सरपंच, पंचांचे वेतन २ हजार रूपयांनी वाढले

राज्यातील सर्व आयटीआयचा दर्जा वाढविणार

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
10th July 2024, 04:41 pm
सरपंच, पंचांचे वेतन २ हजार रूपयांनी वाढले

पणजी : राज्यातील पंच, उपसरपंच तसेच सरपंचांचे वेतन २ हजार रूपयांनी वाढले आहे. यामुळे आता सरपंचांना महिन्याला ८ हजार रूपये, उपसरपंचांना महिन्याला ६ हजार ५०० रूपये तर पंचाना महिन्याला ५ हजार ५०० रूपये वेतन मिळणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बुधवारी पर्वरी मंत्रालयात झाली.मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पर्यटन मंत्री रोहन खंवटे उपस्थित होते. पंचायत सदस्यांच्या वेतन वाढीमुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाकाठी २ कोटी ६३ लाख रूपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

२३० कोटी रूपये खर्चुन ११ आयटीआय दर्जा वाढणार

टाटा समुहाच्या आर्थिक सहकार्याने २३० कोटी रूपये खर्चुन सरकार सर्व ११ आयटीआयचा दर्जा वाढविणार आहे. नवीन उपकरणे आणण्याबरोबर अभ्यासक्रमांचीही फेररचना होणार आहे. टाटा समुह आयटीआयसाठी १६० कोटी रूपयांची आर्थिक मदत देणार आहे. यापैकी ७५ कोटी रूपये खर्च झालेले आहेत. सरकार आणखी ७० कोटी रूपये जोडून सर्व ११ आयटीआय आणखी सुसज्ज बनविणार आहे.

हॉस्पिटेलिटी अभ्यासक्रमासाठी ताज समुहाबरोबर करार करण्यात आला असून नवीन अभ्यासक्रम १५ जूलै पासून सुरू होत आहे. उद्या ११ जुलै रोजी जागतिक कुशलता दिना निमित्त कला अकादमीत खास कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात कुशलता अभ्यासक्रमात चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.