नव्याने उमगली सुदामा-श्रीकृष्णाची मैत्री

अती चतुर असलेले श्रीकृष्ण देव सगळं जाणून असतात पण कसलाच मागमूस लागू देत नाहीत. ते सामान्य माणसासारखे आपणही सगळ्या गोष्टींपासून अपरिचित असल्याचं भासवतात. त्यांच्यावर निस्सीम भक्ती, प्रेम करणाऱ्या माणसांना ते कधीच अंतर देत नाहीत. त्यांच्या हाकेला ते संकटकाळी धावून जातात. अशी ही त्यांची लीला आहे.

Story: कथा |
26th January, 03:53 am
नव्याने उमगली सुदामा-श्रीकृष्णाची मैत्री

तर त्यांचे बालपणीचे मित्र सुदामा ज्यांनी त्यांना आपला घनिष्ठ मित्र मानलं, त्यांच्यावर निस्सीम प्रेम केले. काहीसे वयाने सुदामा मोठे म्हणून श्रीकृष्ण देव त्यांना दादा म्हणायचे, एकत्र बालपणात त्यांनी शिक्षा प्राप्त केली आहे आणि ऋषीच्या आश्रमात एकत्र राहून अनेक सुखदुःखाच्या गोष्टी उपभोगल्या. सुदामा निष्ठावंत ब्राम्हण. जसे पूर्वी ब्राम्हण पूजेला आले की दक्षिणा सांगत नसत याचक जे देईल ते घेऊन आनंदाने जायचे, तसेच आणि त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने तत्ववंत असे सुदामा होते. कसलाच मोह नसलेले, अतृप्त असूनही तृप्तीचा ढेकर देणारे. वास्तविक त्यांची स्थिती फार दरिद्री होती. दोन वेळचे अन्नसुद्धा दुर्लभ होते. तरीही हु की चू न करणारी सहचरणी त्यांची होती. 

अठरा विश्वे दारिद्र्यात ती एकही शब्द न काढता संसाराचा गाडा ओढत होती. अनेक वेळा सुदामा आपल्या बालमित्राची आठवण काढत, त्यांचा महिमा सांगत, श्रीकृष्ण साक्षात परमेश्वर आहे हे एव्हाना सर्वपरिचित झाले होते. त्यामुळे सुदामाच्या पत्नीला समजले होते की आपल्या नवऱ्याचा मित्र हा देव आहे आणि त्यांना सुदामा भेटले तर आपल्याला या परिस्थितीतून ते बाहेर काढतील म्हणून तिने नवऱ्याला सांगितलं की तुम्ही तुमच्या मित्राला जाऊन भेटा. ते काहीतरी मार्ग काढतील. सुदामांनाही अनेक वेळा वाटे की आपल्या मित्राला भेटायला जावं पण त्यांना जाणं शक्य होत नसे. बायकोचा हट्ट म्हणून त्यांनी जाण्याचं मनावर घेतलं खरं, पण नेणार काय? त्या पतिव्रता असलेल्या त्याच्या बायकोला त्याच्या मनातले समजले. ती म्हणाली, “मी शेजारील लोकांकडून काहीतरी उसनं मागून आणते” आणि ती तयारीला लागली. कधीच आपल्या झोपडीवजा घरातून बाहेर न पडणारी ती शेजारच्या घरी गेली आणि म्हणाली, “काहीतरी द्या मला उसने. आमचे हे श्रीकृष्ण देवांना भेटायला चाललेत. ते त्यांचे बालपणीचे मित्र आहेत.” पण दारात उभी असलेली बाई तिला म्हणाली, “खोटं सांगू नकोस, मुलासाठी हवं म्हणून सांग. कुठे श्रीकृष्ण आणि कुठे दरिद्री सुदामा!” म्हणत तोंड वाकडं करू लागली. 

एवढ्यात त्या घरची मोलकरीण आली आणि म्हणाली, “आहो वहिनीसाहेब, काल पोहे कांडले होते त्यांचा कोंडा राहिला आहे. तो देवून टाकू तिला. त्यात पसाभर पोहे मिळतील तिला आणि खातील पोरं.” त्यावर मालकीण तयार झाली द्यायला आणि तो कोंडा घेऊन बिचारी घरी आली. तिने आपल्या फाटक्या सूपाने तो मुलं घरी नसताना साफ केला आणि खरचं पसाभर पोहे मिळाले. तिने सुदामांना दाखवले तर सुदामा म्हणाले माझ्या कृष्णाला पोहे फार आवडतात. सोवळ्याचा एक चांगलासा तुकडा करून तिने त्याचं गाठोडं बांधलं आणि ते उंच आडोश्याला छताला बांधलं. का? तर मुलांना दिसलं तर खायला मागतील म्हणून. त्याच रात्री मुलं झोपली असताना सुदामा द्वारकेला जाण्यासाठी रवाना झाले.

द्वारकेला पोहोचताच त्यांना श्रीकृष्ण देवाचं राज्य सापडेना म्हणून त्यांनी तिथे विचारलं, तर सगळेच लोक गरीब बिचाऱ्या सुदामाची टिंगल करु लागले. त्यांना कोणीच श्रीकृष्ण कुठे राहतात हे सांगायला तयार होईना. अश्यातच संध्याकाळ झाली आणि थकलेले सुदामा एका टेकडीवर बसले. तिथून मावळतीच्या सूर्याची किरणे एका घराच्या छपरावर पडली आणि ती सोनेरी कौले आणखी चमकू लागली. जीव अगदी मेटाकुटीला आला होता. कंठही दाटला होता. आपल्यासारख्या गरिबाचा श्रीकृष्ण देव मित्र आहेत हा काय आपला गुन्हा आहे? असा प्रश्न मनाला चाटून गेला त्यातच. सुदामा म्हणाले, “माझा कृष्ण या सोन्याच्या कौलात हरवला” आणि काय चमत्कार! तिकडे श्रीकृष्णाला उचकी लागली आणि तिथूनच त्याने कोणाला तरी मनातून सूचना केली, सुदामाला राजमहाली आणण्याची. आणि मघाशी जो माणूस सुदामाला पत्ता सांगत नव्हता तोच येऊन श्रीकृष्णाच्या नगरीत त्याला घेऊन गेला. 

सुदामाची परीक्षा अजूनही संपली नव्हती. तिथे द्वारपाल होते. त्यांनी सुदामाकडे निक्षून पहिले, म्हणाले कोण पाहिजे? भोळ्याभाबड्या भावाने सुदामा उत्तरले, “कन्हैय्या” आणि बाकीची ओळख सांगितली. त्यावर फजिती करत ते त्याला दरबारात घेऊन गेले आणि आत महालात श्रीकृष्णाला सांगायला गेले. म्हणाले, “कोणी सुदामा आलेत आणि त्यांना कन्हैय्याला भेटायचं आहे.” त्यावर श्रीकृष्ण धावत सुटले. त्यांना कश्याची पर्वा नव्हती, खांद्यावरचा शेला कधीच पडला होता आणि इकडे सुदामा मनात म्हणत होते, ‘श्रीकृष्णाला कोणा महत्त्वाच्या माणसाला भेटायला जाण्याची घाई आहे आणि आपण उगाचच आलो आहोत. आपण आता जातो आणि उद्या भेटायला येतो.’ म्हणून बाजूला झाले, तर साक्षात श्रीकृष्णाने सुदामाच्या पायावर लोटांगण घातलं आणि आपल्या अश्रूने अभिषेक केला. सुदामाचे डोळेही दुथडी भरून नदी वाहावी तसे वाहू लागले. आपल्या मित्राला म्हणाले, “असं आपण माझ्या पायावर लोटांगण घालणं योग्य नव्हे.” त्यावर देव म्हणाले, “अरे दादा, सगळ्या जगाचं पाप नष्ट करताना माझ्या मनाला स्वच्छ करायला आपल्या पदकमलापेक्षा दुसरी जागाच नाही.” दोघांनी भरल्या डोळ्यांनी आलिंगन दिले आणि नंतर हाताला धरून सुदामाला आपल्या सिंहासनावर श्रीकृष्णाने बसविले. सगळ्यांच्या ओळखी करून दिल्या, मिष्टान्न भोजन वाढले. जेवताना सुदामांना आपल्या बायको मुलांची आठवण झाली. तरी त्यांनी आपला त्रास आपल्या परम मित्राला जाणवू दिला नाही. एवढा निस्वार्थी होता सुदामा. 

सगळ्या गप्पागोष्टी झाल्यानंतर श्रीकृष्ण म्हणाले, “माझ्यासाठी काय खाऊ दिलाय वहिनीने?” त्यावर सुदामा काखेतली पुरचुंडी लपवू लागला. त्यावर कृष्णाने ती काढून घेतली, प्रेमाने सोडवली आणि अतील पोहे पाहून हर्षभरीत झाला. पोहे खाता खाता त्यात छोटीशी चिठ्ठी त्यांच्या नजरेस पडली. त्यात लिहिलं होतं, “वहिनीचा सादर प्रणाम. मी माझ्या माहेरी महिन्याला दोन एकादशी करायचे आता पूर्ण महिना करते.” या उल्लेखावरून श्रीकृष्णाला सगळं समजलं. त्यांनी ताबडतोब तिकडे सुदामाच्या गावाचं सुंदर सोन्याच्या नगरीत परिवर्तन केलं. ज्यांनी कोंडा दिला होता, त्यांच्या घरचा कारखाना झाला. जेवढे दागिने रूक्मिणीजवळ आहेत तेवढेच सुदमाच्या बायकोजवळ असू दे असा वर दिला आणि सुदामाने मात्र एवढे दिवस राहून एका शब्दाने आपली परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली नाही. 

पाहुणचार घेऊन सुदामा घरी यायला निघाले. त्यांनी गावात रात्री जायचं ठरवलं कारण दिवसा गेलो तर लोक आपली खिल्ली उडवतील याची भीती वाटत होती. म्हणून सुदामा गावाबाहेर झाडीत बसून काळोख होण्याची वाट पाहत होते. अख्खा गाव गोळा होवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढायचा विचार करत होते कारण काय? तर त्यांच्या मित्रभेटीमुळे गावाचा उद्धार झाला होता. पण हे काही सुदामाच्या गावीही नव्हतं म्हणून ते झाडीत लपलेले होते. मंद काळोख पसरला होता आणि गावातील काही मंडळी वेशीवर त्यांची वाट बघत होते. इतक्यात एकाने झाडी हलताना पहिली आणि सगळेजण झाडीजवळ गेले, तर सुदामा दिसले. त्यांनी त्यांना तसचं उचललं आणि पालखीत बसवलं आणि नाचत जाऊ लागले. गावात पोहचले, तर गावचा नक्षाच बदलला होता. सुंदर नगरीच्या रुपात गाव उभा होता. 


बबिता गावस