नदीला पाहताना...

एखादे ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी कायमचे स्थायिक होणे खूप वेदनादायी असते. या गोष्टींना सामावून घेताना लहान-लहान गोष्टींमधून नाती थोडीशी का असेनात पण दुरावली जातात.

Story: सय अंगणाची |
13th July, 12:32 am
नदीला पाहताना...

बालपणीचं गाव सोडल्यानंतर माणसांपेक्षा मी जास्त निसर्गाशी जोडले गेले. याचे कारण म्हणजे बाबांनी विकत घेतलेली जमीन. किंदळ, फणस, उसकी अन् वेली-झुडपांनी गच्च भरलेली. जमीन मालकाने आम्हाला दिलेल्या जागेत फक्त दोन-चार काजूची झाडे. सुरुवातीला कौलारू घराचे छप्पर आम्हाला मिळाले. संध्याकाळ झाली की सगळीकडे सामसूम. माणसांच्या दुनियेपासून अलिप्त झाल्यासारखे. घरापासून दोन मिनिटांच्या वाटेवर रस्ता होता परंतु सुरुवातीला तोही दूर वाटायचा. कौलारू घर, वीज तर नव्हतीच त्यामुळे केरोसीनचे दिवे. रस्त्यानजीकच्या घरातून फक्त पिण्यासाठी पाणी. वापरातील पाणी तर नदीचेच. घराशेजारीच असलेली नदी म्हणजे आमच्यासाठी आधार होती.

सुरुवातीला गावातील लोकांशी ओळख साधणे कठीण होते. बालपणीच्या गावापेक्षा हा गाव वेगळाच होता. नवीन घरात तर माझा प्रवेश एक वर्ष उशिरानेच झाला. त्यामुळे नवीन घरात आणि नव्या गावात प्रवेश हे सगळे माझ्यासाठी अनोळखीपणाचे नाते असल्यासारखे होते. इथे आपले असे कुणीच नव्हते. प्रत्येकाच्या नजरा फक्त न्याहाळत राहणाऱ्या दिसायच्या. माध्यमिक शिक्षणाचा प्रवास इथून सुरू झाला. सतत नजरेसमोर दिसणारे माझ्या वयाचे चेहरे नंतर नंतर जरा ओळखीचे वाटू लागलेत. एक-दोन वर्षं खरे तर मी बोललेच नाही कुणाशी. नुसते स्मितहास्य करायचे. 

अगदी मला पहिल्या भेटीला आवडलेली नदी. एका मोठ्या खडकावर बसून नदीत दगड फेकत तिला नुसतं पाहणं. तिच्याच काठावर पाहिलेली चोर्लेकर आजोबांची पुरणशेती. शेतात नांगरणी चालू असताना त्या चिखलात उड्या मारून नंतर पूर्णपणे नदीत बुडणे, घरी जाऊन पडल्याचे नाटक करणे. या आठवणी कधी पुसून न जाणाऱ्या आहेत. एखाद रविवारी मी बाबांसोबत म्हणून नदीवर जायचे. न थकता एक मोठी कळशी उजव्या खांद्यावर, तर एक जरा लहान डाव्या हातात घेऊन बाबा नदीचे पाणी सगळ्या कुटुंबासाठी आणायचे. नदी जवळ होती परंतु चढ-उतारामुळे एकदम थकायला व्हायचं. बाबा पाण्यात कळशी बुडवताना एकदम शिव्या घालू लागले. “पैसं खातीनं खातीनं आनि न्हला च्यायला सोपवून ट्याकतीन.” बाबांना त्यावेळी मी विचारले नेमकं प्रकरण काय ते. बाबा नुसते बडबडले “काय नाही लेकी, तीन महिनं साठलेल्या घानीतलं पानी खायाचं लागन आनि मग रेब्याच पानी न्यहाचं लागन.” मला त्यावेळी तसं काही समजलंच नाही. दररोच कुणी ना कुणी सरकारी कचेरीतली माणसं नदीच्या दिशेने यायची. 

एक दिवस दुपारी शाळेतून घरी जाताना बसमधून उतरल्यानंतर वाटेवर जेसीबी भेटली आणि त्या चालकाने मला, “नदी किदर है?” असं विचारलं, यावर मी त्याला दिशा सांगितली आणि पळत घरी आले. बाबांना सांगताच बाबा अक्षरश: रागातच बडबडू लागले. “बंधारा ब्यानला क्य हे लोक कितकं वर सरतीनं क्य न्हला पुरवून ट्याकतीनं हेच कळाचं नाही.” मला या गोष्टींवर त्यावेळी विचारही करता येत नव्हता. कालांतराने बंधाऱ्याचं काम सुरू झालं. एप्रिल महिन्याच्या आसपास हे काम सुरू झालेलं. त्यावेळी नदीचा प्रवाह सुरूच होता. पाण्याची पातळी जराशी कमी होती. आम्ही जिथून पाणी आणायचो, तिथे एक खोल भितीदायक कोंड होती. कामगारासहित सगळी साधने घराशेजारून दररोज जाता-येता दिसू लागली. कंत्राटदार गावातील कामगार शोधू लागले. सुट्टी असल्यामुळे शाळकरी मुले कामावर रुजू झाली. तसे कुणी श्रीमंत घरातले नव्हतेच. या मुलांना पाहून मीही जायचं ठरवलं. त्यावेळी मी सातवीतून आठवीत जाणार होते. वयाने एक-दोन वर्षं मोठी अशीच आम्ही गावची मंडळी. दिवसाला शंभर रुपये पगार. एक महिना काम केले तर तीन हजार भेटतील हा आनंद होता त्यावेळी. सुरुवातीला बिगर गोमंतकीय कामगारांसोबत काम करताना भीती वाटायची. कारण एकदा सुरुवात केली की न थांबणारे ते. नदी उपसताना भरलेल्या कायली एकमेकांच्या  डोक्यावर न देता हातून जिंकून घेणे प्रकरण आज आठवले की डोळे भरून येतात. 

त्यावेळी गावातील अनेक जणांशी बऱ्यापैकी ओळख झालेली. आई मला जाऊ नको सांगायची तरीही मी त्यावेळी न ऐकणाऱ्यांपैकीच. माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मैत्रिणी सांगायच्या भिऊ नकोस. वनिताला आमी सांभाळून घेऊ. आणि एक मजा कशी वाटायची. परंतु नाजूक हातांची असल्याने त्यावेळी खूप त्रासदायक असायची ही कामं. हातात ग्लोव्ज घातले तरी माझ्या बोटांना भेगा पडायच्या. जणू नदीच्या वेदना थोड्याफार आम्हालाही व्हायच्या. त्यावेळी बालकामगार असा आक्षेपही कुणी घेतला नाही कारण त्यावेळी पैशांची खरी गरज भासायची माझ्यापैकी प्रत्येकाला. 

नदीचं खोदकाम चालू असताना नकळतपणे ती खोल, काळं पाणी आहे की काय अशी वाटणारी कोंड दिसायची. एकदिवस त्या कोंडीत प्रवेश करायचा असं आम्ही सगळ्यांनी ठरवून एकमेकांच्या सोबतीने आत उतरण्यासाठी गेलो. परंतु आत पाय ठेवल्यानंतर खाली जायला होतं असे सगळेजण त्यावेळी सांगायचे तसं काही झालंच नाही. मी सोबतीला असलेल्या मित्र-मैत्रिणींच्या सोबतीने ती कोंड पार केली. बाबांना येऊन सांगितले. त्यावेळी ते पुटपुटले, “सरकाराच्या मड्यानी भरली क्योंड.” बाबांचा एवढा आक्षेप का होता हे मला त्यावेळी समजले नाही.

आम्ही दररोज कामाला जायचो. मंगळवारी सुट्टी असायची. त्यावेळी मात्र जगातलं सुख प्राप्त झाल्यासाखी झोप लागायची. त्यावेळी कोवळ्या शरीराला वेदना जाणवत नव्हत्या परंतु काही काळाने माझ्या वयाच्या कितीतरी जणांना वेदना व्हायच्या. “कोवळ्या वयातलं काम ब्याहीर सरलं” असं नेहमी आमची आत्या घरी आली की म्हणायची. बंधाऱ्याचे काम चालू असताना नदीच्या त्यावेळीच्या वेदना आज शरीराला जाणवतात. आपणही अपराधी आहोत तिला पोखरण्यात. आज नदीवर बंधारा आहे पण नदीचा प्रवाह मध्येच खंडित झाल्यासारखा वाटतो. जी कोंड तिच्या अस्तित्वाची ओळख होती, तीच आज तिच्यापासून हरवलेली दिसतेय. दोन महिने तुडुंब भरलेले बंधाऱ्यावरती नुसत्या पंपचा आवाज. शांत, निरागस वाहणाऱ्या नदीचा आवाज तर कधीचाच दाबला गेला. 

त्यावेळी बंधाऱ्याचे काम करताना आपण सर्वांनी मिळून बंधारा प्रकरण नको म्हणून थांबवले असते तर कदाचित आज बारामाही वाहणाऱ्या नदीने डब्यक्याचे रुप धारण केलेच नसते कदाचित. आज तिला जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पाहताक्षणी शरीरावरच्या वेदनेपेक्षा तिच्याच वेदना जास्त जाणवू लागतात. बंधारा नुसता निपचित आहे. तिच्या खंडित प्रवाहावर राज्य केल्यासारखा...


ओनिता रामा वरक, पाल-ठाणे‌, सत्तरी.