कारवार वन विभागाची कोडीबाग येथे कारवाई
कारवार : कारवारमधून गोव्यातील हॉटेल्सना बेडकांची तस्करी होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून कारवार वन विभागाच्या सतर्कपणामुळे 42 बेडकांना जीवनदान मिळाले आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार कारवार -गोवा मार्गाने प्रवास करणाऱ्या एका खाजगी बसमधून जांपिंग चिकनसाठी बेडकांची तस्करी होत असल्याची माहिती कारवार वन विभागाला मिळाली होती.
वन विभागाच्या पथकाने सापळा रचत कारवारच्या कोडीबाग येथे संबंधित बस अडवत तपासणी केली असता त्यांना एका संशयित इसमाकडे 42 बेडूक आढळून आले. पोलिसांनी बस जप्त करत वाहन चालकाला अटक केली मात्र तस्करी करणारा संशयित फरार झाला. पोलीस पथक सदर इसमाचा शोध घेत असून जांपिंग चिकनसाठी गोव्यातील हॉटेल्सना या बेडकांची तस्करी होत असल्याची माहिती उघड झाली आहे.
बेडूक नष्ट झाल्यास जैवविविधतेवर मोठा परिणाम :-
बेडूक हा जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असून बेडकांच्या माध्यमातून निसर्गातील अन्नाची साखळी समतोल राहते. सद्य गोव्यात बेडकाच्या मांसाला मागणी वाढत असून बेडकांच्या शिकारीला आळा न बसल्यास येणाऱ्या काळात पर्यावरण व जैवविविधतेवर मोठा परिणाम होणार आहे. याकारणास्तव गोव्यात वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी कडक मोहीम सुरू केली असून राज्याच्या ग्रामीण भागात पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत
नदी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेडूक:-
उत्तर गोव्याच्या सत्तरी तालुक्यात नदी नाल्यांची संख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेडूक आढळतात यामुळे शिकाऱ्याकडून ग्रामीण भाग टार्गेट करण्याचा प्रकार होऊ शकतो. यामुळे बेडकांची शिकार करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन वन खात्याकडून करण्यात आले आहे.