कुंकळ्ळीतील प्रदूषणाचा मुद्दा अनेकवेळा समोर आला. काही कालावधीपुरत्या उपाययोजना करण्यात आल्या, आश्वासने देण्यात आली पण दूरदृष्टीपणातून प्रदीर्घ काळासाठी कडक निर्बंध व उपाययोजना करण्याची मागणी सध्या होत आहे.
कुंकळ्ळीच्या जनतेच्या हितासाठी प्रदूषण करणारे सर्व कारखाने कायमस्वरूपी बंद करावेत व लोकांना चांगले पर्यावरण देण्यासाठी भूजलाचे सर्वेक्षण आणि भूगर्भातील पाण्याचे निरीक्षण यासह अनेक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार होत आहे. राज्य सरकारकडून करण्यात येणार्या उपाययोजना पूर्णपणे या समस्येचे निराकरण नसल्याने नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोणातून कडक निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे.
कुंकळ्ळीतील प्रदूषणाचा मुद्दा अनेकवेळा समोर आला. काही कालावधीपुरत्या उपाययोजना करण्यात आल्या, आश्वासने देण्यात आली पण दूरदृष्टीपणातून प्रदीर्घ काळासाठी कडक निर्बंध व उपाययोजना करण्याची मागणी सध्या होत आहे. विरोधी पक्षनेते तथा कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील घातक कचरा, वायू प्रदूषण आणि जल प्रदुषणाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. औद्योगिक वसाहतीमधील पोलाद निर्मिती आणि फिश मील उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणामुळे औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील तसेच आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या कुंकळ्ळीवासीयांच्या आरोग्याच्या समस्या वाढलेल्या आहेत. मासळी प्रक्रिया प्रकल्प आणि स्टीलचे विविध उद्योग असलेली कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत प्रभावी कचरा व्यवस्थापन यंत्रणेचा अभाव आणि बंद असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी) यामुळे पर्यावरणाच्या ऱ्हासाचे हॉटस्पॉट बनली आहे.
राज्य सरकारने अनेकदा प्रदूषणकारी प्रकल्पांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले आहे पण हे आश्वासन पाळण्यात व प्रदूषणकारी प्रकल्पांवर कडक कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे. यापूर्वी ६ ऑगस्ट २०२४ रोजी पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी विधानसभेत कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाविरोधात दोन महिन्यांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पांतून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलण्यात संबंधित विभाग अपयशी ठरले आहेत.
कुंकळ्ळीतील नागरिकांकडून औद्योगिक वसाहतीतील पाण्यामुळे शेतजमिनींसह नदीनाल्यासह पाण्याचे स्त्रोत व भूजल खराब होत असल्याचे निदर्शनास आणून दिलेले आहे. त्यानंतर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी करण्यात आली. अहवाल दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आल्यानंतर प्रदूषणकारी प्रकल्प सील करण्याचे आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांकडून देण्यात आले होते. यानंतर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रदूषणकारी प्रकल्प बंद करण्यात आले व आपले म्हणणे कार्यलयाकडे मांडण्यास सांगितले. त्यानंतर सील करण्यात आलेल्या प्रदूषणकारी कारखान्यांकडून पर्यावरण नुकसान भरपाई घेत आणि अटी घालून अल्पावधीतच काम सुरू करण्याची परवानगी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आली. त्यांनी अटींचे पालन करून प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत का, हे तपासण्याची गरज असतानाही तसे झाल्याचे दिसून आलेले नाही.
कुंकळ्ळी परिसरात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. जनतेच्या हितासाठी हे सर्व प्रदूषण करणारे कारखाने कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी स्थानिक आमदार व नागरिकांकडून झालेली आहे. औद्योगिक वसाहतीतील पर्यावरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही केली आहे. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीसह आजूबाजूच्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्याची गरज आहे. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी सोडण्यात येत असल्याने व कचर्याची वाहतूक केली जात असल्याने दुर्गंधी नियंत्रण अभ्यास करण्याची गरज व्यक्त होत आहे. याशिवाय रिअल टाइम एम्बियंट एअर मॉनिटरिंग स्टेशन स्थापित केल्यास प्रदूषणाचा धोका किती वाढला याची नेमकी माहिती मिळू शकते.
औद्योगिक वसाहतीमध्ये धोकादायक कचर्याची साठवणूक करुन ठेवण्यात आलेली आहे. या धोकादायक कचर्याच्या डम्पिंग नमुन्यांची तपासणी करण्याची मागणी होत आहे. पर्यावरणीय नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत आणि आजूबाजूच्या भूजल आणि पृष्ठभागावरील पाण्याचे निरीक्षण ठराविक कालावधीने करण्याची आवश्यकता आहे. अशा अनेक सूचना व उपाययोजना स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांकडून व विरोधी पक्षनेत्यांकडून सुचवलेल्या आहेत. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत नवीन फिश मील प्लांट येऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
सध्या औद्योगिक वसाहतीमध्ये आणखी एक मासळी प्रक्रिया प्रकल्प उभारला जाण्याची शक्यता आहे. त्याला विरोध सुरू झालेला आहे. औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पांमुळे याआधीच अनेक समस्यांचा सामना नागरिकांकडून करावा लागत आहे. प्रकल्पांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पाण्याचे स्त्रोत खराब होत आहेत. दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना काहीवेळा घराबाहेर येणेही कठीण होऊन जाते. त्यामुळे आधीच अनेक समस्यांना कंटाळलेल्या नागरिकांकडून नव्या प्रकल्पांना विरोध होणार हे निश्चित आहे. आता कुंकळ्ळीचे प्रदूषण कमी होण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध घालून प्रदूषण न होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधीच उपाययोजना न झाल्यास हा लढा रस्त्यावर लढला जाईल असा इशारा लोकांकडून देण्यात येत असताना गंभीरतेने या विषयाकडे पाहण्याची वेळ आलेली आहे.
अजय लाड
(लेखक गोवन वार्ताचे दिक्षण गोवा
ब्युरो चीफ आहेत.)