जम्मूतील दहशतवादी हल्ल्यांना जशास तसे उत्तर आवश्यक

जम्मू-काश्मीर

Story:  राज्यरंग |
12th July, 12:40 am
जम्मूतील दहशतवादी हल्ल्यांना जशास तसे उत्तर आवश्यक

राज्यात पुन्हा दहशतवाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. दहशतवाद्यांकडून लष्कराचे जवान, स्थानिक लोक यांना लक्ष्य केले जात आहे. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून प्रत्युत्तरही दिले जात आहे आणि यामध्ये दहशतवाद्यांचे मुडदे पडत आहेत. मागील सात-आठ वर्षांपासून शांत असलेले खोरे पुन्हा धगधगत ठेवण्याचे प्रयत्न देशविरोधी शक्तींकडून केले जात आहेत. या प्रकाराला वेळीच जशास तसे उत्तर देऊन पुन्हा वळवळू लागलेली ही कीड वेळीच नष्ट केली पाहिजे.

जम्मूच्या कठुआपासून १५० किलोमीटर अंतरावरील लोहाई मल्हारमधील बदनोटा गावाजवळ माचेडी-किंडली-मल्हार मार्गावर नियमित गस्तीवर असलेल्या लष्कराच्या ट्रकवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले आणि गोळीबार केला. लष्कराचे वाहन कठुआच्या बडनोटा येथील डोंगराळ भागात गस्तीसाठी निघाले होते. एका बाजूला दरी असल्याने वाहनाचा वेगही कमी होता, त्याचा फायदा दहशतवाद्यांनी घेतला. हल्ल्यावेळी स्थानिक नागरिकाने गाईड बनून दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय आहे. सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात पाच जवान हुतात्मा आणि सहा जण जखमी झाले. ही घटना भारतीय लष्कराच्या ९ कॉर्प्सच्या हद्दीत घडली. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले; परंतु दहशतवादी जंगलात लपून बसले. बंदी घातलेल्या पाकिस्तानस्थित ‘जैश-ए-मोहम्मद’ (जेईएम)ची संघटना ‘काश्मीर टायगर्स’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. संघटनेने आगामी काळात आणखी हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. हा हल्ला म्हणजे २६ जून रोजी डोडा येथे तीन दहशतवाद्यांच्या हत्येचा बदला असल्याचे संघटनेने म्हटले आहे. ‘हिजबुल मुजाहिदीन’चा कमांडर बुरहान वानी याच्या आठव्या पुण्यतिथीच्या दिवशी हा हल्ला करण्यात आला.

एका महिन्यातील जम्मू विभागात हा सहावा मोठा, तर कठुआ जिल्ह्यातील हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. कुलगाम भागात दोन वेगवेगळ्या हल्ल्यांत सहा दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याच्या अवघ्या २४ तासांनंतर हा हल्ला झाला. शनिवारी एका चकमकीत एका पॅराट्रूपरसह दोन जवानांना जीव गमवावा लागला, तर एक जवान जखमी झाला होता. जूनमध्ये रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला केला होता. बस दरीत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला होता. एका वेगळ्या घटनेत दोन सशस्त्र दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचा जवान हुतात्मा झाला होता. सीआरपीएफच्या पथकाने गोळीबार करून दहशतवाद्यांना ठार मारले. याच महिन्यात डोडा जिल्ह्यातील गंडोह भागात दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांजवळ मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रे, दारूगोळा आणि पैसे सापडले होते.

राज्यात लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. लवकरच विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. यामुळेच देशविरोधी शक्तींकडून अशांतता पसरवण्यासाठी अशी घृणास्पद कृत्ये केली जात आहेत. आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कृत्ये होत होती. आता ती शांत समजल्या जाणाऱ्या जम्मू भागात घडवून आणली जात आहेत. अशा कृत्यांमध्ये स्थानिकांचे सहकार्य लाभत आहे, ही चिंतेची गोष्ट आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून येथे येणे आणि दहशतवादी कृत्ये करून पुन्हा तिकडे पळून जाणे सोपे होत असल्याने दहशतवाद्यांनी हा भाग निवडला असावा. वरचेवर निर्माण होणारा हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लावण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

प्रदीप जोशी, दै. गोवन वार्ताचे उपसंपादक आहेत.