आजकाल लोकांना विविध प्रकारचा ताण सोसावा लागतो. ह्या वातावरणात, विनोद, विनोदी कार्यक्रम प्रसारित केले तर एफएम वाहिनी गाडीत ऐकताना जीव हलका होऊन जाई.
सत्तरच्या दशकात आकाशवाणी पणजी केंद्राचा सुवर्णकाळ होता असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. अनेक कार्यक्रम काही वर्षे गाजले. अमीट छाप सोडून गेले. त्यातीलच एक म्हणजे रविवारचा रात्री येणारा - फोडणी फोव.
या कार्यक्रमाचं स्वरूप विनोदी, टंग-इन-चीक कॉमेडी अशा स्वरूपाचं होतं. हलकं फुलकं, मोकळं ढाकळं, सैलसर असं कुटुंबाने रेडिओजवळ एकत्र बसून मनसोक्त हसावं असं त्याचं स्वरूप. त्यात एक तर विनोदी टॉक असायचे. किंवा विनोदी श्रुतिका असायच्या. उत्कृष्ट कलाकार त्या काळी आकाशवाणीच्या सेवेत होते. पुरूषोत्तम सिंगबाळ यांची विनोदी भाषणे गाजली. शाणो कसो जावप? तसेच भावोजी ही दोन भाषणे ऐकून हसून मुरकुंड्या होईल अशी. त्यांचा आवाज रेशमी, मुलायम होता. गोड होता. त्यांना विनोद कसा करावा हे पक्कं ठाऊक होतं. श्रोत्यांची नस पकडण्याची कला माहीत होती. निवेदनाचे कौशल्य अवगत होते. अमूक सेकंद विराम, अमूक शब्दावर आघात, तमूक शब्दाकडे आवाजातील चढउतार, वाक्य संपल्यावर कुठे थांबायचं व विराम घ्यायचा याचं तंत्र त्यांना बऱ्यापैकी माहीत होतं. शहाणे कसं व्हावं व लोकांच्या पीडनापासून स्वतःचा बचाव कसा करावा हे ऊर्जामय सादरीकरणात ते सांगायचे. कुणी जर भेटला वा भेटली आणि तो नको ते बाष्कळ प्रश्न विचारेल असे वाटते तर ताबडतोब त्याला एक प्रश्न विचारून घाबरवून सोडायचं. अरे, तुझं तोंड असं कोमेजल्यासारखं कसं झालं? बारीक झाला अगदी सडपातळ. ब्लड टेस्ट वगैरे करून घे हं... असं म्हटल्यावर तो वा ती नर्वस होऊन दोन दिवस त्याच अवस्थेत राहतील. असं केलं नाही तर तुला तो प्रश्नांच्या चक्रव्यूहात अडकवून, भंडावून, वैतागून सोडेल. त्या पेक्षा ही युक्ती बरी. घाला हा उत्तम बचाव.
फोडणी फोव नाटकुलीं म्हणजे श्रुतिका छान असत. त्या काळी टीव्ही नसल्याने रविवारी रात्री हा पंधरा मिनिटांचा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाची मोठी मेजवानी ठरे. पुंडलीक नारायण दांडो यांच्या संहिता उत्तम असत. कलाकारही पट्टीचे असल्याने नाट्यमयतेने भरलेले कथानक व विनोद ऐकताना हांसून मुड्डो जालो रे, असं माझे आजोबा आजी सुध्दा म्हणत.
एकदा एका श्रुतिकेची कथा अशी होती. बाबलो एक साधा सुधा माणूस. गांवातील. काही तरी साधा अपघात होतो आणि त्याचं हाताचं एक हाड सुटतं. गावात हाडांचे डॉक्टर कुठे? सर्व जण त्याला उचलून एका पिक-अप मध्ये ठेवतात. सगळे मागे काळजी करत, गोंधळ गलबला करत. रस्तेही तसलेच. खड्डे आल्यावर बाबलो पराकोटीच्या उच्च आवाजातील किंकाळ्या मारतो. त्याला वेदना असह्य होतात. थांब रे जरा, असे सर्व त्याला गोंजारून सांगतात व दिलासा धीर देतात. इतक्यात एका मोठ्या खड्ड्यात पिक-अप अशी कोसळते की घड्डाम आवाजाने प्रत्येकाची बोबडी वळते. मी मेलो, मी मेलो अशी ओरड़ बाबलो करतो, इतक्यात बाबल्याचं हाड त्या धक्क्याने आपोआप परत चपखल बसलं हे शाबीच्या लक्षात येते. बाबल्याचें हाड बसलें रे, फोणकुलाचे उपकार... असे म्हणत सगळी मंडळी ड्रायव्हरला गाडी रिव्हर्स घ्यायला सांगतात. पिक अप मागे फिरते व घरी यायला निघते. ही आठवणीत राहिलेली श्रुतिका. हसून मुरकुंड्या झाल्या.
आजकाल लोकांना विविध प्रकारचा ताण सोसावा लागतो. ह्या वातावरणात, विनोद, विनोदी कार्यक्रम प्रसारित केले तर एफएम वाहिनी गाडीत ऐकताना जीव हलका होऊन जाईल. अशा प्रकारचे ज्योक्स मी दिल्लीत एकदा एका खाजगी एफएम वाहिनीवर ऐकले होते. फार गुणी कलाकार ते सादर करत होते.
मेरी आवाज ही मेरी पहचान है, या दर्जाचे अनेक कलाकार, निवेदक, वृत्तनिवेदक आजही सरकारी आनी खाजगी रेडिओ केंद्रात कार्यरत आहेत. दुर्गम गावागावातील कलाकार सुध्दा एकत्र येऊन सामुदायिक रेडिओ चालवत आहेत. ग्रामस्थांनाही त्यात सहभागी करून घेत आहेत. रेडिओची पहुंच काही न्यारी आणि आगळी आहे.
मुकेश थळी, (लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत)