तर चहा प्रेमी लोकहो, एकदा नैसर्गिक चहा पिऊन पहाच! कॅफिन-युक्त चहा प्राशन केलेले बरा की कॅफिन-मुक्त चहा हे त्यानंतरच ठरवा.
चहा हे जगातील सर्वांत लोकप्रिय पेय आहे. शीण व थकवा घालविण्यासाठी लोक आवर्जून चहाचे सेवन करतात. वेळेवर चहा न मिळाल्यास कुणाचं डोक दुखतं तर कुणाला गरगरतं. चहा हा अनेकांचा वीक पॉईंट असतो. उकळतं पाणी, त्यात चवीनुसार साखर, चिमुटभर चहापत्ती व थोडसं दूध. अहाहा! चुलीवर उकळणाऱ्या चहाच्या वासानेच अर्धा शीण निघून जातो. दिवसभरातील काम उरकून घरी परतल्यावर प्यायलेला एक कप चहा अमृतासमानच भासतो. कित्येक जणांना दिवसाला कितीतरी वेळा चहा प्राशन करायची सवय असते. अशाने मग ते अमृत कधी विष बनतं ते लक्षातही येत नाही.
चहामधील कॅफिन व टॅनिन हे घटक शरीराला जरी स्फुर्ती प्रदान करत असले तरी या घटकांचे जास्त सेवन केल्यास ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आरोग्यासाठी घातक ठरणारे हे घटक नैसर्गिक चहामध्ये (फुलांपासून बनवलेला) अनुपस्थित असतात. त्याव्यतिरिक्त, नैसर्गिक चहामध्ये अत्यावश्यक तेल (इसेन्शिअल ऑइल) व आवश्यक जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात हजर असतात. नैसर्गिक चहामधील हे घटक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. तसंच ते त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यास व संपूर्ण आरोग्य सुधारण्यासही मदत करतात. नैसर्गिक चहा हा कॅफिन व टॅनिनयुक्त चहावर सर्वोत्तम पर्याय असू शकतो. नैसर्गिक चहा हा जास्त लाल रंगाची जास्वंदीची फुलं, केशरी रंगाची पळसाची फुलं, जांभळ्या रंगाची शंखपुष्पं, झेंडूची फुलं, लवेंडर, जाई, जुई, मोगरा, गुलाब, शेवंती इत्यादी फुलांच्या पाकळ्यांपासून बनवला जातो.
शंखपुष्पाच्या फुलांचा चहा (ब्लू-टी)
ब्लू टी किंवा बटरफ्लाय पी टी या नावाने प्रचलित असलेला चहा शंखपुष्प ह्या फुलापासून बनवला जातो. हे कॅफिन-मुक्त फूल जांभळ्या रंगाचे असते. हे फूल अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने, ह्या फुलापासून बनवलेला चहा शरीरातील विषजन्य पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो. ह्या चहात ताण कमी करणारेही गुणधर्म असतात. केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठी देखील हा चहा उपयुक्त आहे.
शंखपुष्पाच्या फुलांचा चहा बनवण्यासाठी २ कप पाणी, ४-५ शंखपुष्पाची फुले, इंचभर आले, ५-६ थेंब लिंबाचा रस, चवीनुसार साखर/मध/गुळ इत्यादी साहित्याची आवश्यकता भासते. सगळ्यात अगोदर फुलांच्या तळाचा भाग काढून फुले स्वच्छ धुवून घ्या. आता २ कप पाणी उकळून त्यात इंचभर आले कुस्करून टाका. पाणी उकळल्यानंतर त्यात स्वच्छ धुतलेल्या फुलांच्या पाकळ्या टाका व पाण्याला आणखी एक उकळी काढा. उकळणाऱ्या चहाला निळा रंग आल्यानंतर तो गाळा व गरमागरम प्राशन करा.
जास्वंदीच्या फुलांचा चहा
जास्वंदीच्या फुलाचा चहा जीवनसत्व सी आणि बीटा-कॅरोटीनसारख्या अँटिऑक्सिडंटने युक्त असतो. हा चहा शरीरातील हानिकारक फ्रि रॅडिकल्स बाहेर फेकण्यास मदत करतो ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. जास्वंदीचा चहा प्यायल्याने रक्तदाब व कोलेस्ट्रॉल कमी होतो असे अभ्यासातून दिसून आलेले आहे. केसांच्या आरोग्यासाठीही हा चहा उपयुक्त आहे. रिसर्च गेटच्या अहवालानुसार, जास्वंदीच्या फुलांचा चहा लघवीचे प्रमाण वाढवून शरीरातून युरिक अॅसिड काढून टाकण्यास मदत करतो. रक्तातील युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचा चहा फार उपयुक्त मानला जातो.
जास्वंदीच्या फुलांचा चहा बनवण्यासाठी शक्यतो लाल रंगाच्या जास्वंदीचा उपयोग केला जातो. हा बनवण्यासाठी सर्वात आधी जास्वंदीची फुलं स्वच्छ धुवून घ्या व फुलाच्या पाकळ्या तेवढ्या वेगळ्या करा. एका पातेल्यात जास्वंदीच्या पाकळ्या, १ कप पाणी घेऊन पाणी चांगले उकळा. हे पाणी पाकळ्यांचा किंवा पाण्याचा रंग बदलेपर्यंत उकळा. पाण्याचा रंग लाल झाल्यानंतर ते गाळून घ्या. त्यात चवीनुसार मध व ५-६ थेंब लिंबाचा रस टाकून सेवन करा.
पळसाच्या (पलाश) फुलांचा चहा
पळसाच्या फुलांतील घटक पचन सुधारणा, ताण तसेच रक्तात वाढलेली साखर कमी करण्यास मदत करतात. पळसाच्या फुलाचा चहा पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते असे संशोधनातून दिसून आलेले आहे. हा चहा शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास साहाय्य होते. ही फुलं केशरी रंगाची असतात. पळसाच्या (पलाश) फुलांचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम पळसाची फुले स्वछ धुवून घ्या. नंतर एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात पळसाच्या फुलांच्या पाकळ्या व वेलची टाकून ते चांगले उकळा. नंतर त्यात मध घालून गाळणीने गाळून घ्यावे.
नैसर्गिक चहा हा कॅफिनमुक्त असल्यामुळे आरोग्यासाठी लाभदायक असतो. फुलांपासून बनवलेला चहा पिल्याने अपचन, बद्धकोष्ठता, ऍसिड रिफ्लेक्स व पचनसंस्थेशी संबंधित समस्या दूर होतात. तर चहा प्रेमी लोकहो, एकदा नैसर्गिक चहा पिऊन पहाच! कॅफिन-युक्त चहा प्राशन केलेले बरा की कॅफिन-मुक्त चहा हे त्यानंतरच ठरवा.
स्त्रिग्धरा नाईक, (लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)