विरोधकांप्रमाणेच सत्ताधाऱ्यांतही फूट !

आपल्यामध्ये कोण मोठा ही स्पर्धा लावण्यापेक्षा एकमेकांच्या मदतीला जाऊन सरकारच्या चुकांवर बोट ठेवणे, आवश्यक त्यावेळी आक्रमक होणे यात विरोधात असणाऱ्या सर्वांचेच हित आहे. विरोधक सरकार पक्षाला जाब विचारण्यात कमी पडले, तर राज्यभर जे लोक अधिवेशन पाहत आहेत त्यांच्यात विरोधकांविषयी वेगळा, चुकीचा संदेश जाऊ शकतो याचे भान ठेवावे लागेल.

Story: उतारा |
21st July, 04:43 am
विरोधकांप्रमाणेच सत्ताधाऱ्यांतही फूट !

राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू झाले. पहिल्या आठवड्यात दोन दिवस प्रश्नोत्तरांचे तास वाया गेल्यानंतर उर्वरित तीन दिवसांच्या प्रश्नोत्तरात राज्यासंदर्भात अनेक चांगले विषय चर्चेला आले. शुक्रवारी खासगी विधेयकांमधून काही महत्त्वाच्या विषयांवरून आमदारांनी सरकारकडून आश्वासन मिळवले. विरोधकांनी सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांच्या चुकांवर बोट ठेवले. विरोधकांसोबत सत्ताधारी गटातील काही आमदारही आपल्याच मंत्र्यांना चिमटे काढताना दिसले. काही मंत्र्यांना सॉफ्ट कॉर्नर आणि काही जणांना थेट लक्ष्य करण्याच्या विरोधकांच्या कृतीमुळे सत्ताधारी गटातही सध्या चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्र्यांवरही थेट बोलणारे विरोधक काही मंत्र्यांना हातचे राखून विचारतात आणि म्हणावे तेवढे आक्रमकही होत नाहीत असेच चित्र आहे. विरोधात असलेल्या सात आमदारांची एकजूट नाही, हेही या आठवड्यात प्रकर्षाने जाणवले ते नमूद करावेच लागेल. याच आठवड्यात सरकारवर आरोप करून, मंत्र्यांवर आरोप करून विधानसभेचे कामकाज काही आमदारांनी चर्चेत आणले. मंत्री, आमदारांची खडाजंगी दिसली. एकजूट नसली तरी विरोधकांमधून विषयांचे अभ्यासपूर्ण विवेचन होतानाच काही विषय पोटतिडकीने मांडण्यातही विरोधक यशस्वी ठरले. नीलेश काब्राल यांचे मंत्रिपद गेल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या मदतीला येणारा तसा आमदार सत्ताधारी गटात कोणी दिसला नाही. पण मुख्यमंत्री आक्रमकपणे सरकारची बाजू मांडताना दिसतात. अधिकाऱ्यांकडून योग्य माहिती पुरवली जात नाही असे काहीवेळा आढळून आले आहे. तर काहीवेळा अधिकाऱ्यांवर विधानसभेतच आरोप झाले. काही जणांवर वैयक्तिक टीका आमदारांनी केली. त्यात एका अधिकाऱ्याला निलंबन पहावे लागले. विरोधक सात असले आणि सत्ताधारी बाकांवर ३२ जण असले तरीही पहिल्याच आठवड्यात विरोधकांनी सरकारला वेगवेगळ्या प्रश्नांवरून घेरले. ८ ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालणार आहे. विस्कळीत असलेले विरोधक एकमेकांच्या मदतीला आले तर बरीच बाजू मारता येईल. विरोधकांमध्ये फूट राहिली तर सत्ताधारी गटाचाच यातून फायदा होणार आहे.

आठवडाभरात गोवा माईल्स, स्थानिक टॅक्सीचालक यांच्यासह भंगार अड्डे, पावसामुळे घरांचे आणि शेतीचे झालेले नुकसान, भटकी कुत्री, दृष्टी लाईफ सेव्हिंग, बाऊन्सर, पर्यटन खात्यातील इव्हेंट आणि रोड शो, लाडली लक्ष्मी, गृह आधार, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, जनमत कौल, नावशीचा नियोजित मरिना प्रकल्प अशा अनेक विषयांवर विधानसभेत चर्चा झाली. आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्यावर आलेल्या हक्कभंग प्रस्तावावरून दोन दिवस सत्ताधारी गटाने गदारोळ घातल्यामुळे पहिले दोन दिवस प्रश्नोत्तरांचा तास झाला नाही. अजून अनेक विषय चर्चेला यायचे आहेत. कितीतरी प्रश्नांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज आहेत. जशी विरोधकांमध्ये एकजूट नाही, तशीच स्थिती सत्ताधारी गटात आहे. सत्ताधारी गटातील काही आमदार सरकारला ‘घरचा आहेर’ देत असतात. आपल्या मतदारसंघातील विषय उपस्थित करताना सरकारमधील मंत्र्यांचे अपयशही दाखवत असतात. मायकल लोबो, प्रवीण आर्लेकर यांनी पहिल्या आठवड्यात सरकारला घेरले. लोबो तर पुन्हा पुन्हा सरकारवर तोफ डागत आहेत. काही मंत्री एरव्ही आपल्या खात्याच्या निर्णय प्रक्रियेत मुख्यमंत्र्यांनाही जुमानत नाहीत अशी चर्चा असते. पण विधानसभेत अशा मंत्र्यांना जेव्हा विरोधक घेरतात तेव्हा मुख्यमंत्रीच त्यांच्या मदतीला जातात. काही मोजकेच मंत्री सरकार पक्षाच्या मदतीला येतात, त्यातील एक सुदिन ढवळीकर. बहुतेकजण आपण बरा की आपले काम बरे अशाच अविर्भावात आहेत. अधिवेशनापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी गटातील आमदारांना विरोधकांसारखे वागू नका, असे बजावले होते. हा सल्ला काही आमदारांनी गांभीर्याने घेतला आहे असे दिसत नाही. काही जणांना अद्यापही सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान मिळालेले नाही, त्यामुळे ते नाराज आहेत. या सगळ्या गोष्टींचा रोष सरकारवर काढला जातो. त्यातूनच विरोधकांत जशी फूट दिसते तशीच ती सत्ताधारी गटातही दिसते.

प्रश्नोत्तर, लक्षवेधी सूचना, खासगी ठराव आणि अर्थसंकल्पावरील चर्चा या गोष्टींमुळे मंत्र्यांची कसोटी लागणार आहे. काही जणांना पहिल्याच आठवड्यात विरोधकांनी झलक दाखवली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, विजय सरदेसाई, कार्लुस फेरेरा, वेन्झी व्हिएगश, विरेश बोरकर आणि क्रुझ सिल्वा यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवरून सरकारला घेरले. काही ठराविक मंत्र्यांना विरोधातील काही महत्त्वाचे नेते जाब विचारत नाहीत असे दिसते. विरेश बोरकर रिव्हॉल्यूशनरी गोवन्सचे (आरजी) आमदार असल्यामुळे आरजीची झळ बसलेल्या मतदारसंघांतील सत्ताधारी गटातील काही आमदार विरेशला विधानसभेत वेळोवेळी हिणवण्याचा प्रयत्न करतात असेही काहीवेळा दिसून आले. पण अशावेळी युरी आलेमाव विरोधातील आमदारांच्या मदतीला कायम धावतात ही एक जमेची बाजू आहे. विरोधकांनी आपल्यामध्ये कोण मोठा ही स्पर्धा लावण्यापेक्षा एकमेकांच्या मदतीला जाऊन सरकारच्या चुकांवर बोट ठेवणे, आवश्यक त्यावेळी आक्रमक होणे यात विरोधात असणाऱ्या सर्वांचेच हित आहे. विरोधक सरकार पक्षाला जाब विचारण्यात कमी पडले, तर राज्यभर जे लोक अधिवेशन पाहत आहेत त्यांच्यात विरोधकांविषयी वेगळा, चुकीचा संदेश जाऊ शकतो याचे भान ठेवावे लागेल.


पांडुरंग गांवकर, दै. गोवन वार्ताचे संपादक आहेत. मो. ९७६३१०६३००