधीतून प्रत्येक मतदारसंघांतील दोन कामे पूर्ण करून दिली जातील. आमदारांनी त्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करून खात्याला प्रस्ताव सादर करावे, असे आवाहनही मंत्री गावडे यांनी केले.

केंद्राच्या योजनांचाही लाभ घ्या : मुख्यमंत्री

ग्रामविकास खात्यामार्फत ग्रामीण भागांचा विकास साधण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी राज्य सरकारने पुरेशा निधीची तरतूद केली आहे. याशिवाय केंद्रीय अर्थसंकल्पातही त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. केंद्राच्या योजनांचाही आमदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना केले.

हेही वाचा