बेल्स पाल्सी कसा होतो..

डॉक्टरांनी पॅरालिसिस, नर्व्ह कंडक्शन यासारखे शब्द घेताच आधी भीती वाटली मग त्यांनी समजावले की, तिला बेल्स पाल्सी हा एक सामान्य न्यूरोलॉजिकल आजार झाला आहे. बेल्स पाल्सी ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये चेहऱ्याच्या एका बाजूचे स्नायू कमकुवत होतात किंवा एका बाजूला पक्षघात होतो. चेहऱ्याच्या स्नायूंपर्यंत जाणाऱ्या फेशियल नसेला सूज आल्याने ही समस्या होते.

Story: आरोग्य |
20th July, 03:52 am
बेल्स पाल्सी कसा होतो..

तृप्ती हल्लीच नवीन कामावर रूजू झालेली. आधीपेक्षा जरा दूर असल्याने स्कुटरनेच ये-जा करत होती. काही दिवसांपासून कान दुखत होता पण मधे सुट्टी नसल्याने तिने जरा दुर्लक्षच केलेलं. पण आज कामावरून घरी पोहचल्या पोहचल्या अचानक तिला आपले तोंड भारी वाटू लागले. आरशात तोंड धुताना आढळले, की अरे.. चेहऱ्याच्या उजव्या बाजूची हालचाल कमी झालीये... तासाभरात तोंडात चूळ भरता येईना तसेच उजवा डोळा पूर्ण बंद होईना... सकाळपर्यंत चेहऱ्याच्या उजव्या भागात काहीच जाणवेना, उजवी भुवई हलेना. अन्न चघळण्यात आणि गिळण्यातही त्रास होऊ लागला. घाबरीघुबरी होऊन तिने ताबडतोब डॉक्टरकडे धाव घेतली.

 डॉक्टरांनी पॅरालिसिस, नर्व्ह कंडक्शन यासारखे शब्द घेताच आधी भीती वाटली मग त्यांनी समजावले की, तिला बेल्स पाल्सी हा एक सामान्य न्यूरोलॉजिकल आजार झाला आहे. बेल्स पाल्सी ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये चेहऱ्याच्या एका बाजूचे स्नायू कमकुवत होतात किंवा एका बाजूला पक्षघात होतो. चेहऱ्याच्या स्नायूंपर्यंत जाणाऱ्या फेशियल नसेला सूज आल्याने ही समस्या होते. स्नायूंवर झालेला परिणाम तात्पुरता असतो व उपचार केल्यावर ही स्थिती पूर्णपणे बरी होते. अगदी काही स्थितींमध्ये आजारात गुंतागुंती झाल्याने चेहऱ्याच्या स्नायूंचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

- बेल्स पाल्सीमुळे चेहऱ्याचा एकाच बाजूच्या स्नायूंवर परिणाम होतो. पण १ % लोकांमध्ये, दोन्ही बाजूंवर परिणाम आढळून येऊ शकतो.

- चेहऱ्याच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या नसेवर परिणाम होतो. यामुळे रुग्णाला परिणाम झालेल्या बाजूचे डोळे मिटण्यास, तोंड उघडण्यास, हसण्यास व चावण्यास त्रास होतो.

 - परिणाम झालेल्या चेहऱ्याच्या बाजूला दुखू शकते.

 - स्नायू अशक्त झाल्यामुळे, डोळ्याच्या पापण्या खाली झुकतात आणि तोंडातून लाळ गळते.

- जिभेच्या पुढील भागाने चव ओळखता येत नाही.

याची मुख्य कारणं काय आहेत?

- बेल्स पाल्सी होण्याची नेमकी कारणे माहीत नाहीत.  पण, हर्पिस सिम्प्लेक्स, हर्पिस झोस्टर, एचआयव्ही, सायटोमेगालोव्हायरस आणि एपस्टाईन बार व्हायरस यासारख्या अनेक व्हायरल इन्फेक्शन्समुळे हा रोग होऊ शकतो.

- मधुमेह, लठ्ठपणा, गर्भावस्थेतील शेवटचे तीन महिने, प्रसूतीनंतर एक आठवडा, वाढलेला बी.पी., अपर रेस्पीरेटरी ट्रॅक्टच्या समस्या, सर्दी/ फ्लू किंवा कुटुंबात हा रोग आधी कोणाला झालेला असल्यास बेल्स पाल्सी होण्याची शक्यता वाढते.

- चेहऱ्याला, कानाला किंवा नसांना झालेली कुठलीही दुखापत, सूज, संसर्ग यामुळे बेल्स पाल्सी होऊ शकते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

निदान शारीरिक तपासणी, इमेजिंग आणि ब्लड टेस्टद्वारे केले जाऊ शकते.

- लक्षणे बघून डॉक्टर चेहऱ्याच्या हालचाली तपासतात.

- एमआरआय किंवा सीटी स्कॅनसारख्या इमेजिंग तंत्रांच्या साहाय्याने चेहऱ्याचे स्नायू तपासले जातात.

- व्हायरल इन्फेक्शनची शक्यता वाटल्यास डॉक्टर ब्लड टेस्ट करायला सांगतात.

- स्ट्रोक, लाइम रोग आणि ब्रेन ट्यूमर सारखे इतर रोग वगळून निदान करण्यात येते.

बेल्स पाल्सीवर उपचारासाठी, डॉक्टर सामान्यतः अँटी-व्हायरल औषधे आणि स्टिरॉइड्स लिहून देतात. फेशियल नर्व्हला झालेली ईजा मोजण्यासाठी नर्व्ह कंडक्शन चाचणी केली जाऊ शकते. चेहऱ्याच्या स्नायूंच्या कमकुवतपणाची तीव्रता आणि बरे होण्यासाठी लागणारा वेळ यावर अवलंबून, फिजिओथेरपी दिली जाऊ शकते. यामध्ये चेहऱ्याच्या कमकुवत स्नायूंना व्यायाम व गॅल्व्हॅनिक विद्युत उत्तेजनाचे 'मसल स्टिमुलेशन' दिले जाते. स्नायूंच्या कमकुवतपणामुळे पापण्या बंद करण्यास त्रास होत असल्यास डोळ्यांची काळजी घ्यावी लागते. डोळ्यातील कोरडेपणा कमी करण्यासाठी आय ड्रॉप्स दिले जातात. सुमारे ८५ % प्रकरणे तीन आठवड्यांत पूर्णपणे बरी होऊ शकतात. आपल्याला कशामुळे झाला असेल हा विचार मनात चालू असताना डॉक्टर पुढे तृप्तीला समजाऊ लागले. कदाचित पावसाळ्यात, थंड वाऱ्यात स्कुटर चालवल्याने हे झाले असेल. पण फक्त थंडीमुळे, वार्‍यामुळे बेल्स पाल्सी होत नाही. सर्दीमुळे एखादा विषाणू सक्रिय होऊ शकतो व थंड हवा आणि कमी तापमान, वाऱ्याच्या वातावरणात चेहऱ्याच्या स्नायूंची लवचिकता आणि गतिशीलता कमी होऊ शकते व नसेला सूज येऊन बेल्स पाल्सी होऊ शकतो.

लक्षणे स्ट्रोक सारखीच असली तरी, बेल्स पाल्सी म्हणजे पक्षाघाताचा झटका नाही व हे दूर ठेवण्यासाठी कोणतेही लसीकरण उपलब्ध नाही पण हे सांसर्गिक नसल्याने सहसा पुनरावृत्ती होत नाही.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर