मृद्गंध

Story: छान छान गोष्ट |
22nd June, 10:29 pm
मृद्गंध

“अरे, मला तर वाटतं की पावसाच्या पाण्यातच अत्तर असतं..” रूद्र म्हणाला.

“नाही रे, तसं असतं तर हा वास फक्त पहिल्याच पावसाला का येतो? पावसाळ्यात नेहमीच आला असता ना असा सुंदर वास?” श्रीयानं शंका विचारली.

रूद्र विचारात पडला. तो काही बोलणार इतक्यात आश्विन म्हणाला, “अगं नंतर नंतर आपल्या नाकाला सवय होत असणार त्या वासाची म्हणून येत नसेल पावसाळाभर.”

यावर रूद्र, श्रिया, अभिषेक आणि मनाली सगळ्यांनीच माना हलवल्या. हे उत्तर सगळ्यांनाच पटण्यासारखं होतं.

नुकताच पहिला पाऊस पडून गेला होता. गरम गरम जमिनीवर पावसाचे टपोरे थेंब पडल्यावर सगळीकडे अतिशय सुंदर सुगंध पसरला होता. हा सुगंध कुठून आला याचीच ते चर्चा करत होते.

“म्हणजे पावसाच्या पाण्यात अत्तर असतं हे मी बरोबरच सांगितलं की! फक्त त्याची आपल्या नाकाला सवय होते हे मला माहीत नव्हतं.” अश्विनचं उत्तर पटल्यामुळे आपला भाव तर कमी होणार नाही ना? अशी भीती वाटल्यानं रूद्र पटकन म्हणाला. त्याचं हे नेहमीचंच होतं!

“हो रे बाबा! तुझंच बरोबर!” सगळे एकदम म्हणाले आणि जोरजोरात हसायला लागले.

कॉलेजमधून येणारी स्वातीताई नेमकी त्यावेळी तिथून जात होती. मुलांचं हसणं ऐकून ती थांबली, “काय झालं रे? का हसताय?” तिनं विचारलं.

“अगं ताई, रूद्र नेहमीप्रमाणे त्याचंच कसं बरोबर आहे हे आम्हाला पटवून देत होता!” मनाली म्हणाली. रूद्रनं तिच्याकडे तोंड वाकडं करत बघितलं.

“अच्छा? काय म्हणणं आहे तुमचं रूद्रसर?” स्वातीताईनं हसत विचारलं. पहिला पाऊस पडल्यावर सुंदर वास कुठून येतो याविषयी त्यांनी लावलेल्या शोधाबद्दल मग सगळ्यांनी मिळून तिला सांगितलं. आता ती आपलं कौतुक करेल या आशेनं पाचही जण तिच्याकडे बघत होते पण, ती मात्र हळूच हसायला लागली.

“मुलांनो, तुम्ही हुशारच आहात! पण तुम्हाला गंमत माहीत आहे का? हा वास मातीतच असतो!” तिनं सांगितलं.

कुणालाच तिचं म्हणणं पटलं नाही! मातीला कधी वास असतो का? तसा असेल तर एरवीही यायला पाहिजे की मातीला वास!

“खरं नाही वाटत ना?” तिला सगळ्यांचे चेहरे बघूनच समजलं त्यांच्या मनात काय आहे. पाठीवरची बॅग काढत तीही त्यांच्याबरोबर बसायला आली. अभिषेक आणि श्रीया थोडं सरकले आणि त्यांनी दोघांच्या मधे तिला जागा करून दिली.

“मातीत ना अॅक्टीनोमीसिटीस नावाचे बॅक्टेरिया, म्हणजे जिवाणू असतात.” ती सांगू लागली.

“जेव्हा खूप ऊन पडतं ना; तेव्हा प्रखर उन्हापासून बचाव करून, जिवंत राहण्यासाठी जे जिवाणू सुप्तावस्थेत जातात. सुप्तावस्थेतल्या या जीवाणूंना इंग्रजीत ‘स्पोर्स’ असं म्हणतात. हे स्पोर्स मातीत ‘जिओस्पिन’ नावाचं एक द्रव्य तयार करतात. जेव्हा पहिला पाऊस या कोरड्या मातीवर पडतो ना, तेव्हा आपल्याला जो हा सुंदर वास येतो तो या द्रव्याचा असतो! कळलं का?! तिनं विचारलं.

अवघड अवघड नावं सोडून मुलांना बाकीचं समजलं होतं. स्वातीताईच्या ते लक्षात आलं, ती हसून म्हणाली,

“एक काम करा.. तुम्ही  यासाठी असलेला एक सुंदर शब्द फक्त लक्षात ठेवा - ‘मृद्गंध’ म्हणजे मातीचा सुगंध! हा शब्द आठवला की तुम्हाला मातीत असणारे जिवाणू आणि त्यांच्यामुळे येणारा हा पावसाचा वास हे आपोआप आठवेल!”

“अरे हे तर सोप्पं आहे!” अभिषेक म्हणाला.

“किती छान शब्द आहे, मृद्गंध.. माझ्या तर नेहमी लक्षात राहील..” श्रीया म्हणाली..

“पण, म्हणजे माझं म्हणणं बरोबरच होतं.. अत्तरच असतं, फक्त ते पावसाच्या पाण्यात नसतं तर मातीत असतं..” रूद्र म्हणाला.

“हो रे बाबा.. तुझंच बरोबर!” यावेळी स्वातीताईसकट परत एकदा सगळे एकदम म्हणाले आणि जोरात हसायला लागले!


मुग्धा मणेरीकर