एकल महिला नाही, स्वतंत्र महिला

संसाराच्या नावाखाली स्वतःची गुणवत्ता हळूहळू संपवून टाकत प्रत्यक्षात जोडीदार असूनही मनातून एक एकट्या जगणाऱ्या महिलांसमोर एकल जगणाऱ्या महिला आता आदर्श वाटू लागल्या आहेत. म्हणूनच त्यांना यापुढे एकल न म्हणता स्वतंत्र महिला असे संबोधायला हवे.

Story: वर्तमान |
24th July 2024, 12:28 am

आपल्याकडे एकल महिलांबद्दल असा गैरसमज आहे, की एकल महिलांचे प्रश्न खूप असतात. त्यांचे जगणे गुंतागुंतीचे असते म्हणून त्यांच्या जगण्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. तेव्हाच एकल महिला समर्थपणे जीवनाला सामोरे जाऊ शकते; पण हे गैरसमज सर्व खोटे असून आज अनेक एकल महिला एकल म्हणून घाबरत न जगता त्या स्वतंत्र कर्तृत्वाने जगताना दिसत आहेत. आपले प्रश्न आपणच सोडविण्यासाठी पुढे येत असून यातील काही महिला तर एकल महिलांची संघटना उभी करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. या महिलांचे कर्तृत्व सलाम करण्यासारखे असून समाजातील विचारी वर्गाने एकल महिला चळवळीला प्रोत्साहनच दिले पाहिजे.

आज समाजात पती निधनानंतर अनेक महिला एकट्या जगत आहेत. नवऱ्यापासून विभक्त झाल्यावर अनेक महिला एकट्या राहत आहेत. काही महिला तर 'लग्नसंस्था' या विरोधात बंड करून पुरुषसत्ताक व्यवस्थेला आपण बळी जायला नको म्हणून आयुष्यभर एकट्या जगत आहेत; पण यापुढे मात्र त्यांना एकल महिला न म्हणता स्वतंत्र महिला असे म्हणायला हवे. दुर्दैवाने एवढी समज आपल्या समाजाची वाढली नसल्याने अशा एकल महिलांकडे हजारो पुरुषी नजरा लागलेल्या असतात. हे त्यांचे दुर्दैव नाही तर ही समाजाची वैचारिक अधोगती आहे. ही वैचारिक अधोगती जेवढी अधिकाधिक होत राहणार तेवढ्या या स्वतंत्र महिला पेटून उठून स्वतःचे कर्तृत्व अधिकाधिक सिद्ध करत राहणार. पुढील काळातील हे सत्य आपण समजून घ्यायला हवे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुमारे दीडशे वर्षांपूर्वी ताराबाई शिंदे या स्त्रीवादी लेखिकेने आणि सत्यशोधक कार्यकर्त्या कर्तबगार स्त्रीने उपस्थित केलेले प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. त्यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास त्या म्हणतात, की पतिराज एकदा स्वर्गवासी झाले म्हणजे या बाईसाहेबांचे हाल कुत्रे खात नाही. त्यांच्या कपाळी काय मग? सर्व अलंकार गेले. सुंदरपण गेले. तिला कोठे लग्नकार्यात, समारंभात, जेथे काही सौभाग्यकारक असेल तेथे जाण्याची बंदी. का? तर तिचा नवरा मेला. हे एवढे सारे प्रश्न  १८८२ मध्ये ताराबाई शिंदे यांनी आपल्या ‘स्त्रीपुरुष तुलना’ या ग्रंथांत उपस्थित केले आहेत  आणि अजूनही समाज याच नजरेने या एकल महिलेकडे बघताना दिसतो आहे.

अलिकडेच एकल महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढे येऊ पाहणाऱ्या एकल चळवळीतील कार्यकर्ता स्त्रीशी संवाद झाला. त्या संवादातून एक गोष्ट लक्षात आली, की बदलत्या काळाबरोबर एकल महिला आपले प्रश्न आपल्या समस्या सोडविण्यासाठी समर्थ असून त्या समस्येच्या मुळाशी जाऊन स्वतंत्रपणे विचार करताना दिसत आहेत. हा विचार स्वतःच्या सजग जगण्यासंदर्भात असेल, स्वतःच्या कर्तृत्व सिद्ध करण्यासंदर्भात असेल किंवा पुढील काळातील स्वतःचा जोडीदार निवडण्यासंदर्भातील असेल त्या या सगळ्या संदर्भात प्रचंड जागरूक असल्याचे दिसून आले. ही गोष्ट खूप चांगली असून जोडीदार म्हणजे नुसते नवरा बायकोचे नाते नाही, तर एकमेकांसाठी जे योग्य असेल ते सर्वस्वी अर्पण करण्याचे मित्र मैत्रीणीचे म्हणून सहजीवनच होय. सहजीवनाचा खरा अर्थ एकल महिलांना जेवढा कळलेला असतो तेवढा प्रत्यक्षात सहज जीवन आयुष्यभर जगून अनेकांना कळलेला नसतो. याचे कारण पुरुषसत्ताक व्यवस्थेला एकल महिला बऱ्याच वेळा सामोरे गेलेल्या असतात. पुरुष व्यवस्थेने एकल महिला अबला आहे, याच नजरेने त्यांच्याकडे पाहिलेले असते. त्या कोणतेही कर्तृत्व एकटे राहून सिद्ध करणार नाहीत, असा समज या पुरुष वर्गाचा झालेला असतो. या सगळ्यातून तावून सुलाखून निघाल्यामुळे एकल स्त्रीने सहजीवन स्वीकारायचा पुढील काळात निर्णय घेतला तर ती खूप विचार करूनच घेत असते. हा विचार करताना प्राधान्याने ती पुढील विचाराला अग्रक्रम देते. आपला जोडीदार नवऱ्याचे अधिराज्य गाजविणारा नसावा, तो आपल्या समविचाराचा असावा, एकल महिलेला मुले असतील तर त्या मुलांची जबाबदारी स्वतःचीच मुले आहेत, या पद्धतीने जोडीदाराने घ्यावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या एकल महिलेला ती आधी माणूस आहे हे स्वीकारून तिला जे जे हवे ते स्वातंत्र्य दिले जावे. या सगळ्या विचारांच्या अटीमध्ये बसणारा किंवा या अटी स्वीकारणारा जोडीदार आता सहजीवन जगू पाहणाऱ्या बहुसंख्य एकल महिला स्वीकारताना दिसतात.

आपल्याकडे स्वतंत्रपणे कमावणाऱ्या स्त्रियांनासुद्धा संसार करताना या गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. स्वतंत्र विचार करून स्वतःच्या गुणवत्तेला वाव देत जगणाऱ्या महिलांची प्रचंड कोंडी केली जाते आणि अशा महिला आपल्यात मोठी गुणवत्ता असूनही निव्वळ घरच्या लोकांना किंवा समाजाला घाबरून आपली गुणवत्ता आयुष्यभर कधीच विकसित करत नाहीत. बराच वेळा तिच्या स्वतंत्र विचाराला संपवण्याची प्रक्रिया तिच्या कुटुंबातूनच होत असते, तर दुसऱ्या बाजूला तिने कमावलेल्या उत्पन्नावर हक्क ठेवूनही तिची शारीरिक आणि मानसिक कोंडीही केली जाते. आयुष्याला थेट भिडल्याशिवाय जगणे समृद्ध करता येत नाही आणि आपल्यातली गुणवत्ताही विकसित करता येत नाही. याचे भान अनेक महिला विसरलेल्या दिसतात. 

अशावेळी स्वतंत्र विचाराने जगणाऱ्या एकल महिला संसाराच्या नावाखाली स्वतःला संपवून घेत जगणाऱ्या महिलांसमोर आदर्शवतच असतात हे सत्य आहे आणि एकल महिलांची सकारात्मक बाजू दाखविणारेही आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर संसाराच्या नावाखाली स्वतःची गुणवत्ता हळूहळू संपवून टाकत प्रत्यक्षात जोडीदार असूनही मानातून एक एकट्या जगणाऱ्या महिलांसमोर एकल जगणाऱ्या महिला आता आदर्शच वाटू लागल्या आहेत. म्हणूनच त्यांना यापुढे एकल न म्हणता स्वतंत्र महिला असे संबोधायला हवे.


अजय कांडर

(लेखक विख्यात कवी, 

व्यासंगी पत्रकार आहेत.)

मो. क्र. ९४०४३९५१५५