हॉटेलवरील जबरदस्तीने तिच्या शरीराची चाळण

तनिषाला देहविक्रीसाठी हॉटेलवर बोलवले तेव्हा तिला तीन नराधमांनी विवस्त्र करत दारूची आंघोळ घातली आणि तिच्या देहाचीही विटंबना केली. त्यांची ही सर्व कृती कौर्याची परिसीमा गाठणारी होती.

Story: वर्तमान |
09th July, 11:41 pm

वेश्यावस्तीमधील आवडत्या मुलीला हॉटेलवर घेऊन गेल्यावर तिला एका रात्रीचे पैसे जास्त प्रमाणात दिले जातात. मात्र हॉटेलच्या कोणत्या रात्री कोणती वेळ आपल्यावर येईल याची शाश्वती त्या मुलीला नसते. तनिषाने आपला अनुभव सांगताना जी जीवघेणी घटना सांगितली, त्यातून हादरायला झाले. तनिषा म्हणाली, "त्या रात्री वळूसारखे तिघे माझ्या खोलीमध्ये आले. त्या नराधमांनी आळीपाळीने माझ्यावर जबरदस्ती केली आणि माझ्या साऱ्या शरीरावर दारूच्या चार - पाच बॉटल ओतून दारूची आंघोळ घातली. मग नशेत धुंद असलेल्या त्या तिघांनी पुन्हा जबरदस्ती केली." हे सगळे सांगताना तनिषाचे ओठ कापत होते. हात थरथरत होते. जणू काही ती घटना सर्व तिला आठवून आता तोच प्रसंग तिच्यावर घडतो आहे, की काय असे तिला भास होऊ लागले होते.

या सगळ्यावरून असे लक्षात येते, की त्या कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेने एकदा मुली देहविक्री व्यवसायात आल्या, की त्यांच्या हातात काहीच नसते. पुरुषांच्या मर्जीनुसारच त्यांना जगावे लागते, हे सांगितलेले खरेच होते. हे पटू लागले. हे सांगून एक तिरकस नजर आमच्यावरही टाकून ती महिला आतमध्ये निघून गेली होती. मात्र तनिषा आमच्यासमोर बसूनच होती. आम्ही तिला बोलते करण्यासाठी आलो होतो; परंतु तिला आधी झालेल्या मारहाणीमुळे ती शून्यात नजर लावून जमिनीकडे बघत राहिली होती. त्यामुळे तिला बोलते कसे करावे हेच लक्षात येत नव्हते. जॉन भाईंनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिले. पुन्हा मान वळून तिच्याकडे नजर स्थिर ठेवली आणि तिला म्हणाले, "तुझ्यासाठी चहा मागू का? तुला भूक लागली आहे का? काही खायला मागू का?" जॉन भाईंच्या या आपलेपणाच्या शब्दातून तिला थोडा धीर आला असावा. काही मिनिटापूर्वी संपूर्ण कुंटणखान्यातील महिला आपल्या विरोधात बोलत होत्या, मारपीट करत होत्या. त्याच कुंटणखान्यात आपल्याला कोणीतरी प्रेमाने काही खाणार का? असे आग्रहाने विचारतोय हीच भावना तिला सुखावणारी होती. त्यामुळे जॉन भाई यांचे हे आपलेपणाचे शब्द ऐकून तिने शून्यात नजर लावून जमिनीकडे स्थिरपणे पाहत असलेली मान वर केली आणि जॉन भाईंशी अगदी आतल्या ओलाव्याने स्मित हास्य केले. तनिषाच्या चेहऱ्यावरील ते हसू बघून जॉन भाई यांना खूप समाधान वाटले. मग जॉन भाई यांनी तिला बोलते करण्याला सुरुवात केली.

जॉन भाईनी सहज म्हणून तिला विचारले, हॉटेलवर गेल्यावर तुला नेमके काय त्रास होतो. हे ऐकून ती भरभरून बोलायला लागली. अनेक दिवसांची कोंडलेली भावना ती मोकळी करत होती. तनिषा म्हणाली, "सर, मला हॉटेलसाठी मोठ्या प्रमाणात मागणी येते. हॉटेल मालकच ग्राहकांना माझ्यासाठी इथला संपर्क देतात; पण हॉटेलवर गेल्यावर कधीतरी एखादी रात्र छान जाते. एखादा पुरुष अतिशय प्रेमाने आपल्याला जवळ करतो. मोठ्या प्रमाणात पैसे देतो आणि पुन्हा भेटीच आश्वासन देऊन सकाळी निघून जातो. पण हॉटेलवरच्या काही रात्री अशा जातात, की संपूर्ण देहाची चाळण केली जाते." हे सांगताना वरील अंगावर दारू ओतून दारूची आंघोळ घातलेला प्रसंग तिच्याकडून ऐकताना अंगावर शहारे आले. तनिषा म्हणाली, "मला कुंटणखाना सोडून हॉटेलवर देहविक्रीसाठी जायला आवडायचे नाही; पण इथे आलेल्या एका ग्राहकाने मला हॉटेलवर बोलवले. तेही हॉटेल मालकाकडून बोलवले गेले. त्यामुळे मी प्रथमच हॉटेलवर गेली. तेव्हा अतिशय प्रेमाने त्या ग्राहकाने माझ्या सोबत रात्र घालवली. त्याने त्या रात्री दारू प्याली. मलाही पिण्याचा आग्रह करत होता; पण मी दारू पीत नसल्यामुळे त्याला दारूला नकार दिला. मग त्यानेही दारू पिण्याचा आग्रह केला नाही किंवा मारहाण केली नाही, सिगारेट ओढण्याचा आग्रह केला नाही. मध्यरात्रभर तो दारू पित होता; पण त्याने कसलाच त्रास दिला नाही. मी सेक्स वर्कर समजून त्याने माझ्याशी तसे व्यवहार केले एवढेच. बाकी खूप सौजन्याने तो वागला आणि एका रात्रीचे त्याने मला पैसेही भरपूर दिले." हे सांगताना तनिषाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. जॉन भाईना आश्चर्य वाटले. ते तिला म्हणाले, "काय झाले मधेच हसायला?", तर ती म्हणाली, "काही नाही" आणि पुन्हा हसली... तिच्या हसण्यात एक प्रेमळ, निर्व्याज भाव होता. तेव्हा पुन्हा जॉन भाई म्हणाले, "अगं सांग, सांग का हसतेस ते?... आम्हालाही जरा कळू दे." यावर तनिषा म्हणाली, "साहेब, तो जो ग्राहक होता. तो त्या रात्री नंतर रोज फोन करायचा आणि प्रेमाच्या बाता बोलायचा. माझा जरी रात्रीचा धंद्याचा वेळ असला तरी त्याच्याशी बोलावेच लागायचे. मग तो मला थोडे थोडे पैसेही पाठवायला लागला आणि एके दिवशी माझ्याशी लग्न करण्याची मागणी घातली; पण त्या भल्या माणसाचे आयुष्य माझ्यासारखीशी लग्न करून काय भले होणार होते? असा मी विचार केला आणि मी त्या माणसाला लग्नाला नकार दिला. त्यापासून त्याने माझ्याशी काहीच संपर्क ठेवला नाही.

मात्र हे सांगितल्यानंतर तनिषाने हॉटेलवरील दुसरा प्रसंग जो सांगितला तो ऐकताना हादरूनच जायला झाले. तिने पहिल्या ग्राहकाला हॉटेलवर चांगली सेवा दिल्यामुळे त्या हॉटेल मालकाकडून अजून काही दिवसांनी पुन्हा एका रात्रीसाठी तनिषाला बोलवण्यात आले. त्या रात्री तिच्या देहाशी असा व्यवहार केला गेला, की त्या नरकयातना तिला सहनही करता येत नव्हत्या. त्यावेळी तिला श्वासही घेता येत नव्हता. संपूर्ण जीव गुदमरून गेला होता. तरीही ते तिच्या देहाची विटंबना करतच राहिले होते...! (क्रमशः)


अजय कांडर

(लेखक विख्यात कवी, 

व्यासंगी पत्रकार आहेत.)

मो. क्र. ९४०४३९५१५५