वीज खात्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही

कुडतरीवासीय संतप्त : वीज पुरवठा सुरळीत करण्याचीही मागणी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24th July, 01:23 pm
वीज खात्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही

मडगाव : वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढलेले असून वीज खात्याचे लाइनमन किंवा अधिकारी त्या काळात कॉल घेत नाहीत. कार्यालयात कुणीही नसते व त्यामुळे संपर्क करणेच अशक्य बनते. त्यामुळे लोकांना वीज खंडित झाल्यास कधी येणार याची माहिती मिळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत कुडतरीतील नागरिकांनी अधीक्षक अभियंता राजीव सामंत यांची भेट घेत केली. 

  मायना कुडतरी येथील नागरिकांनी जिल्हा पंचायत सदस्य मिशेल रिबेलो व मरिनो रिबेलो यांच्या नेतृत्वाखाली मडगाव येथील वीज खात्याच्या कार्यालयाला भेट दिली. नागरिकांनी वीज खंडित होण्याच्या घटनांत वाढ झालेली असल्याने त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या. याशिवाय वीज खंडित झाल्यानंतर कार्यालयाशी, वीज लाइनमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास कुणीही प्रतिसाद देत नाहीत. वीज खंडित झाल्यानंतर पुन्हा वीज सुरळीत होण्यासाठी वेळ लागत असल्यास नागरिकांना काय झाले व वीज सुरळीत केव्हा होणार याची माहिती मिळण्याची गरज आहे. 

 पावसाळ्यात काहीवेळा झाडे पडत असल्याने वीज खंडित होण्याच्या घटना घडतात. वीज कर्मचार्‍यांकडून वीज पुरवठा सुरळीत राखण्यासाठी काम केले जात असल्याचे अधीक्षक राजीव सामंत यांनी सांगितले. तसेच कर्मचार्‍यांनी आवश्यक ती माहिती लोकांना दिल्यास लोकांना होणारा त्रास कमी होऊ शकतो असे एकाने म्हणले असता यावर त्यांनी कुडतरीतील व्हॉटसअप ग्रुपला कनिष्ठ अभियंत्यांचा नंबर दिला जाईल. त्यावर ते आवश्यक ती माहिती देतील असेही स्पष्ट केले. या बैठकीला कुडतरीत कार्यरत अभियंत्यांनाही बोलावण्यात आले होते.

भूमिगत वीज वाहिन्यांचे काम पुढील पावसाळ्यापूर्वी : सामंत

कुडतरी विभागात फोंड्यावरुन येणार्‍या वीजवाहिन्यांचे आठ खांब पुर्ववत केले जात आहे. भूमिगत वाहिन्यांचे ७ कोटींचे जे काम पूर्ण झालेले आहे, त्यावरुन वीज पुरवठा केला जाईल. याशिवाय ५१ कोटींचा व ११ कोटींचा असे दोन प्रकल्प पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जातील. कर्मचारी इतर कामांत राहिलेले असल्याने पथदीपांच्या दुरुस्तीचे काम लवकरच पूर्ण केले जातील, असे अधीक्षक अभियंता राजीव सामंत यांनी सांगितले.  

हेही वाचा