६५५ ग्रॅम चरस बाळगल्याप्रकरणी तीन वर्षांचा सश्रम कारावास, दंड

एएनसीने २०१२ मध्ये केली होती कारवाई

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
10th July, 12:19 am
६५५ ग्रॅम चरस बाळगल्याप्रकरणी तीन वर्षांचा सश्रम कारावास, दंड

पणजी : २०१२ मध्ये ६५५ ग्रॅम चरस बाळगल्याप्रकरणी दिलीप कुमार चांद (हिमाचल प्रदेश) या युवकाला तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याबाबतचा निवाडा म्हापसा येथील विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी दिला आहे.

या प्रकरणी गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) ४ नोव्हेंबर २०१२ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, गिरी - म्हापसा येथील ग्रीन पार्क हॉटेलजवळ एक युवक ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याची माहिती गुप्तहेरांनी एएनसीचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ माजिक यांना दिली होती. त्यानुसार, पथकाने ४ नोव्हेंबर २०१२ रोजी सापळा रचला. त्यानुसार, पथकाने त्याची चौकशी केली असता, त्याने आपण दिलीप कुमार चांद असल्याची माहिती दिली. त्यानंतर पथकाने त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून ६५५ ग्रॅम चरस जप्त केला. त्यानंतर पथकाने चांद याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर एएनसीने तपास पूर्ण करून संशयित चांद याच्या विरोधात ३१ जानेवारी २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन ५ मार्च २०१३ रोजी संशयित चांद याच्या विरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू केला. याच दरम्यान न्यायालयाने संशयिताची १६ ऑगस्ट २०१३ रोजी जामिनावर सुटका केली होती. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, सरकारी अभियोक्ता जे. सांतामारिया यांनी बाजू मांडून संशयिताविरोधात न्यायालयात सबळ पुरावे सादर केले. त्यात त्यांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील रासायनिक अहवाल व इतर पुराव्याचा समावेश केला. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू एेकून घेतल्यानंतर संशयित दिलीप कुमार चांद याला चरस बाळगल्या प्रकरणी तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

दिलीप कुमार चांद याला ४ नोव्हेंबर २०१२ रोजी अटक केली होती. त्यानंतर त्याची १६ ऑगस्ट २०१३ रोजी जामिनावर सुटका केली. न्यायालयाने वरील शिक्षेतून भोगलेला कारावास माफ केला आहे. 

हेही वाचा