ग्रामीण भागात प्रती व्यक्ती महिन्याकाठी लागतात ७ किलो तांदूळ!

तांदूळ खरेदीत गोवा देशात १३व्या स्थानी : शहरी भागात तांदूळ खरेदीचे प्रमाण कमी

Story: पिनाक कल्लोळी |
17th June, 12:44 am
ग्रामीण भागात प्रती व्यक्ती महिन्याकाठी लागतात ७ किलो तांदूळ!

पणजी : भात आणि मासे हे गोमंतकीयांच्या जेवणातील मुख्य घटक आहेत. गोव्यातील ग्रामीण भागात प्रती व्यक्ती प्रती महिना सरासरी ७.०१ किलो तांदूळ लागतो. संपूर्ण देशातील ग्रामीण भागांचा विचार केल्यास तांदूळ खरेदीत गोवा १३व्या स्थानी आहे. या यादीत मणिपूर पहिल्या स्थानी आहे. तेथील ग्रामीण भागात प्रती व्यक्ती प्रती महिना ११.२० किलो तांदूळ लागतो. केंद्रीय सांख्यिकी आणि प्रकल्प अंमलबजावणी खात्याच्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
या अहवालानुसार गोव्यातील ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात तांदूळ खरेदीचे प्रमाण कमी आहे. शहरी भागात प्रती व्यक्ती प्रती महिना सरासरी ६.७१ किलो तांदूळ लागतो. असे असले तरी शहरी भागात ग्रामीण भागाच्या तुलनेत तांदळावर खर्च करण्याचे प्रमाण जास्त आहे. शहरी भागात प्रती व्यक्ती प्रती महिना तांदळावर १९२.२१ रुपये खर्च केले जातात, तर ग्रामीण भागात प्रती व्यक्ती प्रती महिना तांदळावर १७३.०६ रुपये खर्च केले जातात.
ग्रामीण भागात प्रती व्यक्ती प्रती महिना २.२० किलो गहू, तर ०.०८ किलो अन्य धान्य लागते. ग्रामीण भागात महिन्याला प्रती व्यक्ती एकूण ९.३० किलो ध्यान खरेदी केले जाते. ग्रामीण भागात महिन्याला अन्नधान्याच्या एकूण खर्चापैकी ३.५८ टक्के खर्च धान्य खरेदीवर होतो. शहरी भागात प्रती व्यक्ती प्रती महिना २.४१ किलो गहू खरेदी केला जातो. शहरी भागात महिन्याला प्रती व्यक्ती एकूण ९.१७ किलो धान्य खरेदी केले जाते. याची किंमत २९१.९८ रुपये आहे. महिन्याला अन्न धान्याच्या एकूण खर्चापैकी ३.३४ टक्के खर्च हा धान्य खरेदीवर होतो.

सिक्कीममध्ये सर्वाधिक धान्य खरेदी
अहवालानुसार संपूर्ण देशाच्या तुलनेत मणिपूरच्या ग्रामीण भागात सर्वाधिक धान्य खरेदी केली जाते. येथे प्रती व्यक्ती प्रती महिना ११.२२ किलो धान्य खरेदी केली जाते, तर शहरी भागात त्रिपुरा आघडीवर आहे. तिथे प्रती व्यक्ती प्रती महिना ११.२० किलो धान्य खरेदी केले जाते.