शाळेचा पहिला दिवस, या पहिल्या दिवसाची शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही उत्सुकता लागून राहिलेली असते. सकाळची आवराआवर, त्यानंतर आपापल्या बॅगा घेऊन घराबाहेर पडणे आणि पहाटे सहाच्या वेळेला वाळपईच्या बस स्टॉपवर सचिंत उभे राहणे… सचिंत का? तर आपण जे इथे कामावर किंवा शाळेमध्ये जाण्यासाठी उभे आहोत त्या शाळेच्या पहिल्याच दिवशी आपण वेळेत पोहोचणार की नाही याची चिंता. पहाटे प्रवास करणाऱ्या वाळपई वासियांसाठी ही परिस्थिती आज आणि कालची नाही तर तब्बल पाच ते सहा वर्षे पहाटेचे प्रवासी अशा चिंताग्रस्त अवस्थेत जगत आहे.
वाळपई ते म्हापसा या महत्त्वाच्या मार्गावर अशी वाहतुकीची गैरसोय असावी? ही समस्या गोव्याच्या प्रगतशील वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. खरे तर म्हापसा हे मुख्य शैक्षणिक केंद्र आणि वाळपई हा गोव्यातील अतिदुर्गम भाग. वाळपईच्या जवळपास कुठल्याही प्रकारचे उच्च शिक्षण नसल्याकारणाने वाळपई, साखळी आणि त्याच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी जीव जोखमीत घालून शिक्षण घेण्यासाठी वाळपई-म्हापसा या मुख्य महामार्गाजवळ कसेबसे येतात पण यापुढे मात्र उजेडच पडलेला असतो कारण इथून पुढे पोहोचण्यासाठी त्यांना बसची सोयच नसते. गोव्यात वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठमोठे रस्ते, मोठमोठे बसथांबे मात्र बांधले जातात पण या विद्यार्थ्यांच्या आणि त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी धावपळ करीत येणाऱ्या शिक्षकांच्या धावपळीची चिंता मात्र कोणालाच असलेली दिसत नाही.
वाळपईहून पहाटेला ६.०५ मिनिटांनी एकच बस सुटते आणि त्यानंतर थेट ६.४५ला दुसरी. त्यानंतर भरमसाठ गाड्या जरी असल्या, तरी त्या गाड्यांचा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यापैकी कोणालाही उपयोग होत नाही. ह्या गाड्यांचा लाभ फक्त त्याच कर्मचाऱ्यांना ज्यांचे कार्यालय नऊ, दहा वाजता सुरू होते पण शैक्षणिक संस्थांचा कार्यकारी वेळ मात्र ७.४५ पासून सुरू होतो. त्यामुळे ६.०० ते ६.३० या मधल्या वेळेत एकही गाडी नसल्याकारणाने एकाच बसमध्ये अक्षरशः कोंबून विद्यार्थी प्रवास करतात. जर ही गोष्ट खोटी वाटत असेल तर कोणीही पहाटेला ६.०५ च्या गाडीमधून प्रवास करावा आणि स्वतः अनुभव घ्यावा. पुरावा आपोआप मिळून जाईल.
पूर्वी ह्या महामार्गावर व्यवस्थित वेळेवर गाड्या होत्या म्हणूनच तर विद्यार्थी शिक्षक म्हापशासारख्या शहरापर्यंत येऊन अध्ययन, अध्यापन करू शकत होते. वाहतूक मंडळातर्फे अगदी व्यवस्थित गाड्यांचा आलेख दिला होता. ६.२०, ६.३० आणि ६.३५ वाजताच्या गाड्या या मार्गावरून नेमाने चालत होत्या. पण गेली चार पाच वर्षे या सर्वच गाड्या गायब आहेत आणि खेद या गोष्टीचा वाटतो की याची चौकशी कोणीच करत नाही. पाच वर्षे एखाद्या महामार्गावरून गाडी चालत नसेल तर याविषयीची दखल घेण्यासाठी कोणतेही मंडळ, सरकारी व्यवस्थापन खाली येत नाही का? सामान्य नागरिकांनी याचा पाठपुरावा करावा अशी अपेक्षा आहे? एवढे होऊनही अनेक सामान्य नागरिकांनी याच्याविषयी आरटीओमध्ये तक्रारी दिल्या आहेत. कदंबा महामंडळाला काही अर्ज केले आहेत. स्थानिक आमदारांनाही याची माहिती दिली आहे. विविध वर्तमानपत्रावरही या बातम्या छापून आलेल्या आहेत. पण दुःख या गोष्टीचे वाटते की, इतकी वर्षे एवढे प्रयत्न करूनही या समस्येचे समाधान मात्र कोणीच देत नाही. याला जबाबदार कोण? प्रशासन? वाहतूक मंडळ की खाजगी बस मालक?
ही सकाळची परिस्थिती तर दुपारच्या वेळेचे निराळे दुःख. म्हापसा बसस्टॅन्डवरून दुपारी दोन वाजता सुटणारी गाडी वाळपईला पोहोचेपर्यंत साडेचार ते पाच वाजता, म्हणजे जवळपास ४५ किलोमीटर अंतर कापण्यासाठी एक गाडी अडीच तास घेते आणि याही वेळेत प्रवास करणारे प्रवासी हे मुख्यतः शिक्षक आणि विद्यार्थी असतात. म्हणजे शिक्षण क्षेत्रात जिथे वेळेला महत्त्व आहे त्याच क्षेत्रातील लोकांचा वेळ वाया जाताना आपल्याला दिसून येतो. एवढा वेळ गाड्या का घेतात? तर आमची बस रिकामी न्यावी लागते म्हणून आपण प्रवाशांसाठी थांबतो. मग खाजगी बस गाड्या भरून निघाव्यात म्हणून प्रवास करणाऱ्या इतर सर्व प्रवाशांनी हे हाल सोसावे का? उन्हाळ्याच्या दिवसात तर कित्येक विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक चक्कर येऊन पडल्याची उदाहरणेही आहेत. ही अशी परिस्थिती किती दिवस चालणार?
जिथे भारतभरात मेट्रोसारख्या अतिवेगवान रेल्वे धावत आहेत तिथे या एवढ्याशा छोट्याशा गोवा राज्यामध्ये किमान वेळेत आणि वेगात धावणाऱ्या गाड्यांची अपेक्षा करणे हे चुकीचे आहे का? ही रोजच्या जीवनाशी निगडित आमची समस्या सरकार सोडवू शकत नसेल तर मग सामान्य जनतेने कोणाच्या तोंडाकडे पहावे? ह्या अशा परिस्थितीमध्ये मानसिक ताण तर येतोच त्याशिवाय प्रवासामधला उत्साह ही कमी झालेला दिसून येतो. या चकवाचकवीत अनेक अपघात झालेलेही कानावर पडतात आणि अपघातांबरोबर जीवितहानीही. आणि पुढेही ही भीती आहेच. अशा गच्च भरलेल्या बसचा अपघात झाला आणि कधीतरी मोठ्या संख्येत जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असेल? प्रशासन, सरकार, खाजगी बस मालक की जे त्रास भोगतात ते सामान्य नागरिक?
गौतमी चोर्लेकर