कळंगुट बोट दुर्घटनाप्रकरणी बोटीच्या मालकीणीची अटकपूर्व जामिनासाठी धाव

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st December 2024, 12:25 am
कळंगुट बोट दुर्घटनाप्रकरणी बोटीच्या मालकीणीची अटकपूर्व जामिनासाठी धाव

पणजी : कळंगुट समुद्रात जलसफरी दरम्यान बोट बुडून पर्यटकाच्या मृत्यूप्रकरणात बोटीची मालकीण मीना कुतिन्हो हिने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवार, द‌ि. ३१ रोजी होणार आहे.
खेड-महाराष्ट्रातील पोफळकर, चिंचविलकर व हंबीर या कुटुंबांमधील १३ जण गोव्यात नाताळच्या सुट्टीनिमित्त आले होते. बुधवार, २५ रोजी त्यांनी कळंगुट समुद्र किनाऱ्यावर बोटीतून जलसफरीचा आनंद घेण्यासाठी जाॅन वाॅटर स्पोर्ट्सची बोट घेतली होती. त्यावेळी बोट ऑपरेटर धारेप्पा झिराली आणि इब्राहीम शरीफ साब या दोघांनी वरील १३ जणांसह आणखी पर्यटकांना बोटीत भरले. तसेच बोटीची क्षमता कमी असतानाही आॅपरेटरने बोटीत १८ ते २० पर्यटकांना बोटीत घेतले. त्यावेळी बोट समुद्रात शंभर मीटर अंतरावर गेल्यानंतर बोटचे इंजिन वाळूत रूतून बंद पडले. त्याचवेळी समुद्राच्या लाटेची जोरदार धडक बसल्याने बोट पाण्यात कलंडली. या दुर्घटनेत सूर्यकांत पोफळकर यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पणजी किनारी पोलिसांनी बोटीची मालक मीना कुतिन्हो हिच्यासह धारेप्पा झिराली आणि इब्राहीम शरीफ साब या दोघा ऑपरेटरांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बोट आॅपरेटरने अटक केली. अटक केलेल्या बोट आॅपरेटरना पणजी येथील पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने प्रथम चार दिवस पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर त्या दोघांना न्यायालयीन कोठडी रवानगी केली. याच दरम्यान त्या दोघांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान बोट मालकीण मीना कुतिन्होने वरील न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. यावरही मंगळवारी सुनावणी होणार आहे.