बहीण-भावाचे नाते...

या ओव्या कोणी कधी लिहिल्या हे आपण कोणीही सांगू शकत नाही. पण या ओव्यांमधून जी वस्तुस्थिती मांडली आहे ती आजही आपल्याला अनुभवता येते. आजही श्रीमंत बहिणीने गरीब भावाचा केलेला अपमान आणि श्रीमंत भावाच्या घरी बहिणीचा झालेला अपमान गावोगावी अनुभवता येतो.

Story: भरजरी |
02nd February, 05:28 am
बहीण-भावाचे नाते...

घरणीबाई बहीण-भावाचं प्रेम आपल्या ओव्यामधून गात असताना आपल्या भावाविषयी भरभरून बोलते. त्याच्यावर जणू स्तुतीसुमने उधळते. घरणीबाई वडील बहीण असेल, तर आपल्या भावाला आपल्या लेकरासारखा वाढवते. बहीण भावापेक्षा धाकटी असेल, तर आपल्या वडिलांपेक्षाही जास्त भावावर जीव टाकते. तिचा वडील बंधू जणू तिच्यासाठी आधारस्तंभ असतो. ही बहीण भावंडे अगदी गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असतात. आपले पूर्वश्रमीचे हे दिवस आठवतात घरणीबाई गाऊ लागते,

आमी गे भाऊ बहिणी । आमचो वांगड पाखराचो ।

माझ्या गे माहेरीचो । वड पिकलो साखरेचो ।।

आम्ही भाऊ बहीण पाखराच्या थव्यासारखे एकमेकांच्या सोबत असतो. आमच्या मधले प्रेम एवढे अतूट असते ह्या नात्यांतून साखरेसारखी अविट गोडी जाणवते. आणि म्हणूनच ह्या प्रेमाला घरणीबाईने साखरेचा वड असे म्हटले आहे. 

मांडीला मी या जाता । हे घे जात्याला पडली मिठी ।।

बंधून धाडली चीठी । बहिणी बाईच्या येण्यासाठी ।।

सासरी लग्न करून दिलेली बहीण जेव्हा माहेरी आपल्या भावाच्या आमंत्रणावरून घरी येते तेव्हा भावाला आपल्या बहिणीला कुठे ठेवू आणि कुठे नको असे होते. अशावेळी उन्हातून चालत आलेल्या आपल्या थकलेल्या बहिणीला पाहून काळजीने भाऊ बहिणीची विचारपूस करतो.

न्हीमार चीमी चीमी । कशी आलीस माझे बहिणी ।।

अजूनही अविवाहित असलेली घरणीबाईची बहीण तिच्या माहेरी असते. तीही आपल्या सासुरवाशीण बहिणीला पाहून आनंदित होते आणि म्हणते, 

पायार घे गे पाणी । आम्ही बोलूया दोघीजणी ।।

कित्येक दिवसांनी आलेल्या आपल्या बहिणीला कुठे ठेवू आणि कुठे नको असे माहेरी असलेल्या भावा-बहिणीला वाटते. त्यांच्या गप्पा रंगतात. ते दोघे सासुरवाशीण बहिणीला सांगतात,

माझ्या घे पोरसात । फुलली ती गे जाई ।।

जाई फुलाक विसरली । जाई फुलाक विसरली ।।

म्हणजे आपण तिघांनी लावलेले जाईचे झाड अगदी फुलांनी बहरले होते. पण तू मात्र सासरी जाताच ती जाई फुलायचीच विसरली. ह्या ओवीमधून घरणीबाई जणू सांगू पाहते की आपल्या माहेरची माणसे माझ्या विरहाचे दुःख कदाचित सहन करू शकत नसतील. म्हणून ज्याप्रमाणे जाई फुलायची विसरली त्याप्रमाणे ती माणसेही प्रेमाने फुलायची विसरली असतील जणू. पुढे बहीण घरणीबाईशिवाय आपल्याला एकटे एकटे कसे वाटते याचे वर्णन करताना म्हणते, 

आम्ही घे वांगडणी । चार गावात चौघीजणी ।।

कोण घालीना माझी वेणी । कोण घालीना माझी वेणी ।।

अशावेळी घराणी बाई आपल्या लहान बहिणीला धीर देत म्हणते, 

मावशी माझी राणी । तिघे गुंफिल तुझी वेणी ।।

कालांतराने घरणीबाईच्या भावाचे लग्न होते. भावाचे प्रेम बायको आणि बहिणी याच्यामध्ये विभागून जाते. भावाच्या बायकोला म्हणजेच घरणीबाईच्या वहिनीला आपल्या नवऱ्याने आपल्याशिवाय इतर कोणाचा विचार करू नये असे वाटू लागते. एकूण काय तर घरगुती राजकारणाला इथून सुरुवात होते. गरीब बहीण भावाच्या घरी फक्त त्याच्या प्रेमापोटी आलेली असते पण इकडे घरणीबाईची वहिनी मात्र खलनायकाची भूमिका घेते. याचे वर्णन करताना घरणीबाई म्हणते, 

अशी हसती जन नारी । कपाळी लाल चिरी ।।

अडली कन्या ही गे । कन्या ही घे मेल्यार बरी ।।

दु:ख लागना खीण भर। दु:ख लागना खीण भर।।

आपल्या कपाळावर फक्त लाल चिरी आणि अंगावर एकही दागिना नसल्यामुळे आपले दारिद्र्य पाहून जन आपल्यावर हसत आहे. कोणी एकेकाळी आपल्या वडिलांच्या घरी श्रीमंती उपभोगलेल्या घरणीबाईला अशावेळी इतरांच्या हीन नजरा सोसण्यापेक्षा आपण मरून गेलो तर बरं होईल असे वाटते. तरीसुद्धा आपल्यावरच्या संसाराच्या जबाबदाऱ्या आठवून ती भावाच्या घरी येते.

भाऊ आपल्या बहिणीची गरीब परिस्थिती पाहून, तिची फाटकी वस्त्रे पाहून कळवळतो. बहिणीला साडी चोळी देतो पण त्यामुळे घरणीबाईची वहिनी नाराज होते हे घरणीबाईच्या नजरेतून सुटत नाही.

बंधून दिली साडी। भावजय डोळे मोडी ।।

नको बंधू तुझी साडी । घडी मोडून जालुय वेडी ।।

बंधून दिली चोळी । भावजय देईना सुई दोरो ।।

बघीन तुजो तोरो । माझे फाटचो बंधू खरो ।।

आपली बायको आपल्या बहिणीचा अपमान करत आहे याची जाणीव असूनही भाऊ आपल्या बायकोला काही बोलत नाही याचे दुःख घरणीबाईला होते. आपल्या गरिबीमुळे आज आपल्याला अशी अपमानास्पद वागणूक मिळत आहे हे पाहून घरणीबाईला फार वाईट वाटते. तरीही भावाच्या प्रेमापोटी बहीण घटकावर आपल्या माहेरी विसरते. भाऊ बहिणीला एकत्र जेवूया म्हणून पाटावर बसवतो आणि आपल्या बायकोला सांगतो की माझ्या बहिणीला आणि मला एकत्र जेवण वाढ. पण नणंद भावजय नात्याची कदर नसलेली आपली भावजय कशी वाढते हे सांगताना घरणीबाई गाऊ लागते, 

बहिणी जेवूया दहीभात । वहिनी वाढ गे दहीभात ।।

दही ओतून केला ताक । बहिणी जेवूया ताकभात ।। 

वहिनी वाढव गे ताकभात । ताक वतला रांजणात ।।

घरणीबाई आता काय समजायचे ते समजते. उपाशीपोटी सुटते, घोटभर पाणी पिऊन परतीच्या वाटेला लागते. आता आपल्या माहेराच्या घरी आई-वडिलांनंतर भावाची सत्ता राहिली नसून वहिनीचे राज्य तयार झाले आहे. या राज्यात आपल्याला काडीचीही किंमत नाही हे घरणीबाईला जाणवते. घरणीबाई सासरी निघते. विवश होऊन भाऊ बहिणीला विचारतो, 

सासरे जाते बहिणी । बहिणी परतुन कधी येशील ।।

घेऊन गाई म्हशी । बंधू येईल दिसा दिशी ।।

असे म्हणून गरीब असली तरी स्वाभिमानी असलेली दुःखी कष्टी होते. आपण गरीब आहोत म्हणून भावजयीने केलेला अपमान घरणीबाई सहन करू शकत नाही. ती आल्या पावली निघू लागते. आणि जाता जाता ती भावाला आवर्जून सांगते की मी पुन्हा तेव्हाच येईल जेव्हा माझे दिवस बदलतील. आज तुझ्या घरी मला साधा ताक भात मिळाला नाही. पण मी परत येताना मात्र तुझ्यासाठी गाई म्हशी घेऊन येईन.

बहीण आपल्या भावाच्या घरून जाताना आपल्या स्वर्गवासी आई-वडिलांची तिला आठवण येते. पूर्वीचे दिवस आठवून तिच्या डोळ्यात पाणी भरते. तिला आईचे बोल आठवतात,

आई बापाच्या गे जीवा । लेकी खा गे गोडधोड ।। 

बहीण भावाच्या राज्या गेली । भावान ताकाला कैदी केली ।।

माझ्या घे पोरासत । लिंबू लागले गोंडा गोंडा ।।

लिंबू खायाला किती गोड । बंधूला बहीण जड ।।

नुकतीच माहेरी आलेली घरणीबाई आल्या पावली परत निघत आहे हे पाहून शेजारीपाजारी तिची विचारपूस करतात,

सासरी जाते लेकी । पाठी वळान बघी काय ।।

घरणीबाई उत्तरा दाखल म्हणते 

बंधूचे राजेशाही । हात लावायला सत्ता नाही ।।

या ओव्या कोणी कधी लिहिल्या हे आपण कोणीही सांगू शकत नाही. पण या ओव्यांमधून जी वस्तुस्थिती मांडली आहे ती आजही आपल्याला अनुभवता येते. आजही भावाभावामध्ये असलेले अतूट प्रेम जाणवते. आजही श्रीमंत बहिणीने गरीब भावाचा केलेला अपमान आणि श्रीमंत भावाच्या घरी बहिणीचा झालेला अपमान गावोगावी अनुभवता येतो. आजही भावजयीने गरीब नणंदेची केलेली ईर्षा दिसून येते. आजही माणुसकी पेक्षा श्रीमंतीचीच इज्जत केलेली आपल्याला बघता येते. या ओव्यांमधून घरणीबाई ही जगाची वस्तुस्थिती साध्या सोप्या पण भावपूर्ण शब्दामधून गात असायची तेव्हा चुकीचे पाऊल घालू बघणारा माणूस स्तब्ध होऊन आपल्या वागणुकीवर विचार करू लागायचा. हे कठीण असे तत्त्वज्ञान ती सामान्य माणसांपर्यंत ओव्यांमधून सहजपणे पोहोचवायची.


गाैतमी चाेर्लेकर गावस