पावसाचे आगमन होताच डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढू लागतात. आरोग्य क्षेत्रातील अनेक तज्ञांनी, डेंग्यूमध्ये शरीरातील प्लेटलेट्स तर कमी होतातच पण त्याचा मेंदूवरही वाईट परिणाम होतो असे निरीक्षण नोंदवले आहे.
पणजी : यंदा पावसाळ्याचे आगमन अपेक्षेपेक्षा लवकर झाले आहे. देशभरात मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला आहे. अनेक ठिकाणी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने देशातील विविध भागांत अनेक जीवघेण्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याच्या घटना घडत आहे. दक्षिण भारतात झिका व्हायरस तर उत्तर आणि मध्य भारतात डेंग्यू-मलेरिया-टायफाईड सारखे रोग बळावले आहेत. दरम्यान आरोग्य यंत्रणा अॅक्शनमोडमध्ये आली असून विविध उपाय योजना केल्या जात आहेत.
आरोग्य क्षेत्रात विविध आजारांवर अभ्यास करून रोज नवनवीन अहवाल सादर केले जातात. तज्ञांनी नव्यानेच सादर केलेल्या एका अहवालानुसार, डेंग्यूचा केवळ शरीरावरच नाही तर मेंदू आणि शरीराच्या संपूर्ण न्यूरोलॉजिकल सिस्टमवर वाईट परिणाम होतो.
डेंग्यू ताप हा डास चावल्याने होतो. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती झपाट्याने होते. त्याची सुरुवातीची लक्षणे फ्लूसारखीच असतात. परंतु हजारोंपैकी फक्त एक व्यक्ती मेंदूशी संबंधित लक्षणे दर्शवते. यामध्ये डेंग्यूचे विषाणू रक्त भिसरण प्रक्रियेद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतात. त्यामुळे मध्यवर्ती मज्जासंस्थेशी संबंधित अनेक विपरीत लक्षणे शरीरावर दिसू लागतात. डेंग्यू एन्सेफलायटीस असे या आजाराचे नाव आहे.
डेंग्यूची न्यूरोलॉजिकल लक्षणे हजारांपैकी एका व्यक्तीमध्ये दिसून येत असल्याने त्याची प्रकरणे फारच कमी आहेत. यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये एन्सेफलायटीस, मेंदुज्वर आणि मायलाइटिस यांचा समावेश होतो. अशा परिस्थितीत हा विषाणू रक्ताद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यामुळे मेंदूच्या आत सूज येते आणि पाठीच्या कण्यामध्ये जळजळ उद्भवते व संसर्ग होतो.
डेंग्यू एन्सेफलायटीसमुळे शॉक सिंड्रोम देखील होतो. हा आजार मानवी मेंदूशी संबंधित आहे. या आजाराचा मानवी मेंदूवर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे माणसाच्या मानसिक स्थितीत लक्षणीय असे विपरीत बदल होतात. सदर व्यक्ती व्यक्ती कोमातही जाऊ शकते.
डेंग्यू एन्सेफलायटीसची न्यूरोलॉजिकल लक्षणे
-व्यक्तीची मज्जासंस्था पूर्णपणे बिघडते.
-व्यक्ती काही वेळा कोमातही जाऊ शकते
-व्यक्तीची विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती पूर्णपणे नष्ट होते.
-माणसाच्या मेंदूत अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात.