एका दैनिकाच्या रिपोर्टरने अडवाणीजींना काश्मीर गुंत्याच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारला. त्यांना तात्काळ उत्तर देऊन संविधानाच्या अमूक कलमाचा आपणास सखोल अभ्यास असता तर आपण हा प्रश्न विचारला नसता, तिथेच याची स्पष्टता आहे असे उत्तर अडवाणींनी दिले.
बातम्या, घोषणा, कार्यक्रम औपचारिकरित्या जाहीर करण्यासाठी संस्थांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी वा प्रवक्ते पत्रकार परिषदा आयोजित करतात. आकाशवाणीचे प्रतिनिधीही अशा पत्रकार परिषदांना बातम्या आणण्यासाठी जातात. कधीकधी केंद्रीय मंत्री गोवा भेटीवर येतात. त्यांच्या पत्रकार परिषदा वा उद्घाटन असे कार्यक्रम असतात. त्यांचेही वार्तांकन करायचे असते. अशा महत्त्वाच्या कार्यक्रमांची बातमी ताबडतोब दिल्ली मुख्यालयाला पाठवावी लागते. तिथून ती ट्वीट होते. फेसबूकवर जाते. वेबसाईटवर जाते. तासातासाने प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजी बातम्यांत वाचली जाते.
न्यूज पूल म्हणून आकाशवाणी न्यूजचाच पासवर्ड असलेला एक पोर्टल आहे. तो हिंदी आणि इंग्रजी भाषेत असतो. ही गोव्याची बातमी दिल्लीचे संपादक त्या पूलवर घालतात. नंतर देशभरातल्या वेगवेगळ्या भाषांतल्या बातमीपत्रात वाचली जाते. या सर्व वार्तांकनाला एक गती असते. वेग असतो. अचूकताही तितकीच महत्त्वाची. Facts and figures बातमीत अचूकपणे जायला हवे याची काळजी घ्यावी लागते. कारण या सरकारी बातम्या असतात.
एकदा आम्ही आकाशवाणीचे प्रतिनिधित्व करताना मांडवी हॉटेलात पणजीत भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या पत्रकार परिषदेला गेलो होतो. त्यांच्या विद्वत्तेचं एक वलय आहे. सरकारी प्रतिनिधी म्हणून आम्ही म्हणजे रेडिओ किंवा दूरदर्शनचे प्रतिनिधी त्यांना प्रश्न विचारू शकत नाही. एका दैनिकाच्या रिपोर्टरने अडवाणीजींना काश्मीर गुंत्याच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारला. त्यांना तात्काळ उत्तर देऊन संविधानाच्या अमूक कलमाचा आपणास सखोल अभ्यास असता तर आपण हा प्रश्न विचारला नसता, तिथेच याची स्पष्टता आहे असे उत्तर अडवाणींनी दिले. आम्ही पुढे बसलो होतो तेव्हा हे सविस्तर उत्तर ऐकून आमच्या ज्ञानात भर तर पडलीच पण त्याच बरोबर त्यांच्या अभ्यासाचा पायरव ऐकू आला.
कला अकादमीत अनेकदा कलाकार यायचे. त्यांच्या कार्यक्रमाची पत्रकार परिषदा घ्यायचे. नर्तक, नर्तिका, गायक, गायिका, दिग्दर्शक, कलाकार, कारागीर यांच्याही पत्रकार परिषदा असायच्या. त्यांचे बाईट वा न्यूजरीलसाठी आम्ही छोट्याशा मुलाखती घेत असू. त्यातून नवनवीन माहिती मिळायची. एकदा प्रख्यात मराठी साहित्यिक रत्नाकर मतकरी कला अकादमीत त्यांचं ‘बकासूर’ नाटक दिग्दर्शित करायला आले होते. कलाकार स्थानिक होते. ते कला अकादमीच्या मागच्या गेस्ट रूममध्ये राहिले होते. त्यांची मुलाखत मी प्रादेशिक समाचार दर्शनासाठी घेतली.
हिंदी कथाकार कमलनाथ जे ‘चंद्रकांता’ टीव्ही सिरीयल लेखक म्हणून गाजत होते ते एकदा पणजीत आझाद मैदानाजवळच्या हॉटेलात उतरले होते. कमलनाथजींनी कोंकणी कथांच्या हिंदी अनुवादांचे संपादन केले होते. त्यांच्या मुलाखतीचा आनंद घेतला तो लेखक म्हणून माझ्या आठवणीत कायम राहील. या एका दिग्गज हिंदी कथाकाराचे साहित्य लेखनाचे, मोहन राकेश या नाटककाराकडच्या मैत्रीचे, टीव्ही लेखनाचे, साहित्यिक संपादनाचे, साहित्याच्या विकसनाचे अनुभव त्यांच्या तोंडून ऐकताना नवीन गोष्टी अद्ययावत करून घेता आल्या. कमलेश्वरांचा आवाज खर्ज स्वरूपाचा जाडा होता.
एनआयओ म्हणजे दोनापावलाच्या राष्ट्रीय दर्याविज्ञान संस्थेत काही कार्यक्रमांचं वृत्तांकन करण्याची संधी मिळाली. इफ्फी कार्यक्रमाच्या वेळी कामाचा ताण असल्याने फक्त इफ्फी चित्रपटाच्या महोत्सवाचं रिपोर्टींग करण्यासाठी दिल्ली मुख्यालयातून दोन प्रतिनिधी येत. दर वर्षी वेगवेगळ्या प्रांतातून हे प्रतिनिधी येत. त्यांच्याकडून विविध विषयांवर आदान प्रदान करण्याची संधी मिळे. ते आकाशवाणी पणजीच्याच गेस्ट हाऊसमध्ये उतरत. प्रत्येकाच्या आवडीनिवडी, अभ्यासाचा विषय, बातमी लिहिण्याची शैली वेगळी असल्याने त्या विविधतेत एक आनंद वाटे. त्यांच्याबरोबर इफ्फीतल्या पत्रकार परिषदांना जाणं होई. देशी विदेशी कलाकार, लेखक, नट, दिग्दर्शक यांच्या संवादातून वार्तांकनातून शिकण्याची संधी मिळे. अशा माहोलातून आपण विस्तारत जातो. फक्त विद्यार्थीपणा आणि प्रत्येक गोष्ट एन्जॉय करण्याचा उत्साह हवा.
मुकेश थळी
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत)