मोदी-पुतिन यांची गळाभेट; अमेरिका, युरोप चिंतेत

Story: विश्वरंग |
09th July, 11:43 pm
मोदी-पुतिन यांची गळाभेट; अमेरिका, युरोप चिंतेत

तब्बल पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच... नव्हे नव्हे... युक्रेनशी युद्ध छेडल्यापासून पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ जुलै रोजी रशियाच्या दौऱ्यावर पोहोचल्यानंतर अमेरिकेच्या डोक्याच्या शिरा ताणल्या आहेत. मोदींनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या खासगी निवासस्थानी जाऊन त्यांची गळाभेट घेतली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेचा ताण आणखी वाढला. अचानक अमेरिकेने नाटो देशांची तातडीची बैठक घेतली. साहजिकच दोन दिवसांपासून घडणाऱ्या या घटनांवर संपूर्ण जगाच लक्ष खिळले आहे.

रशियाचा कट्टर शत्रू असलेल्या अमेरिकेने युक्रेनच्या युद्धानंतर संपूर्ण जगाला रशियापासून दूर राहण्यासाठी दबाव टाकला आहे. रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. तरीही भारताने अमेरिकाचा हा दबाव झिडकारून रशियाशी मैत्री कायम ठेवली आहे. धूर्त, कपटी आणि लबाड अमेरिकेशी कामापुरते संबंध ठेवण्याचा भारताचा नेहमीच कल राहिला आहे. याचे कारण म्हणजे, संकट काळातच खरा मित्र कोण, हे समजते. जेव्हा जेव्हा अमेरिकेने भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रत्येक वेळी केवळ रशियाच भारताच्या पाठिशी खंबीर राहिला. मग तो काश्मीरचा मुद्दा असो अथवा १९७१ चे भारत-पाक युद्ध. बांगलादेशातील फाळणीवेळी झालेला नरसंहार असो, अथवा गोव्याचा मुक्तीसंग्राम... प्रत्येक संकटात अर्ध्या जगाचा राग पत्करूनही रशियाने भारताची साथ कधीच सोडली नाही. भारताच्या विजयासाठी रशियाने सर्वार्थाने लष्करी सामर्थ्य प्रदान केले. अमेरिकेने नेहमीच भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या फाळणीनंतर लगेच पाकिस्तानला पाठिंबा दिला. गोवा पोर्तुगिजांच्या गुलामगिरीत रहावा, यासाठी अमेरिकेने आपल लष्करी सामर्थ्य दिले होते. बांगलादेशातील नरसंहारालाही अमेरिकेने मोठा पाठिंबा दिला होता. त्यामुळेच भारतीयांसाठी मोदींचा रशियन दौरा खास ठरतो.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी ७ जुलै रोजी सरकारी निवासस्थानाऐवजी नोवो-ओगारेवो येथे स्वतःच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर तर संपूर्ण जगाचे लक्ष या घटनेवर केंद्रित झाले आहे. पाश्चिमात्य देश पुतिन यांना एकट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी मोदी-पुतिन यांची गळाभेट झाली. मोदी आणि पुतिन यांनी बॅट्री कारमधून पुतिन यांच्या खासगी घराचा फेरफटका मारला. यावेळी पुतिन कार चालवत होते. या घटनेमुळे पहिल्यांदाच पुतिन यांच्या खासगी घराचे काही फोटो समोर आले. मॉस्कोच्या हद्दीबाहेर पुतिन यांचे हे निवासस्थान असून चारही बाजूला जंगल आहे. तिथे एयर डिफेंस सिस्टम तैनात आहे. अणवस्त्र हल्ल्यापासून वाचवणाऱ्या बंकरही तिथे असल्याच बोलले जाते. आता गळाभेटीनंतर अमेरिका, चीन आणि युरोपिन देशांची भारताबद्दल काय प्रतिक्रिया उमटते, ते आगामी काळात दिसून येईल.


संतोष गरुड, 

(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे सहाय्यक वृत्त संपादक आहेत.)