चंदूचं लगीन…

चंदूचा सर्वांनी पोष्टमन बनवला होता. त्याचे बालपणापासून दोन बिलंदर साथीदार बबन, म्हाद्या जे त्याच्या साध्या स्वभावाचा हवा तसा फायदा करून घ्यायचे.

Story: कथा |
02nd February, 04:33 am
चंदूचं लगीन…

दोन शाळकरी मुलांना सायकलने येताना कुणीतरी गटारात पडलेले दिसले, “अरे बेगिन या, कोणतरी गटारात पडलो!” या हाकेसरशी जवळपासची लोकं तिकडे धावत गेली. त्या व्यक्तिला दोन तरुणांनी बाहेर काढले. सारे अवाक झाले! तो चंदू होता. चटकन ओळखू येत नव्हता. एका हातात अर्धवट दारूची बाटली गच्च पकडलेली. त्याचा प्राण कधी गेला कळत नव्हते. साधारण दोन वर्षानंतर चंदू दिसला तो या अवस्थेत. त्याची ती अवस्था बघून माझ्या डोळ्यातून एक एक थेंब वाट मोकळी करू लागला. त्या अश्रू सोबत चंदूची आठवण.

  “चल शाळेत, शाळा शिका होई. असो धोरगो रवा नको!” एक बारीक काठी घेऊन आई रखुमा थोराड व अल्पबुद्धी चंदूला रस्त्याने ओढत शाळेत नेत होती. “माका मास्तरांचो भय वाटता, मिया नाय जानय शाळेत!” चंदू गयावया करत होता. पण रखूमा हट्टाला पेटली होती. तिने त्याला वर्गात कोंबले. “मास्तर हेका जरा शिकया!” “माझे कर्म शिकवू याला? तो गाढव आहे, त्याला अजून आ काढता येत नाही!” मास्तरांचे सडेतोड उत्तर. तरीही रखुमा त्याला रडत ठेवून घरी आली.

मग डोळे वटारून हातात पट्टी घेऊन मास्तर नावाचा चंदूला भासणारा तो भयानक प्राणी त्याच्या समोर उभा ठाकला. “चल आ काढ!” ते उग्ररूप पाहून शुर चंदूची चड्डी कधी ओली झाली व त्याने घर कधी गाठले कुणाला कळलेच नाही. मी त्याच वर्गात पण त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान. त्या दिवसापासून चंदूने शाळेशी गट्टीफू केली ती कायमची. बालपणीच बापाचे मायेचे छप्पर डोक्यावरून हरवलेल्या चंदूने थोडेतरी शिकावे म्हणून रात्रंदिवस राबणाऱ्या रखुमाला त्याच्यापुढे हात टेकावे लागले.

त्या दिवसापासून काका सीताराम याला एक बिनपगारी आयता गुराखी मिळाला. चंदू सरळमार्गी. त्याला छक्केपंजे माहीत नव्हते. त्यातच तो सांगकाम्या. समोरच्याने फक्त हळुवार शब्दात, “चंदू वायच माझा काम करतय?” असा प्रश्न करावा आणि चंदूने नंदीबैलासारखी मान डोलवावी. या त्याच्या स्वभावाचा आपल्या कामासाठी प्रत्येकजण फायदा करून घेऊ लागले. लोकांना एक चकटफू नोकर मिळाला. लग्नपत्रिका वाटणे, आमंत्रण देणे, पत्रावळी उचलण्यापासून, झाडू काढता काढता चंदूने विशी कधी ओलांडली कळलेच नाही.

चंदूचा सर्वांनी पोष्टमन बनवला होता. त्याचे बालपणापासून दोन बिलंदर साथीदार बबन, म्हाद्या जे त्याच्या साध्या स्वभावाचा हवा तसा फायदा करून घ्यायचे. त्याच्या या साथीदारांसोबत असायची एक गुरे राखणारी, रंगाने सावळी व एका डोळ्याने अधू मुलगी प्रिता जीला सारे पिरता म्हणत. जिचे लग्नही ठरत नव्हते.

चंदूचे जग पूर्णत: वेगळे होते. त्याला तारुण्य काय असते याचा गंधही नव्हता, पण त्याच्या निरागस मनात त्या दोन मित्रांनी वासना नावाच्या राक्षसाचा शिरकाव करण्यास सुरुवात केली. “अरे चंदू किती वर्षा लोकांचे लग्नपत्रिका वाटित फिरतलय? आयेक सांग तुझा लगीन करुक!” म्हाद्याने न दिसणारी काडी पेटवायला सुरुवात केली, चंदूचा निरागस प्रश्न, “लगीन हुतल्या काय?” दोघेही जोरजोरात हसतात. त्याला काय चुकले कळाले नाही. मग बबन थोडे थोडे तेल टाकायचे काम केले. “तू फक्त दुसऱ्यांची लग्ने कर, एकदा लगीन करून बघ, काय मजा असते कळेल!” आता कधी नव्हे ती चंदूची उत्सुकता वाढली. त्याच्या वाढलेल्या उत्सुकतेचा दोघांनीही फायदा करून घेतला. ते दोघेही स्त्री विषयी वासनेने भरलेल्या रसभरीत कहाण्या त्याला सांगण्यास सुरुवात करतात.

रात्री अंथरुणावर पडताच गाढ झोप घेणाऱ्या चंदूची निद्रा गायब झाली. तो फक्त तळमळू लागला. त्याचे आईशी भांडण सुरू झाले. “माझा लगीन कधी करतलय? माका व्हाकाल व्हई, मी जाणतो झालंय!” असे प्रश्न चंदू रोज आईला विचारू लागला. त्याची स्त्रियांकडे बघण्याची नजरच बदलली.

त्याच्या सोबतच्या पिरताचे लग्न झाले आणि वर्षभरातच नवरा वारला. ती पुन्हा माहेरी येऊन गुरे चारण्यास जाऊ लागली. बबन व म्हाद्याची तिच्यावर पहिल्यापासून वाईट नजर होती. त्यांनी तिला मिळवण्याचे बरेच प्रयत्न केले. पण तिने दाद दिली नाही. ते मनात दाबून ठेवलेल्या वासनेकरीता संधीची वाट पाहत होते.

आता त्यांनी चंदूला तिच्यासोबत लग्न लावून देतो ही वेडी आशा दाखवून त्याच्या शरीरात दबा धरुन बसलेल्या वासनारुपी राक्षसाला उग्ररूप देण्याचा चंगच बांधला. तू पिरत्याशी जवळीक कर, तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न कर. आम्ही सांगतो तसे केलेस तर तुझे लग्न तिच्याशी लावून देण्याची जबाबदारी आमची. तरच तुला आम्ही सांगितलेली मजा करता येईल. त्यांनी सुचवलेले सर्व उपाय त्याने सुरू केले. आता रात्रंदिवस त्याला पिरताच दिसू लागली. त्याची भूक मरून गेली.

एके दिवशी वाडीत एक सार्वजनिक ब्राम्हण भोजनाचा कार्यक्रम सुरू होता. त्या दिवशी बबन व म्ह्याद्याने चंदूला सांगितले, “आज काहीही करून तू पिरताला मिठीत घे. आज तिकडे तुम्ही दोघेच असणार, पुढचे आम्ही बघतो.” मग चंदूच्या शरीरात कामवासनेेच्या भुताने संचार केला. गुरे राखणारी ती दोघेच असता चंदू तिच्या जवळ पोहोचला. पिरता नेहमीप्रमाणे हसली. तिला पुढील संकटाची चाहूल नव्हती. अचानक चंदूने “तू माका लय आवडतेस, माझ्याबरोबर लगीन कर!” म्हणत तिला गच्च मिठी मारली. ती मोठमोठ्याने “मला वाचवा” असे ओरडू लागली. एवढा वेळ याच संधीची वाट पाहणाऱ्या बबन म्हाड्याने धाव घेतली. तिला चंदूच्या मिठीतून सोडवून त्याला बदडले.

मग गाव जमले, सर्वांनी क्षणात चंदूला वेडा ठरवून त्याचे वेड्याच्या हॉस्पिटलशी लग्न लावून मोकळे झाले. आई धक्क्याने वारली. हे घडवणारे आनंदात फिरत होते. आज त्या भूतकाळातील घटनेला अश्रूंचे थेंब वाट मोकळी करून देत होते. सांगत होते, असे किती भोळे चंदू आम्ही सुशिक्षित म्हणवणारे संपवतोय?


चंद्रहास राऊळ